-
Doglapan (दोगलापन)
माझ्या आयुष्यात नायक, खलनायक, चरित्र कलाकार आणि अशा बऱ्याच जणांचा वाटा आहे. ही माझी खरी जीवन कहाणी आहे, जिने मला अनुभवसमृद्ध केले, अकाली पांढरे केस दिले, माझे खरे मित्र आणि हितचिंतक कोण याबद्दल सावध केले आहे; अपयशात यश आणि यशात अपयश यांचे 'दोगलापन' याविषयी बरेच काही शिकवले आहे; त्याचबरोबर जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे याची सखोल समज दिली; आणि हे सांगण्याची खरं तर गरज नाही, पण जीवनाने अनपेक्षितरीत्या भिरकावलेल्या अनेक चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याची पुरेशी संधी दिली. - अश्नीर ग्रोव्हर दिल्लीच्या मालवीयनगरमध्ये वाढलेला, 'निर्वासित' म्हणून संबोधला गेलेला एक तरुण शैक्षणिक उत्कृष्टतेच्या शिखरावर असणाऱ्या भारतातील आयआयटी दिल्लीमध्ये रँक - होल्डर बनून परिस्थितीवर मात करतो. आयआयएम अहमदाबादच्या अत्यंत आदरणीय संस्थेमधून एमबीए केल्यावर एमएक्स, कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये गुंतवणूक बँकर म्हणून तो करिअर घडवतो आणि ग्रोफर्सचा सीईओ तसेच भारतपेचा संस्थापक म्हणून या दोन कंपन्यांना युनिकॉर्न बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. अश्नीर यांच्या आयुष्यात उलथापालथ होत असतानाही शार्क टँक इंडिया या लोकप्रिय टीव्ही शोमधील एक परीक्षक या नात्याने त्यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. विवाद, मीडिया स्पॉटलाइट, सोशल मीडियावरील वाचाळवीरांमुळे काल्पनिक गोष्टींपासून सत्य वेगळे करणे कठीण असते. स्टार्टअप इंडियाचा आवडता आणि गैरसमज झालेला पोस्टर बॉय अश्नीर ग्रोवर यांची ही नि:संदिग्ध कथा आहे. निर्मळ प्रामाणिकपणाने आणि अतिशय मनापासून सांगितलेल्या कथेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.
-
Warren Buffett (वॉरन बफे)
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं… लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं… ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन… जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू. व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे. त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.
-
Doctors Form Hell (डॉक्टर्स फ्रॉम हेल)
दुसऱ्या महायुद्धात नाझी राजवटीने मानवतेवर केलेले भीषण अत्याचार सांगणारी ही अधिकृत सत्यावर आधारलेली कहाणी आहे. न्यूरेम्बर्ग येथे नाझी डॉक्टरांवर युद्धगुन्ह्यांसाठी जो खटला चालवला गेला त्याचे अमेरिकी लष्करातर्फे वार्तांकन करणाऱ्या स्त्रीने ही डोळ्याने पाहिलेली कहाणी सांगितलेली आहे. शास्त्रीय संशोधन अन् देशभक्ती यांच्या बुरख्याखाली निरपराध व्यक्तींचा छळ आणि खून करण्यात आले. डॉक्टर्स फ्रॉम हेल यामध्ये काही आम जनतेला उपलब्ध नसलेली खटल्याची कागदपत्रेही समाविष्ट केलेली आहेत; तसेच या खटल्यात पुरावा म्हणून सादर झालेले, आजवर प्रकाशात न आलेले