-
Sarvottam Ravindra Pinge
ललित लेखन हा साहित्यातील बहुधा सर्वात सोपा आणि तितकाच अवघड प्रकार असावा. कोणीही उठावं आणि कोणत्याही विषयावर लिहावं आणि त्यास ललित लेखन असं लेबल चिकटवावं, असं गेली अनेक वर्ष सुरू आहे. तरीही कसदार ललित लेखकांची परंपरा मराठीत मोठी आहे. याच परंपरेतील एक भारदस्त नाव रवींद्र पिंगे असं आहे. पिंग्यांचं गेल्याच वर्षी निधन झालं. त्यापूर्वीची सलग तीन-चार दशकं ते लिहीत होते. हे काम सोपं नाही. इतका प्रदीर्घ काळ सातत्यानं वाचकांना मोहून टाकणारं लिखाण करणं, ही एक तपश्चर्याच आहे. त्याचं कारण म्हणजे कथा-कविता-कादंबरी अशा कोणत्याही राजमान्य साहित्यप्रकाराऐवजी पिंगे हे केवळ ललित लेखनच करत राहिले आणि त्यातून त्यांनी स्वत:चा असा विशिष्ट वाचकवर्ग तयार केला. पण पिंगे हे केवळ लेखकच नव्हते. तर ते एक साहित्यकर्मी होते. अनेक साहित्यिक उपक्रमांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि अनेकांना लिहितं करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. पिंग्यांनी नोकरी केली ती आकाशवाणीत. त्यानिमित्तानं त्यांचा अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांशी संबंध आला. शिवाय, पिंग्यांना प्रवासाची आवड होती आणि चांगलंचुंगलं खाण्याचीही. वाचन हा तर त्यांचा केवळ छंद नव्हे, तर त्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य घटक होता. त्यातून त्यांचं आयुष्य कमालीचं समृद्ध होत गेलं. हेच अनुभव पिंगे शब्दबद्ध करत गेले आणि त्यातून एक मोठा लेखक निर्माण झाला.
-
College
या कॉलेजमध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी आहे. डिपार्टमेंट सुरू मी करायचं. एस्टॅब्लिश मी करायचं. मग हळूच कोणीतरी संधिसाधू मतलबी वाकडेबाई गरजू म्हणून, लाचार बनून येणार आणि शिरजोर होऊन टेकओव्हर करणार. विद्यार्थी आपण जमवायचे. तुकड्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. मग तथाकथित संस्थाचालक आणि प्राचार्य आपल्यापुढं गोंडा घोळणार्या माणसांची अध्यापक म्हणून वर्णी लावणार. रिझल्ट उत्तम लागावेत म्हणून आपण मरमर करणार. रजा न घेता एस्ट्रॉ क्लासेस घेणार. नोट्स देणार. त्यातून तुकडी तयार होणार. त्या तुकडीला हे नवे लोक शिकवणार. उत्तम शिक्षक म्हणून आपलाच उदो उदो करायला विद्यार्थ्यांना चलाखीनं प्रेरित करणार. इतकं सगळं किळसवाणं आहे,ओंगळ आहे... या सगळ्याची चीड येत नाही तुम्हाला, सर ? तुम्ही अजूनही पक्क्या मुरलेल्या प्राध्यापिका झाला नाहीत. अजून अनुभव येतील. मग इतकी चीड येणार नाही. फक्त असहाय्यता जाणवेल. तीही आपण काही करू शकत नाही याची ! सगळेजण एकच गोष्ट सांगतील. सगळ्या कॉलेजमध्ये असंच चालतं. पुढं पुढं आपलीही खात्री पटते की, सगळीकडे हेच चालत असेल तर भल्याभल्यांनी हात टेकले असणार. त्यामुळे तुम्हाला एक पोक्त सल्ला देतो, तुमचं करियर पाहा." सध्याच्या महाविद्यालयीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख काढणारी आणि अंतर्मुख करणारी सामर्थ्यशाली कादंबरी.
-
Shala Aahe Shikshan Nahi
खेड्यांपर्यंत, आदिवासी पाड्यापर्यंत शाळेची इमारत पोचली. पण शिक्षण पोचलं का? शाळेच्या वर्गात पोरं बसली. शाळा भरली. पण पोरं शिकली का? शाळेत जाऊनही मुलं निरक्षर का? अनुदान असूनही आश्रमशाळेत लेकरं उपाशी का? अनागोंदी कारभार आणि आदिवासी भागातील प्राथमिक शिक्षणाच्यादुरवस्थेचा शोध घेणारी एका कार्यकर्त्याची शोधयात्रा... भर पावसाळ्यात गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, नंदुरबार, यवतमाळ, नांदेडजिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये जाऊन घेतलेला शिक्षणाचा हा शोध... शाळा आहे पण शिक्षण नाही ! हे कटू सत्य अधोरेखित करणारा...वाचकाला अस्वस्थ करत शैक्षणिक प्रश्नांविषयी जागा करणारा लेखजोखा...
-
Sat Na Gat
श्री. राजन खान हे आजचे महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. ते चांगले स्टोरीटेलर आहेतच, पण लेखकाने लिहिताना ज्या अर्थाने निर्दय व्हायचे असते, तसे ते फार जोरकसपणे होतात. ते त्यांच्या पात्रांत भावनिकदृष्ट्या अडकत नाहीत. त्यांच्या प्रेमात पडून अनुभवातला दाह ते निष्कारण कमीजास्त करीत नाहीत. एखाद्या स्थिर चौकटीतल्या चित्राची ओळख करून देण्याच्या पद्धतीने ते सुरुवात करतात आणि भराभर फटकारे मारत भरदार स्केच करीत जावे तशी पात्रे उभी करतात. त्यांची समूहचित्रणेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. नामी नावाच्या बलात्कारित स्त्रीची गोष्ट सांगता सांगता ते आपल्या एकूण सामाजिक वास्तवाचा खेळ उभा करतात. स्वार्थ आणि हितसंबंध राखणार्या खेळ्या सारे जण आपापल्या कुवतीनुसार खेळत असताना एखाद्याच्या सुखदुःखाला कवडीइतकेही मोल उरत नाही याचा प्रत्यय देऊन आपल्याला अस्वस्थ करतात, अंतर्मुख होण्याला प्रवृत्त करतात. एका घटनेचे धागेदोरे उभे करता करता खूप मोठा पट आपल्यासमोर साकार करणारी व समकालीन वास्तवाचे अतिशय भेदक चित्रण करणारी `सत ना गत’ ही आजची एक महत्त्वाची कादंबी आहे हे निःसंशय.
-
Jagaychay Pratyek second
डॉ. यशवंत केवळे, चर्मकार समाजातला तरुण. बूटपॉलिश करत, रेल्वेत तर्हर्हेच्या वस्तू विकत आणि नाना नोकर्या पत्करत त्यानं शिक्षण पूर्ण केलं. तो तेवढ्यावरच थांबला नाही, त्यानं अनेक कला, छंद जोपासले. रसिकतेनं जगला. आपल्या परिसराला सभ्यता शिकवण्याचा प्रयत्न केला.. आणि एका छोट्या अपघाताचं निमित्त होऊन मरण पावला. त्याच्या पत्नीनं कथन केलेली त्यांच्या सहजीवनाची ही कहाणी.