-
Maza Gaon (माझा गाव)
`माझा गाव` या माझ्या कादंबरीतील बरीच पात्रं आणि प्रसंग तर माझ्या घरचेच आहेत. कादंबरीतील वाडा हा अप्रत्यक्षपणे आमचाच आहे. जयवंताचं पात्र हे माझ्या प्रत्यक्षातील भावभावनांतून, अनुभवांतून आकाराला आलेलं आहे. इतर पात्रं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. त्यांचे स्वभाव मी हेरलेले आहेत; त्यांची मांडणी मात्र नव्यानं केली आहे. तिथंच तेवढं कल्पनेचं साहाय्य घेतलं आहे. कादंबरीतील मुख्य पात्र आहे अप्पासाहेब इनामदार. हे पात्र मी वास्तवातूनच उचललं आहे. माझ्या वडिलांवरून ते सुचलं. पण कादंबरीतील त्या पात्राच्या जीवनात घडणाया घटना माझ्या वडिलांच्या जीवनातील मुळीच नाहीत. त्यांतील काही मी ऐकलेल्या आहेत. काही पाहिलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं, असा एक हेतू या कादंबरीलेखनामागं होता. जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, कसा जगत होता, स्वत:ला समाजाशी कसा वाहून घेत होता, हे दाखविण्यासाठी मी ही कादंबरी लिहिली आहे. आज सगळं ग्रामजीवनच बदलत चाललं आहे. समाज बदलतो आहे, संस्कारही बदलत आहेत; पण हरवलेल्या जीवनाची रुखरूख मात्र मनात घर करून होती. ती वाढतच होती. ती रुखरूख हीच या कादंबरीलेखनामागची मूळ प्रेरणा आहे...
-
Chhava Teen Anki Natak (छावा तीन अंकी नाटक)
हे दगडी कासव आम्हाला आमच्या हयातीचं प्रतीकच वाटत आलं आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हरएक भाविक दर्शनभक्ताचे कळत-नकळत पाय पडतात ते या दगडी कासवाच्या पाठीवर! भरल्या मनाचे नमस्कार रुजू होतात ते मात्र गाभाऱ्यातील मूर्तीच्या चरणांपाशी— आम्ही— आहोत या हमचौकातील दगडी कासवासारखे! आबासाहेब— आबासाहेब आहेत ते दौलतीच्या गाभाऱ्यातील मूर्तीसारखे!... खंत पाठीवर पडणाऱ्या पावलांची मुळीच नाही. एवढीसुद्धा नाही. खंत आहे ती मात्र एकाच बाबीची— आणि ती जरूर आहे— काळीजतोड खंत आहे ती येसू—उभ्या दौलतीत असा एकही जाणता मिळाला नाही की ज्याच्या ध्यानी कधी हे आलं की— या दगडी कासवाचीही नजर अहोरात्र जोडलेली असते ती— ती मात्र गाभारातल्या त्या मूर्तीच्याच चरणांठायी!— हे नेमकं जाणणारे जाणते होते— आमचे आबासाहेब— आमच्या थोरल्या आऊसाहेब.
-
Kavadase (कवडसे)
सावंतसाहेबांनी उभ्या केलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या व्यक्तिरेखा म्हणजे पुराणातली वांगी नसतात, तर २१व्या शतकाशी त्यांचा सांधा असा जुळलेला असतो की कित्येक वाचक त्यातून जीवनदायी प्रेरणा घेतात. ह्या लेखसंग्रहातही सावंतसाहेबांची ही वैशिष्ट्यं तर मला जाणवलीच; पण समकालीन लेखकांच्या लेखनाचं मोकळेपणानं कौतुक करण्याचा त्यांच्या मनाचा खुलेपणाही मला जाणवला. ते माणसातली विकृती शोधत नाहीत— शोधतात त्याला झालेला दिव्यत्वाचा स्पर्श— मग तो भक्तीचा असेल, प्रतिभेचा असेल किंवा सामाजिक कणवेचा असेल. सावंतसाहेबांच्या महाकादंबऱ्यांत तर त्यांच्या लेखणीचं सामर्थ्य वाचकाला भारावून टाकणारंच असतं; पण ह्या छोट्या छोट्या लेखांतील तेज:पुंजांचं महत्त्वही मला कमी वाटलं नाही. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांच्या प्रतिभासूर्यानं वाचकांना दिपवून टाकलं; पण ह्या लेखसंग्रहातही त्यांच्या प्रतिभासूर्याचे विविध आकारांचे कवडसेसुद्धा वाचकाला एक वेगळाच आनंद मिळवून देतील याबद्दल शंका नाही.
