-
Shesh (शेष)
भूक माणसाला किती लाचार बनवते! आम्ही सगळ्या बहिणी दोन वेळचं पोटाला काही मिळावं म्हणून वणवण करत होतो. वय लहान, आणि भूक मोठी. जेवणाच्या वेळेला कुणाच्या तरी दारात जाऊन उभं राहायचं. नाइलाज म्हणून त्या घरातली बाई आत बोलवायची आणि मग तिच्या रागासकट, तिच्या जिव्हारी लागणार्या शब्दांसकट जे पानात पडेल ते गिळायचं. त्या घरातल्या पुरुषाची नजर अंगावरून फिरत राहायची. किळस यायची- जणू ती नजर नग्न करत आहे. पण निर्लज्ज व्हायचं; कारण पोटात भुकेचा वणवा पेटलेला असायचा. आणि तोच वणवा त्या पुरुषाच्या नजरेत पेटलेला असायचा. दोन्ही भुका शारीरिक.....एक भूक वणवा शमवणारी आणि एक भूक वणवा अजून चेतवणारी...
-
Full Black (फुल ब्लॅक)
अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमधील चित्रपटगृहांवर, विमानतळांवर वगैरे एकाच वेळी आत्मघातकी दहशतवाद्यांचे हल्ले होत होते. काही काही शहरांवर तर पुनःपुन्हा वेगेवगळ्या तऱ्हेचे हल्ले होत होते. सुप्रसिद्ध सिनेनिर्माता लॅरी सालोमन याच्यावर त्याच्या राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला, त्याचा मित्र ल्यूक रॅल्स्टन याने त्या खुनी टोळीचा निःपात केला खरा; पण त्या आधीच त्यांनी त्याच्या घरामध्ये एक डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या दोघा निर्मात्यांचा खून पाडलेला असतो. वेगवेगळ्या फाउंडेशन्सनी जमा केलेला पैसा शेवटी खरोखर कशासाठी वापरला जातो हे चुकूनच त्यांच्या ध्यानात आलेले असते आणि म्हणून शोध घेत ‘वेल इन्डाउड’ या नावाची डॉक्युमेंटरी ते बनवत होते. त्यांनी शोध लावला होता की, अमेरिका संपूर्ण उद्ध्वस्त करण्याची ‘प्रोजेक्ट ग्रीन रॅम्प’ या नावाची योजना कार्यान्वित होते आहे. खुनी भाडोत्री टोळीमध्ये पूर्वीची रशियन स्पेशल फोर्सेसमध्ये असणारी माणसे होती हे कळल्यावर रॅल्स्टनच्या लक्षात येते की, फारच उच्चपदस्थ अशा कुणाचा तरी या हल्ल्यात हात असणार. कार्लटन ग्रुप फक्त एक ध्येय समोर ठेवून काम करत होता. दहशतवाद्यांना शोधा, गाठा आणि ठार करा. पूर्वी सील टीम-२ चा सदस्य असणारा स्कॉट हॉर्वाथ त्यांचा सर्वात यशस्वी असा एजंट होता. काही अपवादात्मक हल्ले सोडता वेगवेगळ्या शहरांमधील विमानतळांवर होणारे हल्ले थोपविता आल्यावर स्कॉट हॉर्वाथ शोध घ्यायला लागतो. ल्यूक रॅल्स्टनलाही स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेसमधला अनुभव होता. उच्च दर्जाचा डेल्टा ऑपरेटर. दोघे आपापल्या पद्धतीने तपास करत असताना एकत्र येतात आणि त्यांच्या लक्षात येते की, सर्व हल्ले हे सर्वंकष युद्ध या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका योजनेचाच भाग आहेत. ही त्यांच्या तपशीलवार शोधाची आणि अपराध्याला त्यांच्या दृष्टीने योग्य तीच शिक्षा देण्याची कथा आहे.
-
Lalitkalechya Sahawasat (ललितकलेच्या सहवासात)
‘ललितकलेच्या सहवात’ हे पुस्तक पुरुषोत्तम श्रीपत काळे (‘वपुं’चे वडील) यांनी विसाव्या दशकाच्या पूर्वार्धात (४०-५० दशकात) लिहिले आहे. ते स्वत: चित्रकार होते. केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’ नाटक मंडळीत ते पडदे रंगविणे, नैपथ्यरचना अशी कामे करीत. चित्रकार असूनही शब्दांवर आणि एवूâणच लेखनकलेवर त्यांची हुकमत होती, हे पानोपानी जाणवते. सुमारे ऐंशी वर्षांहून अगोदरच्या काळात मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव होता. शब्दोच्चार आणि लेखनही अनुनासिक होते. अशा काळात लिहिलेले असूनही त्यांची शब्दरचना लालित्यपूर्ण आहेच, शिवाय आशयघन आणि वास्तवदर्शी आहे. हा ‘ललितकलादर्श’चा छोटेखानी इतिहासच म्हणता येईल.
