-
LongLeges
जेरुशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी. तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. मात्र अट एकच. तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची. जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला. लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव - ’डॅडी लाँगलेग्ज’! आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी. एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...
-
Hans Akela
तसं तर काल उत्कटपणे ’जगलेलं’ सारं तितक्याच ताजेपणानं आपल्या नजरेसमोर आजही उभं असतं- नवे अर्थ हाती घेऊन! लक्षात येत असतं की, आपला बहुतेकांचा भोवताल वरवर सारखाच आहे, पण तरीही प्रत्येकाचं प्राक्तन निराळं, निर्णय निराळे, स्वीकार-नकार निराळे, कारण इथं प्रत्येक व्यक्ती दुसरीहून निराळी! स्वतंत्र! माणसाच्या जगण्यात प्रातिनिधिक असं काही नाही. अगदी आपणसुद्धा आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे असल्याचं अनुभवत असतोच की! जितकी आपली ’उमजण्या’ची ताकद मोठी, तितकं आपलं ’भंगणं’ अधिक! ’उमजून’ घेण्याच्या मनानं मांडलेल्या या खेळात म्हणूनच सोबत उरते ती फक्त एकटेपणाची तीप संवेदना! जाणिवेच्या अथांग आकाशात झेप घेऊ पाहणारा प्रत्येक हंस अकेला आहे, तो या अर्थानंच! वेगवेगळ्या माणसांचं वेगवेगळं, परंतु तरीही हे ’अकेलापन’ अधोरेखित करणार्या मेघना पेठेंच्या कथा.
-
Jhadajhadti
तुमच्या बागा फुलाव्यात, ऊस मळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या.जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी.
-
Life And Death In Shanghai
'सामान्य माणसांना सतत जागृत ठेवण्यासाठी क्रांतीचे धक्कातंत्र अनुसरले पाहिजे’, या माओच्या वचनाचा आधार घेऊन १९६६ साली चीनमध्ये ’सांस्कृतिक क्रांती’ नावाची प्रचंड उलथापालथ घडवून आणली गेली. चिआंग चिंगने म्हणजे माओच्या पाताळयंत्री बायकोने घडवून आणलेल्या त्या ’क्रांती’मध्ये जिचे जीवन पार उद्ध्वस्त झाले, अशा एका अभागी चिनी मातेचे हे चित्तथरारक आत्मकथन आहे. निएन चंग हे तिचे नाव. ही कथा जशी तिच्या हालअपेष्टांची, तशीच तिच्या हरपलेल्या मुलीचीही. विध्वंसक रेड गार्ड्स, मतलबी पक्षनेते आणि बापुडवाणे जनसामान्य या सर्वांचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण यांमुळे जगभर गाजलेले पुस्तक.
-
Hi Shreenchi Ichha (ही'श्रीं' ची इच्छा)
इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि प्रयत्न केले तर माणूस हवं तिथे पोचू शकतो’ याची साक्ष पटवणारी आजच्या घडीची सत्यकथा म्हणजे ‘ही ‘श्री’ची इच्छा!’ श्रीनिवास ठाणेदार किंवा ‘श्री’ हा बेळगावच्या शाळेतून पंचावन्न टक्के मार्ग मिळवून मॅट्रिक पास झालेला एक सर्वसामान्य मुलगा. नंतर मात्र तो एम्एस्सीला फर्स्ट क्लास फर्स्ट काय आला, त्यानं अमेरिकेतली डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी काय मिळवली आणि यशस्वी उद्योगपती म्हणून नावलौकिक काय कमावला, सर्व काही थरारक आणि कौतुकास्पद ! एका बाजूला पैसा, प्रसिद्धी आणि यश; तर दुसऱ्या बाजूला पत्नीनं केलेली आत्महत्या, समाजानं वाळीत टाकणं आणि परक्या देशात दोन लहान मुलांना ‘बाबा आणि आई’ होऊन वाढवणं! यश अपयश, सुख दु:ख, मान अपमान सर्वच काही टोकाचं ! डॉ. श्रीनिवास ठाणेदार या जिद्दी माणसानं परिस्थितीवर केलेली मात म्हणजे ‘ही ‘श्री’ची इच्छा