फोटोही दिलेले आहेत. यात लेखिकेने बॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या, धोकादायक असलेल्या युद्धानंतरच्या न्यूरेम्बर्ग शहरात राहतानाचे अनुभव सांगितलेत. खटल्यावर काम करताना तिचे तिथे अठरा महिने वास्तव्य होते. एकदा एका नाझी माथेफिरूने ती राहत असलेल्या हॉटेलवर बॉम्ब टाकला. काही क्षणातच ती तिथे जेवण्यासाठी पोहोचणार होती. या पुस्तकात ती आपल्याला प्रत्यक्ष खटले चालू असलेल्या न्यायालयाच्या सभागृहात नेते, साक्षीदारांनी दिलेले जबाब ऐकवते, बळींच्या प्रतिक्रिया, त्यांचे राग-लोभ आदी भावना शब्दांतून आपल्यापर्यंत पोहोचवते. तिथे नरसंहारातून वाचलेले कैदी आपल्यावर केलेल्या प्रयोगांच्या कहाण्या सांगतात, त्यांना प्राणवायूपासून वंचित केले गेले, बर्फात ठेवले गेले, त्यांना मलेरिया, टायफस, कावीळ आदी रोगांचे जंतू टोचले गेले, त्यांचे निरोगी हातपाय कापले गेले. त्यांना सक्तीने दिवसेंदिवस फक्त समुद्री पाण्यावर ठेवले गेले. असे अनेक अत्याचार केले गेले. या ऐतिहासिक खटल्याची परिणती म्हणून नंतर न्यूरेम्बर्ग कोड लिखितस्वरूपात अस्तित्वात आले. मानवावर वैद्यकीय संशोधन करताना कोणती नीतिमूल्ये पाळावित याची मार्गदर्शक तत्त्वे त्यात ठरवलेली आहेत. ही कादंबरी दुसऱ्या महायुद्धावरील साहित्यात महत्त्वाची भर घालते; तसेच नरसंहार, मानवी हक्क, वैद्यकीय नीतिमूल्ये आणि एकूणच मानव किती पशुत्वाच्या पातळीवर घसरू शकतो याबद्दलही सांगते.
-
Sitayan (सीतायन)
लोकसाहित्याच्या जेष्ठ अभ्यासक डॉ . तारा भवाळकर या नेहमीच लोकसंस्कृतीचा अभ्यास मातृसंस्कृती म्हणून करत आल्या आहेत . एकूणच लोकसाहित्याची स्त्रीवादी अंगाने त्यांनी केलेली मांडणी लक्षणीय आहे . त्याच अनुषंगाने सीतेच्या वेदनेचा विद्रोहाचा जो सूर त्यांना वेगवेगळ्या लोकरामायणांत सापडला ,त्याचा मागोवा म्हणजे हे सीतायन !
-
You Are The Best Wife (यू आर द बेस्ट वाइफ)
ही गोष्ट त्या दोघांची ज्यांचे विचार आणि आदर्शवादी तत्त्व परस्परविरोधी असतात; पण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोघेही बदलतात, जास्त छान बनतात. जगाकडे बघायची त्यांची दृष्टी एकमेकांमुळे बदलून जाते. दोघे सुखात, आनंदात असतात ; पण दैवाची योजना काही वेगळीच असते. लेखकाची ही स्वत:ची आत्मकथा आहे. संसाराच्या सुखी प्रवासात प्रिय पत्नीचा हातातला हात अर्ध्यावरच सुटून गेल्यावर एकटं जगताना त्याने आयुष्याशी केलेला संघर्ष यात आहे. सोबत असतात केवळ जाताना तिने तू सर्वोत्तम पती आहेस, हे काढलेले उद्गार. तिचे हे शब्द त्याला बळ पुरवतात. आपलं 'प्रेम करण्याचं' वचन ती गेल्यावरही पूर्ण करायला. अत्यंत प्रामाणिकपणे, विनोदाचा प्रसन्न शिडकावा करत सांगितलेली ही एका उबदार प्रेमाची गोष्ट आहे. तो आणि ती, प्रेमात आलेले सगळे अडथळे कसे पार करतात, एकमेकांच्या साथीने कडू-गोड अनुभवांना कसे सामोरे जातात, अजय आपलं प्रेम कसं निभावतो हे वाचताना आपलाही प्रेमावरचा विश्वास पुन्हा एकदा पक्का होतो.
