-
Baluchya Avasthantarachi Diary (बाळूच्या अवस्थांतर
भूतकाळाची काळी, काटेरी, टोकदार सावली वर्तमानावर पसरलेली असते- आपल्याला जरी भान असलं, नसलं, तरी! वर्तमानातल्या घटनांची, व्यक्तीच्या स्वभावाची, वर्तनाची मुळे खूप खोलवर आत आत भूतकाळात रुजलेली असतात. आपली आपल्यालाही त्याची जाणीव नसते. प्रोफेसर भांगरे, त्यांची आई, बायको आणि 3 मुली यांची गोष्ट म्हणजे ही कादंबरी. भांगरे यांच्या वर्तमान काळामध्ये काही गोष्टी घडत आहेत. त्यांना वाटत की भूतकाळा मध्ये पण अशा गोष्टी घडल्या आहेत आणि त्याची मुळे वर्तमान काळामध्ये रुजली गेलेली आहेत. मुली ,त्यांची प्रेम प्रकरण, लग्न आणि त्यांचा सामाजिक प्रभाव, जातिव्यवस्था, मध्यमवर्गीय माणूस आणि समाजाला घाबरून जाऊन तो करत असलेला विचार म्हणजे ही कादंबरी. रंगनाथ पठारे यांच्या पुस्तकांची खास बात म्हणजे त्याची शीर्षक आणि पूर्ण पान भरून असणार एकच वाक्य. तरीही ही वाक्यं कुठे कंटाळवाणी अजिबात होत नाहीत.
-
Akherche Shiledar (अखेरचे शिलेदार)
अखेरचे शिलेदार या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय, मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पाश्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी. या पुस्तकातले शिलेदार आपल्याला एक प्रश्न विचारतात : 'स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?' त्यांच्यासाठी केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र् नव्हतं. १९४७ नंतरही त्यांचा संघर्ष सुरुच राहिला.
-
Ambedkar Jivan Ani Varsa (आंबेडकर जीवन आणि वारसा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आज सर्वांत आदरणीय भारतीयांच्या नामावलीत घेतलं जातं आणि देशभरातील त्यांच्या पुतळ्यांची संख्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांखालोखाल असेल. किंबहुना, आधुनिक काळातील 'सर्वांत थोर भारतीय' ठरवण्यासाठी अलीकडे एक मतचाचणी घेण्यात आली, त्यात दोन कोटींहून अधिक मतं नोंदवली गेली आणि त्यात आंबेडकरांना गांधींपेक्षा जास्त मतं मिळाली होती. आज सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आंबेडकरांवर हक्क सांगण्यासाठी चढाओढ सुरू असते. मुख्यत्वे आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आली आणि दलित समुदायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यामुळे दलित समूहांमध्ये ते एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो. व्यक्तीच्या अधिकारांची पाठराखण करणाऱ्या व दडपलेल्यांची उन्नती साधू पाहणाऱ्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, अनेकत्ववादी मूल्यांसह भारत आजपर्यंत लोकशाही म्हणून टिकला, त्याचं मुख्य कारण संविधान हे आहे (पण सध्या ही सर्व मूल्यं संकटात अडकली आहेत). 'डॉ. आंबेडकरांची थोरवी केवळ एकाच उपलब्धींपुरती मर्यादित मानता येत नाही, कारण सर्वच बाबतीत त्यांनी सारखीच असामान्य कामगिरी केली,' असं शशी थरूर लिहितात. आंबेडकरांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट प्रस्तुत चरित्रात संक्षिप्तपणे, सुबोधपणे, मार्मिकपणे व आदरभावाने उलगडला आहे.
-
Mi Gita Aahe (मी गीता आहे)
भगवद्गीतेच्या सायकोलॉजीवर एक अभूतपूर्व व्याख्या युद्ध सुरू होण्याआधी अर्जुन कृष्णांना सांगतो, राज्य मिळवण्यासाठी ना मला भावांना मारायचे आहे, ना हिंसा करायची आहे. शिवाय, धर्मशास्त्रदेखील याची अनुमती देत नाही. तुम्ही अर्जुनाच्या विचारांशी सहमत आहात का? तर मग कृष्ण अर्जुनाच्या विचारांशी सहमत का झाले नाही? कृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्यास प्रवृत्त केले की त्याला योग्य मार्ग दाखवला? युद्ध आणि हिंसा करण्यामागेही सबळ कारणं असू शकतात का? कोण बरोबर आहे? कृष्ण की अर्जुन? कृष्णांना गीता अठराव्या अध्यायांपर्यंत का सांगावी लागली? जसं गीता एक, प्रश्न अनेक आहेत... तसंच जीवनही एक आहे, प्रश्न अनेक आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं गीताच देऊ शकते. कारण कृष्ण हे मनुष्यजातीचे पहिले ‘सायकोलॉजिस्ट’ आहेत, तसेच ‘स्पिरिच्युअल सायकोलॉजी’च मन व जीवनातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं देऊ शकते. पण गीतेच्या सायकोलॉजिकल बाजू नेहमीच दुर्लक्षित केल्या गेल्या. मी गीता आहे, भगवद्गीतेची पहिली अशी व्याख्या आहे जी समस्त 700 श्लोकांचे ना केवळ ‘स्पिरिच्युअल’ तर संपूर्ण ‘सायकोलॉजिकल’ सार समजावते. यातून आपण गीतेचं सार एका सुंदर गोष्टीच्या माध्यमातून कृष्ण आणि अर्जुन यांच्याकडून ‘लाइव्ह’ समजून घेत आहोत असं वाटतं. दीप त्रिवेदी हे “मैं कृष्ण हूं”, “मी मन आहे” तसंच “सर्वकाही सायकोलॉजी आहे” बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक, गीतेवर 168 तास प्रदीर्घ वर्कशॉप्स घेणारे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड होल्डर आहेत. भगवद्गीतेची सायकोलॉजीवर केलेल्या कार्यांसाठी ‘ऑनरेरी डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित आहेत.