-
Georges Cosmic Treasure Hunt (जॉर्जेस कॉस्मिक ट्रे
जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट’ ची कथा फिरते शाळकरी वयातील जॉर्ज, त्याचे आई-वडील आणि आजी, एरिक हे वैज्ञानिक, त्यांची मुलगी अॅचनी, एरिकचे सहकारी रीपन, त्यांच्या मित्राचा मुलगा एमिट आणि एरिकचा ‘कॉसमॉस’ नावाचा ताकदवान, हुशार संगणक यांच्याभोवती. ग्लोबल स्पेस एजन्सीमध्ये एरिक काम करत असताना त्या एजन्सीद्वारे होमर नावाचा यंत्रमानव मंगळावर पाठवला जातो; पण काही दिवसांनंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटतो आणि जेव्हा तो परत नियंत्रण कक्षाच्या संपर्कात येतो, तेव्हा तो विचित्र वागत असतो. दरम्यान, अॅतनीला परग्रहावरून असा संदेश येतो, की होमरला दुरुस्त केलं नाही तर पृथ्वीचा नाश होईल. म्हणून अॅ नी आणि जॉर्ज मोठ्या माणसांना कल्पना न देता मंगळावर पोचतात, एरिकना हे समजल्यावर तेही मंगळावर जातात. तिथे काय होतं? अॅ्नीला संदेश कोणी पाठवलेला असतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि एकूणच अंतराळाविषयीची रंजक माहिती मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचली पाहिजे.
-
Mrutyunjay Teen Anki Natak (मृत्यूंजय तीन अंकी नाट
नाही!! नाही! मी सूतपुत्र नाही. राधेय नाही. एकशेएकावा कौरव नाही. कौंतेय आणि पहिला पांडव तर नाहीच नाही. मी– मी सूर्यपुत्रही नाही!! मी– मी आहे एक प्रचंड शून्य!! प्रचंड शून्य!! ज्याला नसतात बंधू-बंधनं, नसते माता-ममता, नसते आवश्यकता कुठल्याही कुळाची– कसल्याच वारशाची, ज्याला नसतात मान- अवमान– आत्माभिमान– कसले कसलेच भाव! ‘कऽर्ण, कऽर्ण’ एक प्रचंड शून्य! जन्म नसलेलं, मृत्यू नसलेलं! राधा-कुंती, वृषाली- पांचाली, शोण, अर्जुन, घोडा-सूर्य, सर्वा-सर्वांनाच सामावून घेणारं! सर्वापार गेलेलं! कशाकशातच नसलेलं! एक प्रचंड शून्य!
-
The Miracle (द मिरॅकल)
लूर्द फ्रान्समधलं एक छोटसं गाव. खिश्चनधर्मीयांचं पवित्र श्रद्धास्थान. एक किसानकन्या; एपीआय् या वृत्तसंस्थेची, एक सुमार रूपाची, पण बुद्धिमान वार्ताहर; एक रूपसंपन्न, निष्णात मानसशास्त्रज्ञ आणि तिचा गुणसंपन्न,देखणा प्रियकर; रशियन पंतप्रधानकीची महत्त्वाकांक्षा बाळगणारा एक रशियन परराष्ट्रमंत्री; साधी-सरळ, निष्कपट, नोकरदार ब्रिटिश महिला नि तिचा अनेक ‘उद्योग’ करणारा नवरा; एक अंध, पण रूपवान इटालियन तरुण अभिनेत्री नि तिचा क्रांतिकारक प्रियकर. वेगवेगळ्या स्वभावांच्या,व्यक्तिमत्त्वांच्या; वेगवेगळ्या थरांतल्या या व्यक्ती लूर्दला गोळा होतात आणि सुरू होतं एक उत्कंठापूर्ण , काहीशी रहस्याची छटा असणारं नाट्य. श्रद्धा, अंधश्रद्धा यांच्यांतील द्वंद्वाच्या आधारे उलगडत जाणारी कहाणी. श्रद्धेचा आणि धर्माचा ‘वापर’ आणि ‘व्यापार’ करुन घेण्याची वृत्ती सार्वत्रिकच असते. म्हणूनच ‘द मिरॅकल’ वाचून विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठी वाचक आपले विचार, आपला धर्म आणि आपलं राष्ट्र यांबाबत अंतर्मुख होऊन पुन्हा एकदा नव्यानं मांडणी करील, असं वाटतं.