-
Chanakyaniti (चाणक्यनीती)
मगध देशाच्या नंद राजाच्या राजसत्तेचा सर्वनाश करून त्या जागी तीव्र बुद्धिमत्तेच्या शूर चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवणारे आचार्य विष्णुगुप्त चाणक्य हे कुशल राजनीतिज्ञ, आचार-विचारांचे मर्मज्ञ आणि कूटनीतीतील सिद्धहस्त म्हणून प्रसिद्ध आहेत. अभिजात संस्कृत साहित्यातील नीतिपर चाणक्यनीती समाज, राजकारण, धर्म आणि कर्माविषयी मार्गदर्शन करते. प्राचीन काळी लिहिलेल्या चाणक्यनीतीतील जीवनमूल्ये आजही तितकीच कालसुसंगत आहेत. वर्तमान परिस्थितीचे भान ठेवून चाणक्यनीतीतील ३२५ सूत्रांवर केलेले हे भाष्य आधुनिक युगातील मानवासाठी पथदर्शक ठरते.
-
Shunya (शून्य)
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी 'शून्य' ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता, तसेच वास्तव आणि भ्रम गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते. सखोल ज्ञानावर आधारित अतिशय संयत असे हे कथाकथन आपल्याला 'शून्या' च्या प्रांतात घेऊन जाते. शून्यतेच्या अशा एका विश्वात जेथे गहिरी आणि चिरस्थायी शांतता सदैव नांदत असते; ही असीम शांतताच सर्व गोष्टींचे उगमस्थान आणि शेवट आहे. केरळमधील एका छोट्या, शांत उपनगरात तो अचानक कुठूनतरी अवतरला. तो स्वतःला 'शून्य' म्हणवतो, झिरो. परंतु तो नक्की आहे तरी कोण? एक वेडसर मनुष्य? काळी जादू करणारा मांत्रिक? कोणी एक लुच्चा? की एक अवधूत, एक साक्षात्कारी महापुरुष? सामी नावाने ओळखली जाणारी ही व्यक्ती एका स्थानिक ताडी विक्री केंद्राच्या पाठीमागच्या अंगणातील छोट्या झोपडीमध्ये राहू लागते. तिथे ती व्यक्ती बोधकथा सांगते, आशीर्वाद देते, शिव्याशाप देते, काळ्या चहाचे असंख्य पेले रिचवते आणि सर्वार्थाने मुक्त असे आयुष्य जगते. क्वचित प्रसंगी आपल्या बांबूच्या जुन्या बासरीतून मन मोहून टाकणारी संगीतनिर्मिती करते. कालांतराने, ज्या गूढ प्रकारे तो अवतरला तशाच पद्धतीने एका नवीन कालखंडाची मुहूर्तमेढ रचून एक नवा साहसी मार्ग निर्माण करून 'शून्य' एकाएकी नाहीसा होतो.
-
Phiruni Navi Janmen Mi (फिरुनी नवी जन्मेन मी)
आयुष्याच्या एका उदात्त क्षणी भेट होते , तिचे रुपांतर जन्मोजन्मीचा सोबतीपणाच्या निश्चयात होते . परंतु नियतीने काही वेगळेच ठरविलेले असते . दोन भिन्न दिशांना दोघांचा प्रवास होतो . एका अश्याच क्षणी पुन्हा हे दोन्ही रस्ते भेटतात . परंतु त्यावेळी भावनेचा ओलेपणा आटून गेलेला असतो आणि पुढचा रस्ता धुसर दिसतो . अश्या कसोटीच्या वेळी एवढेच सांगता येते. …. फिरुनी नवी जन्मेन मी . एका समाजकार्य करणाऱ्या ध्येयवेड्या स्त्रीची हि जीवनकथा व्यक्त करणारी कादंबरी वाचकांना भावोत्कट करते आणि मनाला हुरहूर लावते .