-
Parv (पर्व)
कर्नाटकातील अग्रगण्य कादंबरीकार तत्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी महाभारतावर लिहिलेली ही महाकादंबरी. यात मूळ महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीच्या पात्रांचे वास्तव रूप रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय संकल्पनेच्या प्रकाशझोतात महाभारताच्या व्यक्तिरेखांची संगती भैरप्पांनी लावली आहे. या कांदबरीमध्ये लेखकाने संज्ञा प्रवाहाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. कादंबरीतील पात्रांच्या मनात येणारे विचार व्यक्त होता होता शेवटच्या एक दोन शब्दांबरोबर विचारांचा प्रवाह वेगळ्याच दिशेला वाहू लागतो. कुंती, भीष्म, द्रोणाचार्य यांच्यासारख्या दीर्घायुषी पात्रांच्या वाढत्या वयाचा 'फील’ देण्यासाठी त्यांच्या अवाढ्य आयुष्याला गवसणी घालण्यासाठी लेखकाने याचा अत्यंत चतुराईने आणि कलात्मकतेने वापर करून घेतला आहे. महाभारतातील दैवी चमत्कार, वर, शाप या गोष्टींना भैरप्पांनी संपूर्ण फाटा दिला आहे. व प्रत्येक घटना, प्रसंगांचा अत्यंत वस्तुनिष्ठ अर्थ लावून वेगळ्या दृष्टीकोनातून ही कथा मांडली आहे. आधुनिक समाजातील व्यक्तीस 'महाभारतातील व्यक्ती अशाच असल्या पाहिजेत’ असे या कादंबरीमुळे वाटू लागले. भैरप्पांनी शापांच्या, वरदानांच्या भक्कम पडद्याआड लपलेल्या माणसाचा घेतलेला शोध वाचकांना विचारप्रवण करणारा ठरला आहे. 'पर्व’ प्रसिद्ध झाल्यापासून या कादंबरीवर उलट सुलट अनेक चर्चा घडल्या, आरोप-प्रत्यारोप केले गेले. परंतू तरीही पर्व महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभव देणारी कलाकृती ठरली.
-
I Dare Kiran Bedi
आय डेअर' हे किरण बेदींच्या व्यक्तीत्त्वाचे विविध पैलू प्रकट करणारे एक दमदार पुस्तक आहे. अंगी असलेले मूलभूत गुज अनुभवाने कसे अधिकाधिक विकसित होत गेले याचा प्रत्ययकारी आलेख वाचकांपुढे मांडला जातो. लहानपणापासून ते तिहार महानिरिक्षक पदापर्यंतचा प्रवास हा एका विजिगिषु वृत्तीचा निदर्शक आहे. किरण बेदींना मिळत गेलेल्या जबाबदार्या या नेहमीच कठीण होत्या. ज्या ठिकाणी परिस्थिती बदलणे अत्यंत कठीण आहे, वस्तुत: अशक्य आहे अशा ठिकाणीच त्यांना पाठवले गेले. परंतू समस्येचा अत्यंत सखोल अभ्यास व त्यावर आधारित कामांची आखणी यामुळे किरण बेदी नेहमीच यशस्वी ठरल्या. एखाद्या झंजावाताप्रमाणे परिस्थिती पालटून टाकण्याचे किरण बेदींचे सामर्थ्य थक्क करणारे आहे. संपूर्ण समाजाला, तरूण पिढीला आदर्शवत ठरणार्या या तेजस्वी व्यक्तीत्त्वाची ओळख करून देणारे प्रेरणादायी पुस्तक.
-
Five Point Someone (फाईव्ह पॉइंट समवन)