-
Timirpanthi (तिमिरपंथी)
‘तिमिरपंथी’ ही कादंबरी चौर्य या कलेच्या आधारे आयुष्य कंठणाऱ्या जमातीतील कलाकारांवर बेतली आहे. पोटापाण्यासाठी गावोगावी वसती (दंगा) हलवणाऱ्या भटक्या जमातीतील मुख्यत्वे सती आणि तिच्या अनुषंगाने येणाNया व्याqक्तरेखांभोवती ही कादंबरी फिरते. ही सती उपजत कलाकार आहे. ‘ही’ कला अंगी घेऊनच ती जन्माला आली आहे. आईकडून गौरवर्णी लावण्य आणि पित्याकडून कामगिरीतलं कसब तिला लाभलं आहे. ती जिज्ञासू, चौकस आहे. धाडसी तर आहेच. समयसूचकता आणि प्रसंगावधानही तिच्याकडे आहे. ऐकलेल्या गोष्टींवर स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता तिच्यात आहे. तिची मतं तर्कसंगत असतात. वस्तीतल्या अपंग मुलीवर मायेचा पदर पसरणारा कनवाळूपणा तिच्यात आहे. शिक्षणाच्या अभावामुळे आपला समाज उपेक्षित आहे, शोषित आहे, भटका आहे, याची तिला जाणीव आहे. स्थिर समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी संस्कारक्षम शैशवात शिक्षणाची रुजुवात व्हायला पाहिजे अशी तिची धारणा होते. अशा या सतीची कहाणी वाचूनच अनुभवायला हवी.
-
Red Tape (रेड टेप)
सरकारी अधिकारी ही उपाधी भारदस्त वाटत असली तरी सत्ताधारी, विरोधक, प्रसार माध्यमे, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक घटकांसाठी खरे तर ते ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. कारण, कोणत्याही चांगल्या कामाचे श्रेय जाते सरकारकडे आणि काम बिघडले तर खापर मात्र फोडले जाते प्रशासनावर. संबंधित निर्णय किंवा योजना चांगली होती, पण प्रशासन कुचकामी ठरल्याने त्याची वाट लागली असा सर्वसाधारण मतप्रवाह असतो. अशी टिप्पणी करणे सोपे असले तरी प्रत्यक्षात विविध प्रकारच्या दबावांना, राजकारणाला, हितसंबंधियांच्या कट-कारस्थानांना तोंड देत आणि अनेकविध लाभांना तसेच आमिषांना दूर लोटत निर्णयाची अंमलबजावणी करणे महामुष्किल काम. शिवाय हे करताना सतत प्रशासनाच्या मजबूत पोलादी चौकटीचे भानही बाळगावे लागते. साहजिकच बहुतेकजण प्रवाहप्रतीत होत सत्ताधाऱ्यांचे वा वरिष्ठांचे ‘होयबा’ होणे पसंत करतात आणि स्वत:चे उखळही पांढरे करून घेतात. मात्र काही जिगरबाज अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत राहूनच या अ-व्यवस्थेविरोधात झगडा पुकारतात. व्यापक जनहीत डोळ्यासमोर ठेवून न्याय्य हक्कांसाठी झगडणाऱ्या अशा मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवावरच प्रशासनाचा गाडा पुढे सरकत असतो. दोन दशकांहून अधिक काळच्या पत्रकारितेत या सगळ्याची जवळून झालेली ओळख आणि सुमारे पावणेदोन वर्षे मंत्रालयात राजपत्रित अधिकारी म्हणून काम करताना ‘आतून’ घेतलेला प्रत्यक्ष अनुभव याची गुंफण करत एका वेगळ्या विषयाची केलेली ही मांडणी..