-
Mosad (मोसाद)
जगातील अन्य कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा इस्रायलच्या मोसादइतकी मिथक आणि रहस्यांनी वेढलेली नाही. सीआयएने 'जगातील सर्वोत्कृष्ट गुप्तचर संस्था' असे मोसादबद्दल उद्गार काढलेले आहेत. मोसादचे नाव निघाले की, इस्रायलचे मित्र आदराने बघतात तर शत्रूच्या मनात भय उत्पन्न होते. खरंतर १९४०मधील इस्रायलच्या निर्मितीपासून, मोसाद हे त्यांच्या जगण्याच्या सततच्या संघर्षातले महत्त्वाचे शस्त्र आहे.
-
Atal-Avichal (अटल-अविचल)
ब्रिटिश काळातल्या गोऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका अर्थाने विपुल असं लेखन केलेलं आढळतं. यापैकी काही लेखन ब्रिटिश प्रशासनाला साहाय्यभूत ठरणारं असं होतं, उदाहरणार्थ ‘अँडरसन मॅन्युअल'. हे पुस्तक तर आजही महसूलातलं बायबल आहे. काही गोऱ्या साहेबांनी भारतीय संस्कृतीबद्दल, भारतीय इतिहासाबद्दल, भाषांबद्दल कुतुहल दर्शवून त्या संदर्भात बरचसं लिखाण केलं आहे. काहींनी सामाजिक अंगानेसुद्धा लिहिलं आहे. अन्य ब्रिटिश लेखकांनीसुद्धा तत्कालिन समाज, भारतीय माणसाची मनोवृत्ती, राजे-महाराजे यांच्या सवयी इत्यादींबद्दल लिहिलेलं आहे. तद्नंतर, भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी काहीएक महत्त्वाचं लेखन केलेलं आहेच. याच परंपरेमध्ये आता ‘अटल-अविचल' या डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या आत्मकथनाची भर पडलेली आहे. औरंगाबादल विभागीय आयुक्त कार्यालयात मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे. शिस्तप्रिय, पद्धतशीर काम करणारा (चशींहेवळलरश्र) आणि स्वच्छ चारित्र्याचा अधिकारी म्हणून डॉ. दिपक म्हैसेकरां ओळख सर्वत्र प्रचलित होती. ‘अटल अविचल' मध्ये त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची कहाणी रसपूर्ण भाषेत आणि ओघवत्या शैलीत सांगितली आहे. महसूल विभागाच्या सर्वोच्च पदाला स्पर्श करताना आलेल्या अनेक अवघड प्रसंगात ते अटल आणि अविचल राहिले याचा त्यांना रास्त अभिमान आहे. त्यांचं हे आत्मकथन अनेक अंगांनी वाचनीय, स्मरणीय असं असून महसूल विभागामध्ये ‘अटल' राहण्याची काय किंमत मोजावी लागते याचा लेखाजोखा या कथनात अतिशय प्रांजलपणे मांडलेला आहे. इतकंच नाही तर, डॉ. म्हैसेकर यांनी मराठी रसिकवाचकाला या प्रशासनातल्या आंतरविश्वाचं समर्थपणे दर्शन घडविलं आहे. त्या योगे मराठी साहित्यविश्वातील आत्मकथनाच्या परंपरेत मोलाची भर पडलेली आहे.