-
Black List (ब्लॅक लिस्ट)
माहिती तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन अमेरिकेचं ( आणि पर्यायाने तेथील प्रत्येक नागरिकाचं) अस्तित्वच धोक्यात आणण्याचं एटीएस या कंपनीचं जबरदस्त नियोजन असतं. हे नियोजन नक्की काय आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न कार्लटन ग्रुप करत असतो; कारण एटीएस कंपनी जे काही करते आहे, ते देशाच्या विरोधात आहे, याची कुणकुण कार्लटन ग्रुपला लागलेली असते. हा ग्रुप दहशतवादाच्या विरोधात काम करत असतो. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या नेत्यांना शोधा, गाठा आणि ठार करा, अशी त्यांची कार्यपद्धती असते. तर असा हा ग्रुप आपली योजना उधळून लावू शकतो, याची कल्पना एटीएस कंपनीला असते. त्यामुळे कार्लटन ग्रुपच्या सदस्यांना ठार मारण्याचा सपाटा एटीएस कंपनीने लावलेला असतो. एटीएस आणि कार्लटन ग्रुप यांच्यामधील जीवघेणा संघर्ष ‘ब्लॅक लिस्ट’ या कादंबरीत रंगवला आहे.
-
Japun Tak Paul (जपुन टाक पाऊल)
पुरुषोत्तम काळे- ‘वपुं’चे वडील यांनी चाळीस वर्षे रंगभूमीसाठी पडदे रंगविण्याची सेवा केली. रंगभूमीविषयक काही कार्य व्हावं आणि तेही ‘ललितकलादर्श’साठी, ही ‘वपुं’ची फार दिवसांची इच्छा होती. भालचंद्र पेंढारकरांच्या नाटकीय कारकिर्दीच्या अनुभवांचं शब्दांकन करण्याचं काम ‘वपुं’कडून घडलं, तर ‘ललितकलादर्श’साठी काही कार्य केल्याचं समाधान मिळून, तीही एका अर्थानं रंगभूमीची सेवाच होईल, या भावनेनं त्यांनी हे लिहिलं. पेंढारकरांनी त्यांच्या गतजीवनातले प्रसंग सांगितले, पण त्यांची तेव्हाची मनःस्थिती कशी असेल, हे हेरून ‘वपुं’नी ते आपल्यापुढे आणले आहे.
-
Return Of A King (रिटर्न ऑफ अ किंग )
शहाशुजा उल्-मुल्कला तरुण वयातच आजोबा अहमदशहा अब्दाली यांनी स्थापन केलेलं दुर्राणी साम्राज्य वारसाहक्कानं मिळालं. जगातला सर्वांत मोठा हिरा कोह-इ-नूर - कोहिनूर, (प्रकाशाचा पर्वत) आणि ‘फखाज’ (पुष्कराज!) नावाचं माणिक ही या घराण्यातली दोन अत्यंत मौल्यवान नाहीशी झालेली रत्नं शहाशुजाने विश्वासातल्या माणसांकरवी परत मिळवली. शहाशुजा हा उच्चविद्या विभूषित, हुशार, निश्चयी आणि अविचल वृत्तीचा आणि मित्रांशी असाधारण निष्ठेनं वागणारा होता. संपूर्ण आयुष्यात त्याला वारंवार गंभीर आपत्तींना सामोरं जावं लागलं; परंतु तो कधीही खचला नाही किंवा निराशही झाला नाही. त्याच्या संपूर्ण आयुष्यात आशावाद हेच त्याचं बलस्थान ठरलं. शुजाच्या अंगी अनेक दोष होते आणि त्यानं अनेकदा चुकीचे निर्णय घेतले; परंतु जेव्हा नोव्हेंबर १८४१ मध्ये बंड उसळून दाराशी संकट येऊन उभं राहिलं, तेव्हा कार्यक्षमतेनं त्याचा लष्करी प्रतिकार करणारा संपूर्ण काबूलमधला एकमेव माणूस फक्त शहाशुजा होता. ‘अकार्यक्षम ब्रिटिश आश्रयदात्यांच्या सेनेवर अवाजवी भिस्त टाकणं, ही त्याची सर्वांत मोठी चूक ठरली.’ शुजाचं खूपसं आयुष्य जसं अपयशाच्या छायेत व्यतीत झालं; त्याच पद्धतीनं त्याच्या वादळी आयुष्याची अखेर झाली.