-
Dhana (धना)
"धना...तरुण पहिलवान. सर्जेराव या तालेवाराच्या मुलीवर राजलक्ष्मीवर प्रेम. धनावर वाघाचा हल्ला. गंभीर जखमी अवस्थेत धना वाघाला ठार मारतो. इस्पितळात उपचार घेत असताना त्याचं एका देशप्रेमी गुप्त फौजेकडून अपहरण. देशसेवेसाठी धनाला फौजेचं राजेपद देण्याची तयारी; मात्र त्याने घराचा आणि राजलक्ष्मीचा त्याग करण्याची अट. इकडे वनखात्याचा अधिकारी सूर्याजी गावात दाखल. सूर्याजीचं राजलक्ष्मीवर प्रेम; पण धनाच्या आणि तिच्या प्रेमाबाबत समजल्यावर त्या दोघांना एकत्र आणण्याचा निश्चय. धनाबाबत आणि त्या गुप्त फौजेबाबत सगळ्यांना कुणकुण लागते. फौजेची गुप्तता धोक्यात येते. त्यामुळे राजलक्ष्मी आणि सूर्याजीला संपवण्याचा फौजेचा निर्णय. त्यानंतर राजलक्ष्मीचं अपहरण. राजलक्ष्मीचं अपहरण कुणी आणि का केलेलं असतं? सूर्याजी त्या दोघांना एकत्र आणण्यात यशस्वी होतो का? सर्जेराव आणि सूर्याजीला फौजेचा ठावठिकाणा लागतो का? त्यांना धनाबाबतचे सत्य समजते का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘धना’ ही उत्कंठावर्धक कादंबरी जरूर जरूर वाचली पाहिजे. "
-
Nana Ani Mahadaji (नाना आणि महादजी)
राजकारणमुत्सद्दी नाना फडणीस आणि समशेरबहाद्दर महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील कर्तबगार पुरुष होते. खरेतर या दोघांच्या कार्य-कर्तृत्वामुळेच संपूर्ण हिंदुस्थानात मराठे प्रबळ झाले व मराठेशाही कळसाला पोहोचली! या दोघांनी केवळ राष्ट्रहिताकरिता वैयाqक्तक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून बजावलेल्या संयुक्त कामगिरीला उजाळा देणारी कादंबरी! अर्थात, या दोघांची राजकीय कारकीर्द सुमारे पन्नास वर्षांइतकी प्रदीर्घ असल्याने, ही केवळ त्यांच्या कामगिरीची झलक म्हणावी लागेल. कारण या कादंबरीमध्ये सन १७७२ ते १७८४ असा एका तपाचाच काळ आला आहे.
-
Guardian (गार्डिअन)
संगणकामुळे पूर्णपणे पेपरलेस झालेल्या विश्वात जेव्हा परत हाताने लिहिण्याचा शोध लागतो... एखादा शास्त्रज्ञ मंगळावर राहून डीएनएचं संशोधन करत असताना तिथेच त्याला साहाय्य करणाऱ्या मुलीशी विवाहबद्ध होतो... एखाद्या रोबोटमध्येही मानवी भावना जागतात... एखादा महासंगणक तीन अभियंत्यांना डांबून ठेवतो... हवामानातील बदलांच्या अचूक अंदाजांसाठीची थेअरी एक रोबोट एका शास्त्रज्ञाला सांगतो... लकुलीश ग्रहावरच्या स्त्रियांनी पृथ्वीवर महिलांची आंतरपृथ्वीय स्पर्धा घेण्याचं ठरवल्यावर चंद्रावर राहणाऱ्या स्त्रिया नाराज होतात... एम्ब्रायो बँकेच्या साहाय्याने आई बनून आपल्या मुलीला रोबोटच्या हवाली केलेल्या स्त्रीचं मातृत्व जागं होतं...अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांना मानवी भावभावनांचा साज चढवून लिहिलेल्या रोचक आणि वाचनीय कथांचा संग्रह ‘गार्डिअन.’