राष्ट्रीय स्तरावर 'बेस्टसेलर' ठरलेली हलकीफुलकी कादंबरी. या कादंबरीवर लवकरच चित्रपट बनणार आहे. तुम्हाला या पुस्तकात आयआयटी या भव्यदिव्य स्वप्नाची पूर्ती कशी करावी किंवा तिथे कसा प्रवेश मिळवावा किंवा तिथे कसं तरून जावं याचं मार्गदर्शन मिळणार नाही, पण जर तुमची विचारसरणी 'सरळ' नसेल तर तिथं काय घडू शकेल, ते मात्र नक्की समजेल ! अतिशय तरल विनोदाचा शिडकावा करतानाच अनेक सूक्ष्म गोष्टींवर नेमकं बोट ठेवणार्या ओघवत्या कथनशैलीतील वाचनीय कादंबरी. आयआयटी कॅम्पस व कॉलेज-जीवनाची पार्श्वभूमी लालेली ही कादंबरी तीन मित्रांची कथा सांगतानाच आजूबाजूच्या अनेक गोष्टींवर भाष्य करत वाचकाला खिळवून ठेवते आणि एका आगळ्या विश्वाचं भावपूर्ण दर्शन घडवते, ते सुद्धा हलक्याफुलक्या शैलीत. 'फाइव्ह पॉइंट समवन' हे पुस्तक लाट बनू शकेल. - आऊटलुक निखळ मौजेच्या या कादंबरीला दहापैकी दहा - द हिंदू चेतन भगत यांचे हे पहिलेवहिले पुस्तक तुम्हाला आयआयटीच्या मौजेच्या सफरीला नेते. - इकॉनॉमिक टाईम्स आयआयटीचा माजी विद्यार्थी असणारा लेखक त्याच्या पहिल्या कादंबरीत आपल्याला भारतातील सर्वात प्रतिष्ठित इंजिनिअरिंग संस्थांमधील विक्षिप्त व श्रेष्ठ मानणार्या जगताची झलक दाखवतो. - इंडियन एक्स्प्रेस
-
Popcorn
क्या बोलती तू...', 'क्या यार ?', 'सहीऽऽ ना ?', 'सुपर्ब...', 'अरे, चल ना...' अशी भाषा कधी, कशी आपल्या तोंडात बसली, आपल्यालाही कळलं नाही. 'बॉलीवूड-हॉलीवूड' शब्द जाता-येता कानांवर पडतात. आपलं बोलणं, वागणं, खाणं-पिणं, रोजचे कपडे, राहणीमान या सगळ्याच गोष्टींवर 'फिल्मी' छाप पडत चालली आहे. काहीतरी खटकतंय... बरंच काही हवंहवंसं वाटतंय असं हे भन्नाट विश्व ! आपलं सामान्यांचं स्वप्नांचं जग ! याच स्वप्नमयी-मोहमयी फिल्मी दुनियेतले 'पॉपकॉर्न' ! खुसखुशीत, टेस्टी, सऽऽही टाईमपास !
-
The Demon In The Freezer
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी, हजारो समर्पित माणसांच्या जागतिक पातळीवरील अथक परिश्रमांतून मानवजातीचा हजारो वर्षे संहार करणा-या देवीच्या रोगाचं उच्चाटन होऊ शकलं, पण गरज पडली तर असाव्यात म्हणून तत्कालीन दोन महासत्तांनी विषाणूंच्या काही कुप्या फ्रीजरमध्ये गोठवून ठेवल्या. आता हा देवीचा विषाणू पुन्हा अवतरण्याचा धोका दिसू लागला आहे. दहशतवादी गटांनी किंवा राष्ट्रांनी तो जीविक अस्त्र म्हणून वापरला तर मानवी इतिहासानं कधीही न पाहिलेला भीषण नरसंहार होईल. हे सगळं कळत असूनही आत्ता या क्षणी कोणीतरी त्या महाभयानक दैत्याला फ्रीजरमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे...
-
He Bandh Purane
हे बंध आहेत, पण बंधनं नाहीत. ना काळाची, ना भौगोलिक परिसीमांची, ना राजकीय पातळीवरील अपेक्षित-अनपेक्षित बदलांची. आज सहा दशकं लोटल्यानंतरही ज्या अर्थी हे बंध पुराणे झालेले नाहीत, त्या अर्थी कुठं तरी 'अंतरीची ओळख-खूण' पटलेली आहे. एकमेकांना विदेशी-परदेशी न मानण्याइतके आपण जवळचे आहोत. कितीतरी सोव्हिएत आणि रशियन कवी-कलावंतांनी या बंधांना आपापल्या कृतींमधून साज चढविलेला आहे. कवी रसूल गमझातव यांना स्त्रीच्या ललाटावरील कुंकुमतिलक हे तिचं ओळखपत्र वाटतं, तर स्व्यातस्लाव रेरिख यांना लक्ष्मीदेवता ही महन्मंगल सृजनाची मूर्ती वाटते. इल्या ग्लझुनोव या चित्रकारानं भारतीय राष्ट्रध्वजाच्या पाश्र्वभूमीवर आपल्या कुंचल्यानं पंडित नेहरू असे विलक्षणरित्या चितारले आहेत, की वाटावं आत्ता याच क्षणी ते हस्तांदोलनासाठी पुढं होतील. नुकताच उभय देशांच्या राजनौतिक संबंधांचा हीरकमहोत्सव साजरा केला गेला. त्या साठाच्या आकड्यावर पुढे आणखी कितीही शून्यं चढली, तरी हे बंध जुने होणार नाहीत. कधीच नाही.
