-
A Woman's Courage
मी भक्ष किंवा बळी ठरण्याचं नाकारते - जॅकलिन गोल्ड जॅकलिन गोल्ड ही `अॅन समर्स', या एका प्रचंड यशस्वी किरकोळ विक्री दुकानांच्या साखळीची धडाडीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. `कॉस्मोपॉलिटन' मासिक आणि `डेली मेल' वृत्तपत्रानं ब्रिटनमधली सर्वात प्रभावशाली स्त्रियांपौकी एक म्हणून तिची निवड केली आहे, आणि ब्रिटनमधल्या सर्वात यशस्वी महिलांमध्ये तिची गणना होते. पण तिला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. `अ वुमन्स करेज'मध्ये पहिल्यांदाच तिनं आपली संपूर्ण आणि अद्भुत कहाणी लोकांसमोर मांडली आहे. सावत्र वडिलांनी लहानपणी केलेल्या छळाचं- तेव्हापासून तिच्या मानगुटीवर बसलेलं भूत तिनं कसं उतरवलं, खरं प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात तिच्या आयुष्यामध्ये घडलेली आणि तिचं हृदय भग्न करणारी अनेक वादळी प्रेमप्रकरणं आणि मूल होण्यासाठी, आपलं स्वत:चं कुटुंब निर्माण करण्यासाठी तिनं जे अयशस्वी प्रयत्न केले, त्यातून पदरी आलेली निराशा आणि दु:ख, हे सगळं तिनं मोकळेपणानं सांगितलं आहे. ही एक ज्वलंत आणि प्रभावी कथा आहे. आपलं खरं मूल्य आणि क्षमता खूप उच्च आहेत, हे जाणून असणा-या आणि ती पातळी गाठण्यासाठी प्रेरणा शोधत असलेल्या स्त्रियांसाठी हे पुस्तक म्हणजे एक मंगल स्तोत्र ठरेल.
-
Maza Nav Bhyrappa
एस. एल. भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये चितारणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणार्या भैरप्पांचं हे प्रामाणिक आत्मचरित्र. जे जसं घडलं, ते तसं सांगणारं. नातेवाइकांपासून सहकार्यांपर्यंत सर्वांचीच - अगदी हितशत्रूंचीसुद्धा - आवर्जून दखल घेणारं. त्यांच्या आयुष्यातले आणि साहित्यिक जडणघडणीतले असंख्य चढउतार, यशापयश, सुखदुःखं... सारं काही वाचकांसमोर मांडून ठेवणारं. आत्मचरित्रांच्या दालनाची समृद्धी वाढवणारं एक पारदर्शी पुस्तक.
-
Kimayagar (किमयागार )
सुरुवातीलाच एक प्रांजळ कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होती. पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळया विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहे. एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तसं हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. पद्मविभूषण वसंत गोवारीकर विश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दिप्तीमान वारसा आहे. ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात. उदाहरणार्थ, मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या 'मॅक्स्वेल'ची ओळख किती जणांना असेल? विज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्या झगडयाचा आणि त्या घडवणाऱ्या 'किमयागारां'चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे पुस्तक. पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद व या वैचारिक साहसातील थरार! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते. अतीश दाभोलकर, (भटनागर पुरस्कारविजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक) पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08.