-
Pratiroop (प्रतिरूप)
‘प्रतिरूप’ हे पुस्तक म्हणजे पारंपरिक पद्धतीचे "self help" पुस्तक नाही. हे पुस्तक म्हणजे असंख्य मानसिक, आध्यात्मिक अडथळ्यांवर मात करीत मिळवलेल्या विजयाची गोष्ट आहे. नेदरलँडला लेखिका स्वशोधाकरिता एकटी जाते. तेथे शमन्स जमातीच्या विधींमध्ये सहभागी होते आणि तेथून तिचा अंतर्मनातील प्रवास सुरू होतो. तिच्या प्रवासात आपण प्रवासी म्हणून कधी सामील होतो, हे कळतच नाही. या पुस्तकात प्रत्येक विधीचे एक प्रकरण आहे. सर्वच विधी अंतर्मुख करायला लावतात. प्रत्येक विधीतून ईश्वरीय सत्य उलगडत जाते. जीवन अनेक शक्यतांचे बनले आहे. सर्वच शक्यतांचा प्रवास आपण करू शकत नाही; पण या पुस्तकाद्वारे सर्व शक्यतांचे ज्ञान मात्र होऊ शकते. जर आपले अंतर्मन योग्य दिशेने नेले, तर बाह्य जगात कोणतीच गोष्ट चुकीची नाही. लेखिका महिनाभर नेदरलँडच्या रहिवाशांबरोबर तसेच चौथ्या पिढीतील शमन्सबरोबर होती. शमन्स ही प्राचीन जमात आहे, जी आध्यात्मिक उत्क्रांती आणि मुक्तीसाठी काही आध्यात्मिक क्रिया करते. भौतिक आणि आध्यात्मिक जगातील दुवा म्हणून शमन्सकडे पाहिले जाते. ‘शमनीझम’ हा आध्यात्मिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. असे म्हणतात की, शमन्स आत्म्यावर उपचार करतात. उपचार करून तुमच्यातून नष्ट झालेली ऊर्जा ते परत मिळवून देतात. लेखिकेच्या वैयक्तिक पातळीवरील प्रवासात आपण पुस्तकरूपाने सहभागी होतो; पण आपल्या लगेच लक्षात येते की, हा फक्त लेखिकेचा वैयक्तिक प्रवास नाही; लेखिकेच्या प्रवासात आपण सर्वच सहभागी आहोत. ‘मी म्हणजे दुसरे तुम्हीच!’ हे पुस्तकाचे नाव या दृष्टीने सार्थ ठरते. या पुस्तकातून अनेक सनातन मूल्यांचा शोध लागतो. आपल्या नियतीला आपणच आकार देऊ शकतो. गुरू आपल्यातच असतो. निराश होणे अथवा आनंदी राहणे हे पर्याय आहेत. कोणता पर्याय निवडायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. याचक आणि गुरू यामध्ये फरक नसतो. फरक दृष्टिकोन आणि प्रवृत्तीचा असतो. आपणच गुरू असतो आणि शिष्यही! आयुष्य आपणास दोन्ही बाजूंनी शिकवते. अशी अनेक सनातन मूल्ये आपणास जागोजागी भेटतात. अनेक लहानसहान रोचक प्रसंग लेखिकेने शब्दरूपाने फुलवले आहेत. प्रत्येक प्रकरण वाचकाला नवीन अनुभव देऊन जाते. प्रत्येक वेळी नवीनच सत्य समोर येते. मानवधर्म हा वैश्विक आहे. प्रत्येक मनुष्य सारखाच आहे आणि वैयक्तिक पातळीवर त्याचा झगडाही सारखाच आहे. या सर्व झगड्यांतून जात असताना हाती येणारे वैश्विक सत्य चिरंतन असते आणि हाच धागा पकडून लेखिकेने आपल्या समर्थ शैलीने फार नाजूकपणे विणला आहे.
-
Georges Secret Key To The Universe (जॉर्जेस सिक्र
‘जॉर्जेस सिक्रेट की टू द युनिव्हर्स’ हे पुस्तक म्हणजे जॉर्ज या शाळकरी मुलाच्या अपूर्व धाडसाची आणि त्याच्या हुशारीची कथा आहे. जॉर्जच्या शेजारी एरिक नावाचे वैज्ञानिक राहायला येतात. त्यांची लहान मुलगी अॅनी आणि कॉसमॉस हा त्यांचा सुपर कॉम्प्युटर यांच्यासह ते राहत असतात. जॉर्जची एरिक आणि अॅनीशी घनिष्ठ मैत्री होते. ‘कॉसमॉस’मुळे अंतराळात जाणं एरिक आणि अॅनी यांना अगदी सहजसाध्य असतं. अॅनी एरिकच्या चोरून एकदा जॉर्जलाही अंतराळाची सफर घडवते. जॉर्जच्या शाळेतील एक शिक्षक डॉ. रीपर एरिकच्या विरोधात असतात. एरिकची दिशाभूल करून ते एरिकना अंतराळात पाठवतात आणि कॉसमॉसला चोरून नेतात. एरिकचा जीव धोक्यात आहे, हे जॉर्जला समजतं. तो एरिकना वाचवण्यासाठी काय करतो? डॉ. रीपर आणि एरिकमध्ये कोणत्या कारणामुळे शत्रुत्व असतं? जॉर्ज रीपरकडून कॉसमॉसला कसा हस्तगत करतो...याची उत्कंठापूर्ण कहाणी.
