-
The Racketeer (द रॅकेटीअर)
माल्कम हा कादंबरीचा ४३वर्षीय, कृष्णवर्णीय वकील असलेला नायक. ‘माजी मरीन्स’अशीही त्याची ओळख असते. या सरळमार्गी व हुशार वकिलावर तुरुंगात जाण्याची वेळ येते. त्याचं कौटुंबिक, व्यावसायिक जीवन धोक्यात येतं. पाच वर्षांनंतर माल्कमला सुटकेचा मार्ग दिसतो. ‘जज फॉसेट’ व त्याची सेक्रेटरी ‘मिस क्लेअर्स’ यांचा खून होतो. याचा फायदा माल्कमला तुरुंगातून सुटण्यासाठी होतो. तो खुन्याचं नाव सांगतो आणि कायद्यातील तरतुदीनुसार त्याची तुरुंगातून सुटका होते. प्लॅस्टिक सर्जरीने चेहरा बदललेल्या आणि नावही बदललेल्या माल्कमच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू होतो. चित्रपट निर्माता म्हणून वावरत असताना तो नाथन कूले या व्यक्तीवर माहितीपट बनवतोय, हे दाखवून नाथनकडून लपवलेलं सोनं कुठं आहे, हे जाणून घेऊन ते मिळवतो. ते सुरक्षित बँकेत ठेवतो. एकूण कसा रंगतो माल्कमच्या जीवनाचा हा नवीन अध्याय? थरारक वळणांनी पुढे सरकत राहणारी एका वकिलाच्या बुद्धिचातुर्याची उत्कंठावर्धक कथा.
-
Vimuktayan (विमुक्तायन)
‘विमुक्तायन’ हे लक्ष्मण माने लिखित संशोधनात्मक पुस्तक असून, महाराष्ट्रातील भटक्या व विमुवत जमातींचा चिकित्सक पध्दतीने केलेला हा अभ्यास. लेखकाने पहिल्या प्रकरणातून विमुक्त जमातींचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मांडला आहे. दुसर्या प्रकरणातून भटक्या गुन्हेगार जमातींचा जीवन संघर्ष, तंटे-बखेडे, सामाजिक जीवनाचा धांडोळा घेतला आहे. तिसर्या प्रकरणांतून महाराष्ट्रातील विमुक्त जमातींची सामाजिक व आर्थिक स्थिती,जात परंपरा,विवाह,विधवांचे पुनर्विवाह,जातपंचायत इ.चा ऊहापोह केला आहे, शेवटच्या व चौथ्या प्रकरणातून-भटक्या-विमुक्तांसाठी शासनाने केलेल्या उपाययोजना,त्यांचे मनाचा थरकाप उडविणारे,परिघाबाहेरचे जीवन, जातपंचायतींचे वाढते प्रस्थ, परिशिष्टे, नकाशे, प्रत्येक जात व पोटजातींच्या माहितीचे टेबल इ.माहिती सखोल अभ्यास करून सुस्पष्टपणे दिली आहे. त्यांचे हे कार्य म्हणजे,‘काटेरी कुंपणा’तील रक्तबंबाळ झालेल्या जीवांची मुक्तता म्हणावी असेच. म्हणूनच मानवतेच्या कार्याचा सजगतेने,संवेदनशीलपणे केलेला हा अभ्यास म्हणजे श्रेष्ठ पुरस्कार ठरणारे, ‘विमुक्तायन’ हे पुस्तक होय
-
I Can See You (आय कॅन सी यू)
एकामागोमाग एक सहाजणींचे खून पडलेत...या सहाहीजणी शॅडोलॅन्ड या व्हर्च्युअल जगाशी निगडित असतात, जिथे त्या वेगळ्या नावाने वेगळ्या अवतारात वावरत असतात...सहाही जणींचा खून एकाच पद्धतीने झाला आहे...अॅब्बॉटच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्टिव्ह नोआह आणि जॅक खुन्याचा माग काढू पाहत आहेत...पण तो गुंगारा देतोय...शॅडोलॅन्डचा अभ्यास करणारी इव्हही त्यांना सहकार्य करते आहे...सहा वर्षांपूर्वी निर्घृण हल्ला होऊनही त्याच्यातून बचावलेली इव्ह आणि अपघातात आपली पत्नी आणि मुलगा गमावलेला नोआह यांच्यात प्रेमबंध निर्माण झालाय...डेलला नोआह, जॅक आणि इव्हचा बदला घ्यायचाय...त्याच्याकडे संशयाची सुई आहेच...पण त्याला अटक केल्यावरही खुनांचं सत्र सुरू राहतं...खुन्याचं मुख्य लक्ष्य आहे इव्ह आणि नोआहही...तो इव्हचं अपहरण करतो...कोण आहे हा विकृत खुनी? इव्ह सुटते का त्याच्या तावडीतून? थरारक घटनांनी भरलेली, धक्कादायक वळणांनी पुढे सरकत राहणारी उत्कंठावर्धक रहस्यमय कादंबरी.
-
Dr. Maria Montessori (डॉ. मारिया मॉंटेसरी)
डॉ. मारिया मॉंटेसरी इटलीतील पहिल्या महिला वैद्यक डॉक्टर. स्त्रीवादाचा जाहीर पुरस्कार करणाऱ्या.. प्राचीन संकुचित सामाजिक धारणा मोडीत काढणाऱ्या.. अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ म्हणून लौकिक मिळवलेल्या.. बाल शिक्षणाला त्यांनी नवीन वळण दिलं. इटलीमधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तयार केलेली शिक्षणप्रणाली जगभर यशस्वी ठरली. . भारतातील आपल्या दहा वर्षांच्या वास्तव्यात 'मॉंटेसरी शिक्षणपद्धती'चा प्रसार आणि रुजवण करून त्यांनी शेकडो शिक्षक घडवले. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना तीन वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. गिजुभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांना गुरुस्थानी असणाऱ्या डॉ मारिया मॉंटेसरी यांची ही जीवन कहाणी.