-
Business Legend
जी. डी. बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, कस्तुरभाई लालभाई व जे. आर्. डी. टाटा या आपल्या आयुष्यातच 'आख्यायिका’ ठरलेल्या भारतातील चार महान उद्योगपतींच्या आयुष्याचा व अफाट कर्तृत्वाचा अत्यंत वेधक व विस्मयचकित करून टाकणारा पट येथे उलगडला आहे. ही या चार उद्योगमहर्षींची व्यक्तिचित्रं आहेत. त्यांचं व्यक्तिगत जीवन - त्यांच्या सवयी, जीवनशैली, त्यांची वैचारिक धारणा, अचूक निर्णयक्षमता, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, भोवतालचे ताणतणाव यांचे मनोज्ञ, दुर्मीळ रंग भरता भरता, त्यांच पायाभूत काम करण्याची जिद्द कशी अफाट होती, ब्रिटिश राजवटीत - प्रतिकूल परिस्थितीत कोणकोणते संघर्ष करीत त्यांनी उद्योग उभारले, अडचणींचे 'संधी’त रूपांतर करण्याचे त्यांचे सामर्ध्य किती प्रचंड होते, वैयक्तिक संपत्ती जमविण्याच्या पार पलीकडची त्यांची देशभक्तीमय उद्योजकता व आर्थिक राष्ट्रवादाची दुर्मीळ दूरदृष्टी किती प्रखर होती, याचे लेखिकेनं चैतन्यमय व गहिरे चित्र येथे रेखाटले आहे. त्यांच्या काळाच्या - देशाच्या राजकीय, आर्थिक, सामजिक ताणाबाणाच्या विस्तृत अवकाशावर हे चित्र उभं केलं आहे. हा या लेखनाचा विशेष आहे. लेखिकेनं आजवर अस्पर्श राहिलेल्या अनेक स्रोतांतून तपशील मिळवून संशोधनपूर्वक केलेलं हे लेखन नव्या उद्योजकांना प्रेरक ठरेल."
-
Radhey (राधेय)
"राधेय’ ही रणजित देसाईची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. "राधेय’च्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.
-
Timepass
टाईमपास’ ही एका अपरिमित उर्जा व धैर्य असलेल्या बुद्धीमान स्त्रीची कहाणी आहे. ही स्त्री स्वत:च्या मनाला पटेल त्याच प्रकारचं आयुष्य जगली, स्वत:च्या जबाबदारीवर जगली. ही विलक्षण स्त्री म्हणजे सुप्रसिद्ध मॉडेल आणि ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी. 1949 साली जन्मलेल्या प्रोतिमा बेदी यांचा मृत्यू 1998 साली एका दुर्दैवी अपघातात झाला.या अवघ्या 49 वर्षांच्या आयुष्यात त्या अतिशय वादात्मक आणि अपवादात्मक वेगळ्या घटनांनी व्यापलेलं जीवन जगल्या. 'टाईमपास’ बनलंय ते प्रोतिमा बेदींच्या आत्मचरित्रातील काही अंश, त्यांच्या रोजनिशीतला काही भाग, आणि त्यांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबिय, प्रियकर यांना लिहिलेल्या पत्रांवरुन 'टाईमपास मध्ये प्रोतिमा बेदींच्या अत्युत्कट स्मृती आहेत..... अगदी मुक्तपणे लिहिलेल्या. आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर 'वळण’ बनणार्या सगळ्या घटना प्रोतिमा बेदींनी अतिशय प्रामाणिकपणे आणि निर्भिडपणे मांडल्या आहेत. स्कॅन्डलस् मॉडेल, बिनधास्त तरुणी, समर्पित नृत्यांगना..... अशी प्रोतिमा बेदींची विविध रुपं 'टाईमपास’ मध्ये पाहायला मिळतात. हातचं काहीही राखून न ठेवता अतिशय मनमोकळेपणे मांडलेलं हे आत्मकथन आहे.
-
Ek Purn Aapurna
"डोळ्यांतले अश्रू पुसत मी एकदा डॉक्टरांकडे तर एकदा चैतन्याकडे पाहात होते. अनेक डॉक्टरांनी तर्हेतर्हेने माझा मानसिक छळ केला होता, त्यामुळे माझ्यातले काहीतरी संपून गेले आहे, मरून गेले आहे याची मला जाणीव झाली. पण त्याचं क्षणी माझ्या मनात जे रुतलं आहे ते फारच अनमोल आणि महत्वाचं आहे. एक प्रचंड ईर्षा आणि प्रचंड उर्जा माझ्या हृदयात एकवटली होती. तिने मला प्रत्येक संकटाला सामोरे जायचे सामर्थ्य दिले होते. एका आईच्या आत्मशक्तीने सगळीच्या सगळी वैद्यकिय भाकिते खोटी ठरवली होती!"