-
Fish Tales (फिश टेल्स)
फिश ! टेल्स’ अर्थात ‘फिश! कथा’ हा प्रेरणादायी कथांचा संग्रह आहे. पाइक प्लेस फिश मार्केटपासून प्रेरणा घेऊन मेरी जेनने आपल्या मरगळलेल्या विभागात कसं चैतन्य आणलं, ही कथा ‘फिश’मध्ये आहे. तर ‘फिश टेल’मध्ये पाइक प्लेस फिश मार्केटपासून प्रेरणा घेतल्यामुळे स्प्रिंट ग्लोबल कनेक्शन सव्र्हिसेस, युनिव्हर्सल फोर्ड टोयोटा, एक हॉस्पिटल आणि अन्य व्यक्तींनी घेतलेली प्रेरणा आणि त्या प्रेरणेमुळे त्या व्यक्तींमध्ये आणि संस्थांमध्ये घडलेले सकारात्मक बदल याच्या कथा आहेत. स्टिफन सी. लन्डिन, जॉन क्रिस्टेन्सेन आणि हॅरी पॉल हे तिघं फिश मार्केटमधील उत्साही वातावरणाने प्रभावित झाले. त्या वातावरणातून जाणवलेली चार तत्त्वं (चैतन्यपूर्ण सहभाग, सौख्याची अनुभूती, तन्मयता, समरसता) त्यांनी एका फिल्म डॉक्युमेंटरीद्वारे मांडली. त्यांच्या परिभाषेत ‘फिश फिलॉसॉफी’ असं नाव दिलं. त्यानंतर ही चार तत्त्वं अधोरेखित करणारी फिश फिलॉसॉफी त्यांनी ‘फिश’ नावाच्या पुस्तकातून कथारूपात मांडली. त्यामुळे ही फिलॉसॉफी जगभर पोहोचली. ज्यांनी या फिलॉसॉफीचा अवलंब केला, त्यांच्यात एक व्यक्ती म्हणून आणि संस्थेचे कर्मचारी म्हणूनही सकारात्मक बदल झाला आणि त्या सकारात्मकतेचं सु-फलित त्यांच्या पदरात पडलं. तर ज्यांना ही फिलॉसॉफी यशदायी, फलदायी ठरली त्यांनी आपले अनुभव या पुस्तकाच्या लेखकांना कळवले आणि त्या अनुभवांचं संकलन ‘‘फिश! कथा’मध्ये करण्यात आलं आहे. फिश फिलॉसॉफीमुळे एका कॉल सेंटरचं वातावरण कसं चैतन्यमय झालं आणि केवळ या फिलॉसॉफीमुळे ते एक वृद्धेचा जीव कसा वाचवू शकले, याच फिलॉसॉफीमुळे एका टोयोटा कंपनीतील वातावरण कसं चांगलं झालं आणि एका ल्युकेमिया झालेल्या माणसाच्या पत्नीला त्यांनी कशी मानवतावादी वागणूक दिली, तसेच हीच फिलॉसॉफी एका हॉस्पिटलमधील वातावरण प्रसन्न करण्यास कशी कारणीभूत ठरली आणि त्यामुळे मृत्यूच्या जवळ असणाऱ्या रुग्णांनाही कसा आनंद मिळाला, हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘फिश! कथा’ वाचलंच पाहिजे.