-
Bedhunda (बेधुंद)
‘बेधुंद’ ही जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा (फाइव्ह स्टार्स) या पाच मित्रांची कहाणी आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकणारे हे पाच जण वसतिगृहात राहत असतात. या पाच तरुणांच्या निमित्ताने कॉलेज जीवनाचा वेध या कादंबरीतून घेतला आहे. जया आणि हर्षलाच्या निमित्ताने आंतरजातीय विवाहाला होणारा विरोध, या पाच जणांवर सुरुवातीला सीनिअर्सकडून झालेल्या रॅगिंगच्या चित्रणातून रॅगिंगचा प्रश्न, अक्षा आणि सोनिया आणि अन्य मुलामुलींच्या माध्यमातून ‘सेक्स’चा अनुभव, या पाचही जणांच्या दारू पिण्यातून व्यसनाधीनता, सुऱ्या आणि पिया यांच्यात होणारं सेक्स चॅटिंग, काही उत्सव साजरे करत असताना विद्याथ्र्यांमध्ये जातीयवादावरून झालेली भांडणे इ. विषयांचं वास्तव चित्रण या कादंबरीतून केलं गेलं आहे. कॉलेज जीवनाची ही काळी बाजू समाजावरही विघातक परिणाम करू शकते, असा गर्भित इशारा या कादंबरीतून मिळतो. तेव्हा कॉलेज जीवनातील हे दाहक वास्तव जाणून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.
-
Rikta (रिक्त)
‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिाqस्थतीशरण, कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात. मग समलिंगी आकर्षणातून मुलीने एखाद्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेली ‘जोडीदार’ कथेतील डॉ. मीरा असेल किंवा एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला ‘वाट’ कथेतील शिंदे ड्रायव्हर असेल, नवऱ्याच्या संशयीपणाचं भूत मानगुटीवर असहायतेने वागवणारी ‘अस्तित्व’ कथेतील उज्ज्वला असेल किंवा सावत्रआईमुळे वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली ‘समाधान’ कथेतील कमू असेल. या कथा मनोविश्लेषणात्मक असल्या तरी त्या वाचकाची उत्कंठा वाढवत राहतात. व्यक्तिरेखांचं मनोविश्लेषण आणि ओघवती, लालित्यपूर्ण भाषा या बलस्थानांसाठी वाचकांनी हा कथासंग्रह मुळातून वाचावा असा आहे. वाचनीय आहे.
-
Mughal Sattecha Saripat (मुघल सत्तेचा सारिपाट)
मुघल सत्तेचा सारिपाट ही कादंबरी सत्ताग्रहण, श्रद्धा आणि जीवनाचे सार-समाधान यासंबंधीच्या प्रश्नांचा लेखणीच्या लालित्यपूर्ण फटकाऱ्याद्वारा धांडोळा घेते. या कादंबरीमध्ये त्या काळातले गुंतागुंतीचे राजकारण, दगाबाज़ मुघल, आणि वासना, वारुणी आणि अफूच्या नशेमध्ये मश्गूल असलेल्या व्यक्तींचे रेखन आहे. तसेच शिकारीच्या नावाखाली निष्पाप माणसांना आणि मुक्या प्राण्यांनादेखील सोसाव्या लागणाऱ्या जीवघेण्या छळाचे वर्णनदेखील आहे. सत्ताकारणाच्या जीवघेण्या स्पर्धेसह मुघल कालखंडाचे अतिशय चांगले चित्रण या कथानकातून उलगडते.
-
Sarja (सर्जा )
सर्जा’ हे एका बैलाचं आत्मकथन आहे. या आत्मकथनाची सुरुवात एका करुण प्रसंगाने होते. सर्जा, त्याचा जोडीदार राजा आणि त्यांची (विशेषत: सर्जाची) जोडीदारीण खिलारी यांची ताटातूट होते. त्यांच्या मालकाने दुष्काळामुळे आणि ते म्हातारे झाले म्हणून त्यांना विकलेलं असतं. त्या तिघांनाही एकाच टेम्पोमध्ये घातलेलं असतं; पण खिलारीला मध्येच उतरवलं जातं आणि सर्जा-राजाची रवानगी एका कत्तलखान्यात केली जाते. सर्जा कसाबसा तिथून निसटतो. सर्जाचं आधीचं नाव असतं शंभू; पण त्याचा मालक त्याला विकतो आणि दुसरा मालक त्याचं नाव ठेवतो...सर्जा. तिथेच त्याची राजाशी आणि खिलारीशी भेट होते. सर्जा आणि खिलारीमध्ये प्रेम निर्माण होतं. काही काळाने मालक सर्जा-राजा-खिलारी यांना विकून टाकतो. कत्तलखान्यातून पळालेल्या सर्जाची उपाश्या नावाच्या माणसाशी भेट होते. उपाश्या सर्जाला नंदीबैल करतो आणि पैसे मिळवायला लागतो. उपाश्याबरोबर भटकंती करत असताना अचानक एके दिवशी सर्जाची गाठ खिलारीशी पडते. कालांतराने सर्जा आणि खिलारीचं वय लक्षात घेऊन उपाश्या त्या दोघांना गाय-बैलांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत नेऊन सोडतो. तर असं हे ‘सर्जा’चं भावपूर्ण आत्मकथन वाचनीय आणि मनाला भिडणारं आहे.