-
Badalata Bharat Khand - 2 (बदलता भारत खंड -२)
भारताचे बहुरूपदर्शक आणि समग्र चित्र रेखाटणारा संदर्भग्रंथ ! आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे. असे स्वातंत्र्य आहे की जे जगात सर्वाधिक वर्चस्वशाली असणार्या ब्रिटिश सत्तेविरुध्द इथल्या कोट्यवधी जनतेने अथक संघर्ष करून मिळवले. जगाच्या इतिहासातील एक महान मुक्तिपर्व. एक असा गौरवशाली स्वातंत्र्यसंग्राम की ज्याने आधुनिक भारताला जन्म दिला आणि जगाच्या इतिहासावर आपली छाप उमटवली. असा इतिहास की ज्याने प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीची मान आजही उंचावते. या साऱ्याला मनोविकास प्रकाशन अभिवादन करत आहे 'बदलता भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे... ' या आपल्या महाग्रंथाद्वारे! विविध नामवंत लेखकांनी स्वतंत्र दृष्टिकोनांमधून आणि आपापल्या परिप्रेक्ष्यांतून भारतीय जीवनाच्या विविध क्षेत्रांचे आणि पैलूंचे केलेले परखड विश्लेषण! ज्यातून आपल्या समोर येतो भारताच्या भविष्याची निश्चित अशी दिशा उलगडणारा महाग्रंथ!! भारताचे विविधांगी, बहुरूपदर्शक [कॅलिडस्कोपिक] आणि तरीही समग्र चित्र समोर ठेवणारा असा हा महाग्रंथ प्रत्येक देशप्रेमीने आवर्जून वाचलाच पाहिजे !!!
-
Nyay (न्याय)
खोटं बोलणं है नेहमीच वाईट असतं का? व्यक्तिस्वातंत्रयाला काही मर्यादा असली पाहिजे का? अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खुन करावा लागल्याच समर्थन करता येऊ शकेल का? मुक्त बाजारपेठ खरंच मुक्त आहे का? विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारणं न्याय्य आहे का? मायकल सँडेल या पुस्तकातून आपल्या प्रत्येकाला भेडसावणाच्या या रोजच्या आयुष्यातील नैतिक प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानातील वेगवेगळे सिदधान्त वाचकांसमोर अगदी सोप्या आणि दैनंदिन व्यवहारातील उदाहरणं देत उलगड़न दाखवले आहेत. आजच्या काळातील मानवजातीसमोरील हे नैतिक पेच सोडवण्यासाठीची सँडेल यांची ही खास शैली बोजड राजकीय तत्तवज्ञानाला रंजक तर बनवतेच शिवाय वाचकांनाही स्वतःची मुल्यव्यवस्था नव्याने तपासून पाहायला भाग पाडते. हे अवघड कार्य सँडेल इतक्या ओघवत्या शैलीत पार पाडतात की वाचकाला ही प्रकरण म्हणजे आपल्या आवडत्या लेखकाचा कथासंग्रह नसून राजकीय तत्त्वज्ञानाचं रूक्ष अकादमिक लिखाण आहे, याचा विसर पड़ायला लागतो.
-
Hercule Poirot's Christmas (हर्क्युल पायरोज ख्रिसम
ख्रिसमसची पूर्वसंध्या. ली कुटुंबाचे सर्व सदस्य एकत्र आले आहेत. आणि अचानक फर्निचर तुटण्याच्या त्या कानठळ्या बसवणार्या आवाजानं आणि पाठोपाठ आलेल्या जीवघेण्या किंकाळीनं रंगाचा बेरंग होतो. उत्सवी वातावरणावर पाणी पडते. दुसर्या मजल्यावर जुलमी सायमन ली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. गळा चिरलेल्या अवस्थेत. त्याचवेळी हर्क्युल पायरो आपल्या मित्राकडे ख्रिसमस साजरा करण्यासाठी खेडेगावात आलेला असतो. त्यानं जेव्हा मदतीचा हात पुढे केला तेव्हा त्याला शोकाकुल वातावरण नव्हे, तर कुटुंबातील सगळे सभासद एकमेकांकडे संशयी वृत्तीने पाहत असल्याचे दिसते. जणू काही त्या म्हातार्याचा द्वेष करण्यासाठी प्रत्येकाकडे स्वतंत्र कारण होतं...