-
Fish (फिश)
वातावरणातील सकारात्मक ऊर्जा माणसाची कार्यक्षमता कशी वाढवते, याचा वस्तुपाठ देणारं हे पुस्तक आहे. एका छोट्याशा कथेतून हा वस्तुपाठ दिला आहे. मेरी जेन ही ‘फर्स्ट गॅरंटी फायनांशिअल’ या सिअॅटलमधल्या प्रथितयश कंपनीच्या ‘ऑपरेशन विभागा’त सुपरवायझर म्हणून काम करत असते. या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर मेरीच्या हसत-खेळत वागण्यामुळे आणि तिच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे एकूणच उत्साही वातावरण असतं. त्याच्या विरुद्ध वातावरण याच कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर असतं. या मजल्यावरील ऑपरेशन विभागाच्या हातात फर्स्ट गॅरंटीच्या सर्व व्यवहारांचं काम असतं. ‘विषारी ऊर्जेचा कचरा डेपो’ असं संबोधल्या जाणाऱ्या या विभागाची जबाबदारी मेरीवर सोपवली जाते. या विभागातील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये कशी सुधारणा करायची, या विचारात असताना मेरी पाइक प्लेस फिश मार्केटमध्ये जाते आणि तेथील उत्साही वातावरणाने प्रभावित होते. तेथील एक तरुण विक्रेता लोनी हे उत्साही वातावरण तिथे जाणीवपूर्वक निर्माण केल्याचे आणि त्याचे फायदे तिला सांगतो. फिश मार्केटचं हे यशाचं सूत्र मेरी आपल्या विभागाला कसं लागू करते आणि आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कसा सकारात्मक बदल घडवून आणते, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
-
Fish For Life (फिश फॉर लाइफ)
मेरी जेन आणि लोनीची फिश मार्केटमध्ये भेट होते आणि नंतर त्यांच्यात प्रेमबंध निर्माण होतो. ते दोघं विवाहबद्ध होतात. ब्रॅड आणि सारा या मेरीच्या दोन्ही मुलांचाही लोनी मनापासून स्वीकार करतो. मेरीचं करियर बहरत असतं. लोनीने फिश मार्केट सोडून नर्सिंग कोर्स करायचा निर्णय घेतलेला असतो. मेरीचाही त्याच्या निर्णयाला पाठिंबा असतो; पण येवढं सगळं चांगलं चाललेलं असतानाही मेरी थोडी अस्वस्थ असते. कारण ती लोनीसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसते. त्यातच तिच्या आईला विस्मरणाचा आजार जडल्याचं तिला समजतं. आईला आपल्या घरी राहायला आणावं असं तिला वाटत असतं; पण आई त्या गोष्टीला तयार होणार नाही आणि आईची जबाबदारी घेतल्यानंतर लोनीला वेळ देणं आपल्याला शक्य होईल का, लोनीची आईला इकडे आणायला काही हरकत तर नसेल ना, असे प्रश्न तिच्या मनात उभे राहतात; पण लोनीचा फिश मार्केटमधला मित्र वुल्फ याच्याशी बोलत असताना, तिला समजतं की वुल्फने वैयक्तिक जीवनातही फिश फिलॉसॉफीचा अवलंब केल्यामुळे त्याचा घटस्फोट टळला आणि तो व त्याची पत्नी आता सुखाचा संसार करत आहेत. वुल्फच्या अनुभवातून मेरीही फिश फिलॉसॉफीचा अवलंब कौटुंबिक पातळीवर करायचा निर्णय घेते आणि त्याबाबत लोनी, ब्रॅड आणि साराशी बोलते. त्यांचाही खूप चांगला प्रतिसाद मेरीला मिळतो. फिश फिलॉसाफीचा अवलंब केल्यामुळे मेरीच्या कौटुंबिक जीवनात कसे आनंदाचे झरे वाहायला लागतात, त्यासाठी आणि एक प्रसन्न, खेळकर अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.
-
Fish Sticks (फिश स्टीक्स)
रत एकदा फिश फिलॉसॉफीचं महत्त्व अधोरखित करणारं हे पुस्तक आहे. ऱ्होंडा ही गुड समारिटन हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत असते. तिची वरिष्ठ असलेल्या मॅडेलीनने त्या हॉस्पिटलमध्ये फिश फिलॉसॉफीचा अवलंब केलेला असतो. त्यामुळे हॉस्पिटलचं वातावरण चैतन्यमय झालेलं असतं; पण मॅडेलीन ते हॉस्पिटल सोडून जाते आणि त्या हॉस्पिटलची धुरा ऱ्होंडाच्या खांद्यावर येते. मॅडेलीनच्या वेळेला असणारा फिश फिलॉसॉफीचा प्रभाव आता कमी झाल्यामुळे स्टाफची कार्यक्षमता घटलेली असते. या गोष्टीसाठी ऱ्होंडा स्वत:ला जबाबदार धरत असते आणि त्यामुळे चिंतित असते. अशा वेळेला तिची मैत्रीण मार्गो तिला ‘ताकारा टू’ या लोकप्रिय रेस्टॉरंटची मालकीण मिसेस ईशीहाराचं प्रेरणादायी उदाहरण देते. ईशी ऱ्होंडाशी बोलून तिचं मनोबल वाढवते. ऱ्हीडा कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य आणणण्यासाठी प्रयत्न करायला सज्ज होते; पण त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागाची व्हाइस प्रेसिडेंट म्हणून आलेली मेबेल स्कालपेल फिश फिलॉसॉफीला सक्त हरकत घेते. हॉस्पिटलचा डायरेक्टर असलेल्या फिललाही नाइलाजाने तिला दुजोरा द्यावा लागतो. त्यामुळे ऱ्होंडा नाराज होते. दरम्यान, ऱ्होंडाची मुलगी अॅन हिचा दुर्दैवी अपघाती मृत्यू होतो आणि त्यावेळेला स्कालपेल ऱ्होंडाला मानसिक आधार देते आणि मग तिलाही फिश फिलॉसॉफीचं महत्त्व पटतं. हॉस्पिटलसारख्या ठिकाणी रुग्णाबरोबरच हॉस्पिटलच्या स्टाफचंही मनोबल चांगलं असणं आवश्यक असतं. फिश फिलॉसॉफी माणसाच्या मूलभूत भावनांना कशी साद घालते, याचा प्रत्यय घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
-
Think Yourself Gorgeous (थिंक युवरसेल्फ गॉर्जीयस)
सौंदर्य, बारीकसारीक ताणतणाव, आत्मविश्वास, स्वप्रतिमा, शरीरप्रतिमा, वयात येणे आणि भावभावना या सर्वच गोष्टी अंतर्भूत असणारे ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ हे पुस्तक म्हणजे, तुम्हाला स्वतःबद्दलच कमीपणा का वाटतो, तुमच्या दिसण्यापासून तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि तुमच्या शरीराबद्दल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला असुरक्षित का वाटते, हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करणारे आहे. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल विश्वास वाटावा यासाठीचा सल्ला, अर्थपूर्ण माहिती आणि प्रत्यक्षात आणता येतील असे मार्गदर्शक मुद्दे या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. तुम्हाला अंतर्बाह्य सुंदर वाटावे यासाठीही ते मदत करेल.