-
Adgal.. (अडगळ)
बँकेतून सेवानिवृत्त झालेले जुगा काळे हे ‘अडगळ’ या कादंबरीचे नायक. वयाच्या सहासष्टीनंतर ते लिहायला लागतात. अल्पावधीत विपुल लेखन होते. सन्मान होतो. नावलौकिकही मिळतो; पण बायको आणि मुलांना त्यांच्या लेखनात, त्यांना मिळालेल्या मानसन्मानांमध्ये रस नाही. सेवानिवृत्तीनंतर माजी मंत्री व विद्यमान खासदार मोरे गुरुजींच्या शिक्षण संस्थेचं काम ते निरलसपणे करत असतात; पण त्या संस्थेतून त्यांना पद्धतशीरपणे बाहेर काढलं जातं. वस्तीशी असलेलं काळ्यांचं नातं, त्यांची समाजसेवा मुलांना रुचत नाही. वयाच्या या टप्प्यावर आपण घरातली अडगळ आहोत, असं काळ्यांना वाटायला लागतं. मसणजोगी समाजात जन्मलेले काळे दारिद्य्रात, अवतीभवतीच्या असंस्कृत वातावरणात वाढतात; पण शिक्षण आणि संवेद्य मन याच्या जोरावर ते व्यावहारिक आणि आत्मिक उन्नती करून घेतात. तरी समाजमन आणि व्यक्तिमन याचे गूढ व्यापार त्यांना प्रश्नांकित करतात आणि चिंतन करायला भाग पाडतात. दलित आणि दलितेतर या संबंधाचा माणूस म्हणून घेतलेला शोध आणि त्या अनुषंगाने प्रकटलेलं चिंतन, यासाठी ‘अडगळ’ जरूर वाचायला हवी.
-
Six Machine (सिक्स मशिन)
"कसोटी सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षट्कार ठोकणारा ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे. पण अशा अनेक गोष्टी सहज शक्य करून दाखवणं, हा वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडूच्या रोजच्या जीवनाचाच एक भाग झालाय. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पहिलं शतक झळकवण्याचा मान ख्रिस गेलकडे जातो. विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत त्यानेच प्रथम २०० धावा काढल्या. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. टी२० क्रिकेट सामन्यात कोणत्याही फलंदाजाने मारलेल्या षट्कारांपेक्षा, त्याने दुप्पट षट्कार लगावले आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्येही त्याने दोन तडाखेबंद त्रिशतकं काढलेली आहेत. हे सर्व विक्रम करताना त्याच्या हातात क्रिकेटमधील सर्वांत वजनदार बॅट होती आणि चेहऱ्यावर सदा फुलणारं हास्य होतं. जगभर प्रवास करणाऱ्या ख्रिस गेलचे इन्स्ट्राग्राम व ट्विटरवर लाखो चाहते आहेत. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूच्या धडाकेबाज फलंदाजीची व नाइटक्लबमधील त्याच्या धमाल मस्तीची एक तरी झलक पाहायला-ऐकायला मिळावी यासाठी त्याचे चाहते कायम उत्सुकतेने वाट पाहत असतात. खेळपट्टीवर टिच्चून उभा राहत तो दीर्घ काळ फलंदाजी करतो, रात्रभर पार्टीत मौज करतो; दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा उठून प्रथम एका मोठ्या पॅनकेकचा फडशा पाडतो आणि मग दुर्दैवी गोलंदाजांची दुर्दशा करण्यासाठी पुन्हा मैदानात पाऊल ठेवतो. किंगस्टनच्या धुळीनं भरलेल्या रस्त्याच्या टोकाला, पत्र्याचं छप्पर असलेल्या एका घरात राहणाऱ्या, आपल्या तीन भावांबरोबर एकाच बिछान्यावर झोपणाऱ्या