-
Sattechya Padchhayet (सत्तेच्या पडछायेतून)
यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह राव अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिव म्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द व्यतीत केलेले राम खांडेकर. सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना खांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या. राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले. मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता खांडेकरांनी हरवू दिली नाही, ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला. यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला तो आपल्या सचोटीच्या बळावर. निजी सचिव असूनही ते ‘होयबा’ झाले नाहीत, प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर. ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेला अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनी रसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र.
-
Tikasvayamvara (टीकास्वयंवर)
डॉ. भालचंद्र नेमाडे यांना १९९१चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचे समजले. टीकास्वयंवर हा समीक्षालेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरून व मुलाखतीवरून डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे... आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे. एकूण डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी वस्त्रहरण करणारे असले तरी आजच्या वाङ्मयीन संस्कृतीचे कुंठितपण घालविण्यासाठी आणि तिला योम्य दिशा कोणती व का हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे, यात शंका नाही. त्यांना अभिप्रेत असलेली भाषिक कृती डॉ. नेमाडे आपल्या कादंबऱ्यांतूनच नव्हे तर आपल्या समीक्षाविचारांतून जबाबदारीने व चोखपणे करीत आहेत. - म. द. हातकणंगलेकर रविवार सकाळ, २२ डिसेंबर १९९१ रा. श्री. जोग स्मृति पुरस्कार १९९० ह. श्री. शेणोलीकर पुरस्कार १९९० साहित्य अकादमी पुरस्कार १९९१
-
Hirabai Badodekar (हिराबाई बडोदेकर)
ही कथा आहे एका सावळ्याशा कृश मुलीची.. शंभर वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कलाविश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या एका दीपकळीची… ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर यांची. सभ्य घरांतील स्त्रिया जेव्हा जाहीरपणे गात नव्हत्या त्या काळात तिकीट लावून आपला जाहीर जलसा करणारी ही पहिली धाडसी गायिका ! आपल्या गाण्याच्या हिमतीवर २० जणांच्या चमूला घेऊन पहिला ‘फॉरेनचा दौरा करणारी, भारताबाहेर पाऊल टाकणारी ही पहिलीच गायिका. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व क्षेत्रांत आपली मोहर उमटवून ‘सात्त्विक, सोज्वळ गायिकेचा’ आदर्श घालून देऊन ‘स्त्रियांचे घराणे’ निर्माण करणाऱ्या हिराबाई बडोदेकर. डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्यावर हे ललित चरित्र लिहिताना केवळ एका कलाकार स्त्रीचे वैयक्तिक आयुष्य नव्हे, तर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या हिंदुस्थानी संगीतजगताचा एक आलेख मांडला आहे. सत्य आणि कल्पित यांचा हा ‘ख्याल’ आहे… हिराबाईंच्या गाण्यासारखाच सुरेल ! – डॉ. चैतन्य कुंटे
-
Hava Havai (हवा हवाई)
हवाई बेटसमूहाची सर्वसामान्यांमधली ओळख एका बाजूला नितांतसुंदर, निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून असते, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचं पन्नासावं घटकराज्य म्हणून जगाच्या नकाशावरचं त्याचं स्थान काहीसं अपरिचित असतं…. मात्र, एवढं निश्चित की ‘हवाई बेट’ हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. हे कुतूहल या पुस्तकातून अनेक अंगाने शमवलं जातं. हवाई बेटांची मूळ पॉलिनेशियन संस्कृती, राजकीय इतिहास, लोक-संस्कृती, तेथील निसर्गसौंदर्य आणि त्यातील वैविध्य या सर्वांची सविस्तर ओळख या पुस्तकातून होते. ही ओळख करून देता देता आजवर त्रेपन्न देशांची भ्रमंती केलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक हे जगप्रसिद्ध लेखक विचारवंत मार्क ट्वेन, कॅ. जेम्स कुक अशा हस्तींच्या तेथील वास्तव्याचा मागोवा घेतात. तसेच अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांची जन्मभूमी म्हणूनही ते ‘हवाई’कडे दृष्टिक्षेप टाकतात आणि तेथील स्थलांतरित भारतीयांचीही माहिती देतात. दुसऱ्या महायुद्धातील ‘पर्ल हार्बर’वरील जपानचा हल्ला तेथे म्युझियमरूपात कसा ‘जीवंत’ आहे, हेही नाईक पुस्तकात सांगतात. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य असं की लेखकाचं तेथील दीर्घ वास्तव्य आणि त्या वास्तव्यादरम्यान पाहिलेलं, अनुभवलेलं, अभ्यासलेलं ‘हवाई’ ते आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. हवाईचा सर्वस्पर्शी छोटेखानी एन्सायक्लोपेडिया… हवा हवाई!