-
Secrets Of The Light (सीक्रेट्स ऑफ द लाइट)
डॅनियन ब्रिंकली आणि कॅथरिन ब्रिंकली या दाम्पत्याने लिहिलेल्या ‘सिक्रेट ऑफ लाइट’ या पुस्तकाचा विषय मृत्यूनंतरचे जीवन हा आहे. धर्म, देवावर विश्वास नसलेले, आध्यात्मिकतेचा गंध नसलेले, विवेकहीन, बेफाम आयुष्य जगणारे डॅनियन दोनदा मृत्यूच्या समीप जाऊन आले. त्यानंतर तणावमुक्ती केंद्रांची स्थापना करण्याचे प्रचंड मोठे कार्य त्यांनी केले. ‘ट्विलाईट बिग्रेड’ची स्थापना केली. मृत्युशय्येवर असलेल्या देशातील सैनिकांना धैर्याने मृत्यूचा सामना करता यावा, यासाठी त्यांना मदत करणे हे या संघटनेच्या स्वयंसेवकांचे काम होते. गेली तीस वर्षे मृत्युशय्येवरच्या कित्येक व्यक्तींना ते त्यांच्या पुढील प्रवासाची माहिती देतात. मृत्यूविषयी त्यांची भीती दूर करतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचे मृत्यूनंतरचे जीवन सुकर करतात. परलोकातील आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्याची सोपी पद्धत, त्याचसोबत पारलौकिक प्रकाशाच्या दिव्य आqस्तत्वांशी संपर्क साधण्याचा मार्गही त्यांनी दिला आहे. एकूणच, पारलौकिक जगाविषयीची माहिती आणि मानवजातीच्या कल्याणासाठी प्रत्येकानेच काही ना काही केले पाहिजे असा संदेश देणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.
-
Angelas Ashes (अँजेलाज अँशेस)
आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पोकळ अभिमानात रमणाऱ्या आणि सतत वाढणाऱ्या पोरवड्याकडे दुर्लक्ष करून दारूत बुडालेल्या वडिलांमुळे वयाच्या चौथ्या वर्षापासूनच लिमरिकच्या गलिच्छ झोपडपट्टीत दैन्यावस्थेत हातातोंडाची गाठ घालण्यासाठी धडपडून आईला मदत करणाऱ्या- अमेरिकेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या फ्रॅंकच्या संघर्षमय बालपणाची कहाणी.
-
Life Without Limits (लाइफ विदाउट लिमिट्स)
निक व्होयचिच यांना जन्मत:च हात-पाय नाहीत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनात नकारात्मक विचार येत. एकदोनदा त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला; पण नंतर मात्र आपल्या व्यंगावर मात करत ते जीवनाला सामोरे गेले आणि त्यांचं जीवन आनंदाने, समाधानाने, यशाने भरून गेलं. ही यशोगाथा त्यांनी ‘जीवन अमर्याद’ या पुस्तकातून छायाचित्रांसह मांडली आहे. निकच्या जन्मानंतर त्याला स्वीकारायलाही त्याच्या आईवडिलांना वेळ लागला; पण नंतर त्यांनी वेगवेगळ्या सोयी करून निकला स्वावलंबी बनवलं. बद्धिमत्ता आणि जिद्द यांच्या जोरावर निकनी चांगलं शिक्षण घेतलं. त्यांच्यावर चित्रित केलेल्या व्हिडिओ क्लिप्स जगभरातील लोक पाहत असतात. तसेच स्वत:ची यशोगाथा सांगून लोकांना प्रेरित करण्यासाठी निक व्याख्याने देतात आणि एक व्याख्याता म्हणूनही जगभर त्यांची ख्याती झाली आहे. जगभर फिरताना त्यांना आलेले अनुभव आणि विपरीत परिस्थितीला सकारात्मकतेने सामोरे गेलेल्या लोकांची उदाहरणं, यांचा या पुस्तकात समावेश आहे. तेव्हा हे प्रेरणादायी पुस्तक सगळ्यांनी जरूर जरूर वाचलं पाहिजे.