व पोटाची सोय करण्यासाठी रिकाम्या बाटल्या बाजारात विकणाऱ्या एका लाजऱ्याबुजऱ्या मुलाला, क्रिकेट जगतातील उच्च स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले, याची कथा. ही कथा केवळ एका असामान्य क्रिकेटपटूची नाही, तर विषमता व भेदभावाविरुद्ध झगडणाऱ्या, शून्यातून आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करणाऱ्या व हे सर्व करताना आपलं स्वत्व हरवू न देणाऱ्या एका लढवय्याची आहे. "
-
The Seventh Scroll (द सेव्हन्थ स्क्रोल )
कथा आजच्या काळात घडलेली असली, तरी तिचा संबंध आहे चार हजार वर्षांपूर्वीच्या रिव्हर गॉडमधील जगाशी. सेव्हन्थ स्क्रोल– वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या कुशल कथाकाराची आणखी एक साहसकथा. धूसर बनून विस्मृतीतच गेलेल्या कालखंडामधील अफाट खजिन्याचे स्थान निश्चित करण्यासारख्या खाणाखुणा सेव्हन्थ स्क्रोलमध्ये सोडल्या आहेत. ड्युराइड अल् सिमा आणि त्याची इंग्लिश -इजिप्तशियन माता-पिता असलेली पत्नी रॉयन यांनीच पहिल्यांदा राणी लॉस्ट्रसच्या कबरीचा शोध लावला. त्या वेळी योगायोगानेच अत्यंत हुशार आणि कावेबाज ताईताने पेरो मॅमोस आणि त्याचा अफाट खजिना कबरीमध्ये पुरून ठेवल्याचे वर्णन असलेल्या पेपायरसच्या गुंडाळ्या त्यांच्या हातात पडतात. हा त्यांचा शोध नाइलपासून इथिओपियाच्या दऱ्याखोऱ्यांत पोहोचतो. तो खजिना फक्त स्वत:साठी मिळवण्याच्या लालसेने पछाडलेले ताकदवान लोक पेरोच्या गुप्त खजिन्यामागे लागल्यावर अत्यंत हिंसक असा पाठलाग सुरू होतो. ड्युराइडचा खून पडल्यावर रॉयन इंग्लंडमध्ये आसरा घेते आणि निकोलस क्वेन्टन हार्पर या विख्यात पुराणवस्तू संशोधकाबरोबर इथिओपियाला जाते – ड्युराइडसाठी! ताईतासाठी! एका प्राचीन पेरोच्या स्वप्नांसाठी!! आणि स्वत:च्या उद्ध्वस्त आयुष्याचे धागे पुन्हा जुळवण्यासाठीही!
-
The Odessa File (द ओडेसा फाइल)
सॉलोमन टाउबर या ज्यू व्यक्तीने लिहिलेल्या डायरीत छळ छावणीत हिटलरच्या एस. एस. संघटनेकडून ज्यूंवर केल्या गेलेल्या अनन्वित अत्याचारांचे, विशेषत: रोशमन या एस.एस. अधिकाऱ्याच्या क्रूरतेचे वर्णन असते. सॉलोमन आत्महत्या करतो आणि ती डायरी पोलिसांच्या हाती लागते. नंतर तरुण जर्मन पत्रकार पीटर मिलरच्या हाती ती डायरी लागते. ती डायरी वाचून मिलर रोशमनचा शोध घ्यायचा, असं ठरवतो. जेव्हा मिलर ती डायरी वाचतो तेव्हा तो खूप अस्वस्थ होतो. ज्यूंच्या हत्याकांडाबरोबरच त्या डायरीतील आणखी एक बाब त्याला रोशमन या क्रूरकम्र्याचा शोध घ्यायला प्रवृत्त करते. ती बाब कोणती याचं रहस्य कथानकाच्या शेवटी उलगडतं. रोशमनला शोधण्यासाठी मिलरला कोणत्या दिव्यातून जावं लागतं, याची कहाणी ‘द ओडेसा फाईल’ या कादंबरीतून चित्रित केली आहे. मिलरचा या शोध मोहिमेच्या दरम्यानचा प्रवास चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक आहे. तो प्रवास वाचकाला खिळवून ठेवतो. तो अनुभवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.