-
Nirmanushya (निर्मनुष्य)
मतकरींच्या प्रगल्भ शैलीतून साकार होत असलेल्या अगदी अलिकडच्या गूढकथांचा हा संग्रह. वास्तवाच्या पायावर उभे असलेले कल्पनेचे जग, मानसशास्त्रावर आधारलेले भीतीचे विश्व मतकरींच्या कथांमधून साकार झाले आहे. उत्कंठा वाढवणारा संदेश आणि गारठून टाकणारे भय यांच्या जोडीनेच, प्राणीमात्राविषयी करूणा आणि अंतिम न्यायाचा आग्रह, राजकारणाचा स्पर्श हे त्या कथांचे लेखनसूत्र आहे. या आशयसंपन्नतेमुळे मतकरींच्या कथा बदलत्या काळागणीक अधिकाधिक अर्थगर्भ होत गेल्या आहेत. गूढकथा ही वाचकाला अचंब्यात टाकण्यासाठी किंवा घाबरण्यासाठी लिहिलेली कथा नसून, ती मानवी जीवनावर भाष्य करण्यासाठी निवडलेली एक वेगळी दृष्टी आहे हेच या कथा वाचताना जाणवते.
-
Nijdham (निजधाम)
बोलावणं... निजधाम... जेवणावळ... रत्नाकर मतकरींच्या या असाधारण गूढकथांनी मराठी कथेमध्ये एक नवीन वाट तयार केली. या कथांमधील वातावरणे, चित्रदर्शी वर्णने, माणसाच्या मनातल्या गूढाचा घेतलेला वेध, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि हादरवून टाकणारा शेवट, या साऱ्यांनी मराठी कथेत त्या वेळेपर्यंत अस्तित्वात नसलेले एक विलक्षण कथाविश्व निर्माण केले. यातल्या कथा रंगभूमीवर आल्या, दूरदर्शनवर सादर झाल्या, अनुवादित झाल्या. मुख्य म्हणजे, दोन पिढ्यांच्या मनावर गारूड करून राहिल्या. फार वर्षांपूर्वी वाचलेल्या या कथा वाचकांच्या स्मरणातून कधीच गेल्या नाहीत. उलट त्यांनी त्या इतरांना सतत सांगून जिवंत ठेवल्या. आजच्या तरुणांना तर या गूढकथांचे अधिकाधिक आकर्षण वाटू लागले आहे... या, कालच्या आणि आजच्या व उद्याच्या वाचकांसाठी नव्या स्वरूपात काढलेला गूढकथांचा संग्रह... Keywords
-
Nagasaki (नागासाकी)
नागासाकी ही कादंबरी म्हणजे १९४५मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, त्याच्या पार्श्वभूमीची, परिणामांची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींची विस्तृत कहाणी आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण, असं सर्वसाधारणपणे या कादंबरीचं स्वरूप आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने हा बॉम्बहल्ला केला. त्या हल्ल्यानंतर या शहरांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तांडवाचं आणि जखमी लोकांच्या वेदनांचं प्राधान्याने चित्रण करणारी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.
-
Arise Awake (अराइज अवेक)
अराइज, अवेक हे तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त करणारं आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. विविध युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू केले. त्या व्यवसायाची संकल्पना त्यांना कशी सुचली, कल्पना सुचल्यावर त्यांनी काय केलं, भांडवल कसं उभं केलं, आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी केली, त्या व्यवसायाला लोकांचा (गिह्राईकांचा) कसा प्रतिसाद मिळाला, आपलं उत्पादन तयार करताना, त्याची जाहिरात करताना, तसेच आर्थिक बाबतीत किंवा अन्य स्वरूपाच्या त्यांना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याचं सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं आहे. कोणी डॉक्टरांसाठीचं सॉफ्टवेअर तयार केलं, तर कोणी सिमेंट काँक्रीटच्या विटा, कोणी पूजा किट्स तयार केली, तर कोणी टी शर्ट्स, कोणी कॅपचावर लक्ष केंद्रित केलं, तर कोणी कॉम्प्यूटर सायन्स शिकवण्यावर, अशा अनेक युवा उद्योजकांच्या या प्रेरणादायी कथा युवा वर्गाने आणि सगळ्यांनीच अवश्य वाचाव्या अशा आहेत.
-
The Difficulty Of Being Good (द डिफिकल्टी ऑफ बीइं
महाभारताच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर गुरुचरण दास यांनी आपल्या लेखनाद्वारे हा महान ग्रंथ आजच्या दैनंदिन जीवनातील पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेले धर्माचे विविधांगी सखोल विश्लेषण वाचकांना वेगळीच मर्मदृष्टी देते. या पुस्तकातही महाभारताप्रमाणे नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक - सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे.
-
Georges And Big Bang (जॉर्ज अँड द बिग बँग)
एरिक हे वैज्ञानिक सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी संशोधन करत असतात. मानवजातीला हितकर असे काही निष्कर्ष त्यांच्या दृष्टिपथात असतात; पण टोरेग या संघटनेचे लोक एरिकच्या या संशोधनामुळे पृथ्वी नष्ट होणार आहे, असा अपप्रचार करत असतात. कॉसमॉस या एरिककडे असलेल्या संगणकाचा गैरवापर केल्याचा आरोप एरिक यांच्यावर ठेवून, त्यासंदर्भात हाड्रॉन कोलायडरवर ताबडतोब मानव हितचिंतक संघाच्या बैठकीचं आयोजन केलं जातं. अर्थातच एरिक कॉसमॉससह त्या बैठकीला रवाना होतात; पण ते गेल्यानंतर त्यांचा जीव धोक्यात असल्याचा संदेश रीपनकडून जॉर्जला मिळतो. बैठकीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून एरिक आणि अन्य भौतिक वैज्ञानिकांना ठार मारून त्यांच्या विधायक संशोधनावर कायमचा पडदा पाडायचा टोरेग संघटनेचा डाव असतो. हा डाव उधळण्यासाठी निघालेल्या जॉर्ज आणि अॅडनीवर कोणती संकटं कोसळतात? ते बैठकीच्या ठिकाणी पोचण्यात यशस्वी होतात का... जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा ‘जॉर्जेस अॅ न्ड द बिग बँग.’
-
Pardeshi (परदेशी)
नाटककार, एकांकिकार, बालनाटककार, कथाकार, कादंबरीकार अशा अनेक नात्यांनी मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची आणखी एक ओळख आहे ती, विविध विषयांवर संवेदनशील ललित लेखन करणारे साहित्यिक अशी. डौलदार तरीही सुबोध भाषा, आशयाचा नेमकेपणा, नाट्यपूर्ण रचना या वैशिष्ट्यांमुळे या लेखांना कथेचा चटकदारपणा प्राप्त होतो आणि तो सहजपणे वाचकांच्या मनाला भिडतो. कुठलाही अभिनिवेश नसलेल्या या लिखाणातही, मतकरींचे सामाजिक भान आणि मानवी मूल्यांचा आग्रह दिसून येतो. या सगळ्याबरोबरच, ‘परदेशी’ या संग्रहाचा विशेष असा की, त्याला अ-भारतीय समाजाची पाश्र्वभूमी आहे आणि तरीही सगळीकडचा माणूस एकच आहे, हा अंतिम विचार त्यामागे आहे. संग्रही ठेवावा असा हा आगळावेगळा संग्रह!
-
Bari (बारी)
जंगलाच्या आसर्यानं वाढणाऱ्या बेरड जमातीची अस्सल कथा. कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरु करणाऱ्या श्री. रणजीत देसईंची हि पहिलीच कादंबरी. कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार मुलतःच भिन्न प्रकृतीधर्माचे आहेत. त्यामुळं या दोन्ही साहित्यप्रकारांवर प्रभुत्व असलेले सव्यसाची ललितलेखक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच आढळतात. श्री. रणजीत देसाई त्यापैकीच एक. आपल्या दृढ परिचयाचा भौगोलिक भाग त्यांनी या कादंबारीकता निवडला आहे. कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याच्या वाटेवर सुतगट्टी या नावाचं गाव लागतं. तिथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलान वेढलेली वाट `सूतगट्टीची बारी` म्हणून ओळखली जाते. भर दुपारी अंधारून याव, असा हा भाग. त्या बरीचीची, त्या जंगलाच्या आसऱ्यान वाढणाऱ्या बेरड जमातीची हि कथा. श्री. रणजीत देसईंचा रहिवास जन्मापासूनच खेड्यात झालेला आहे. आजही रात्रंदिवस ते याच लोकांत वावरत आहेत. तिथल्या मातीतच त्यांची कला मूळ धरीत आहे. त्यामूळं हि कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेलं खेडेगावातल फुलझाड नाही. प्रसंगाचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावर जिची च्या पडली आहे, त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरे होत आहेत, ती सारी कधी विकत हास्य करीत, तर कधी कारुण्यान काजळून जात लेखकापूढ प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे. या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेल, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि त्या जमातीच्या भाविताव्याविशयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे.