-
Nagnasatya ( नग्नसत्य )
स्त्री शरीरावरील अतिशय घृणास्पद व टोकाच्या अत्याचाराचा 'बलात्कार' हा एकच पैलू मी उचलला होता, त्यामुळे कथांमध्ये तोचतोचपणा तर येणार नाही याची मला सतत धास्ती होती. त्यासाठीही काळाचे संदर्भ, बदलतं समाज जीवन व त्यातही ठाण मांडून बसलेला अत्याचाराचा भाग याची गुंफण करणं शक्य झालं. ज्या सामाजिक संबंधांच्या मुशीत बलात्कार घडताहेत, त्या सामाजिक संबंधांचा संदर्भ घेतल्याशिवाय बलात्काराचं धगधगतं वास्तव आपल्याला उलगडणार नाही, हे नक्की. म्हणूनच एका व्यापक सामाजिक संदर्भात हा प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. - मुक्ता मनोहर
-
Vat Tudavatana ( वाट तुडवताना )
'वाट तुडवताना' हे रूढ अर्थाने आत्मकथन आहे; पण आत्मचरित्राची समग्रता त्यात नाही. अर्थात लेखकालाही ते अभिप्रेत नाही. श्री. उत्तम कांबळे यांच्या विद्याजीवनाची जडणघडण ज्यातून कळते, असे हे विशिष्ट क्षेत्रीय आत्मकथन आहे. ..... .... या विद्याजीवनाचे दोन पदर आहेत. एक : औपचारिक शिक्षणाचा व दुसरा : ग्रंथप्रेमाचा. याचीच परिणती पत्रकार, लेखक, संपादक, वक्ता, तत्त्वचिंतक, संघटक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता वगैरे होण्यात झालेली आहे. विद्याजीवनाचा हा समृद्ध आविष्कार आहे. जन्मवंश आणि विद्यावंश, अशी विभागणी करून माणसाच्या आत्मचरित्राचा विचार करावा लागतो. सामाजिक संरचनेमुळे असा विचार करणे भाग पडते, हे उघडच आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मवंश आणि विद्यावंश यांच्यात एकध्रुवीय एकात्मता आढळते, तर काहींच्या बाबतीत द्विध्रुवात्मक विरोध आढळतो. श्री. कांबळे यांच्या संदर्भात हा विरोध स्पष्ट आहे. सात पिढयांमध्ये कोणी शाळेची पायरी न चढलेल्या जन्मवंशात कांबळे यांचा जन्म झालेला. अठराविश्वे दारिद्रयाचा मिट्ट काळोख भोवती दाटलेला. सामाजिक संरचनेत प्रत्येक क्षेत्रात अधिकारवंचितता, ही या जन्मवंशाची काही परिमाणे आहेत. वडील जरी मध्य प्रदेशातील सागर येथे महार रेजिमेंटमध्ये शिपाई होते, तरी ते निरक्षरच होते. दारिद्रयातला संसार चालवताना ईला फारच कसरत करावी लागायची. दहा पैशांचे गोडे तेल आणि एका आण्याची तूरडाळ ती दोन वेळा पुरवायची. एक दिवाभर रॉकेल दोन रात्री वापरायचे, डोक्याला लावायचं तेल, पाचशे एक ब्रॅंडचा साबण वर्षातून एखाद्या दिवशी सणावाराला दिसायचा. लेखकाच्या विद्यावंशाचा विचार केला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. या विद्यावंशाची नाळ गौतम बुद्ध, महाराष्ट्रीय संत, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी प्रभृती महात्म्यांशी जोडली जाणे स्वाभाविक आहे. कारण या महानुभावांनीच आत्मभान, समाजभान जागवले, हे लेखकाने कृतज्ञतापूर्वक नमूद केलेच आहे; पण तो पुढचा भाग झाला. बालवयात पुस्तकांची ओढ वाटावी, खाऊपेक्षा पुस्तक प्रिय वाटावे, ही आंतरिक ऊर्मी म्हटली पाहिजे आणि ही ऊर्मी जोपासण्याचे काम जीव गहाण ठेवून 'जादूचा राक्षस' आणि 'शनिमहात्म्य' ही चार-चार आण्यांची पुस्तके घेऊन देणार्या ईने केले. लेखकाच्या औपचारिक शिक्षणाबाबतही ईने हीच वृत्ती ठेवली. या पायावरच लेखकाच्या विद्याजीवनाची इमारत उभी राहिली. जीवनाच्या वाटचालीत भेटलेल्या असंख्य सज्जनांच्या सहवासाने आणि असंख्य ग्रंथांच्या वाचनाने या जीवनाला पैलू पडत गेले. या विद्याजीवनाच्या उभारणीसाठी लेखकाने वाटेल तेवढे कष्ट घेतले. काही कामांनी तर मनस्वी आनंदही दिला. ज्या कामात कारागिरी, कौशल्य यांच्या वापराचा प्रत्यय यायचा, ती कामे आपल्याला यायलाच हवीत, अशी जिज्ञासाजन्य जिद्दही वाटायची. पण लेखकाची आंतरिक ओढ होती ती ज्ञानाकडे. या वाटचालीतच तो कथा, कविता लिहू लागला. यामुळे शब्दांच्या अंत:स्फूर्त प्रेमामुळे वाचनाच्या माध्यमातून लेखकाने जी शब्दसाधना केलेली होती, तिचे हे फळ होते. मराठी साहित्यातील सर्वच महत्त्वपूर्ण पुस्तकांचे वाचन केले. प्राचीन काळापासूनचे महत्त्वाचे ग्रंथ निमित्तानिमित्ताने वाचले. भाषा, शब्द यांचे महत्त्व जाणून त्यांचे बळ वाढविण्याचा मन:पूर्वक प्रयत्न केला. या शब्दसत्तेमुळे स्वत:ला एक ओळख प्राप्त होत होती. आत्मविश्वास येत होता. लेखकानेच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे पुस्तक वाचताना मला स्वत:ला खूप छोटे अगदी सरपटणारा प्राणी झाल्यासारखं वाटायचं. पुस्तक वाचू लागलो, की आपला आकार वाढतोय, सरपटण्याएएवजी आपण चालू लागतो, असं वाटायचं. शब्दसत्तेच्या संदर्भात अणुरणिया थोकड्या कोणत्याही माणसाचा हा आकाशाएवढा अनुभव असतो. यामुळे शब्द हे रत्नांचे धन वाटणे, शब्द हे शस्त्र वाटणे ओघानेच आले. 'ग्रंथ आणि माणसं एकाच वेळी वाचत जाणं अतिशय आनंददायी असतं,' असे लेखकाने म्हटले आहे. पत्रकाराचे शब्द जेव्हा समाज हलवतात, समाजातील माणुसकी जागी करतात, तेव्हाचा आनंद अवर्णनीय, याचे भान ठेवणारे लेखक शब्दसत्ता आणि पत्रकारिता यांचे नातेच स्पष्ट करतात. हुतात्मा बारपटे यांच्या स्मारकाच्या बांधकामावर त्यांची पत्नीच मजूर म्हणून जात होती. मुलगा बांधकामावर वॉचमन म्हणून काम करीत असे. या हकिगतीची लेखकाने कोल्हापूर 'सकाळ'मध्ये बातमी दिली. परिणामत: माजी मंत्री राजारामबापू पाटील यांनी त्या महिलेला घर बांधून दिले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या हस्ते घराचे उदघाटन झाले. एका वेटर असलेल्या एम. ए., बी. एड. युवकाची हृदयद्रावक कहाणी प्रसद्ध होताच त्याला नोकरी मिळणे, शेती खात्यातील एका चालकाच्या पत्नीचे सर्वांगीण शोषण यासंबंधीची वार्ता प्रसद्ध होताच तिला नोकरी मिळणे, हे वृत्तपत्रांतील शब्दांना प्राप्त झालेले बळ शब्दसत्तेचे स्वरूप स्पष्ट करतात. बातमी प्रसद्ध करताना होणार्या गफलती, चुकीचा मजकूर पुरवल्यामुळे तत्संबंधित बातमीमुळे संबंधितांवर होणारा अन्याय, याबाबतही लेखक संवेदनशील असल्यामुळे हळहळतो आणि आपल्याला शब्दसामर्थ्याची दुसरी बाजूही कळते. चालेन तेवढया पायाखालच्या जमिनीतून वाट निर्माण करणे आणि आत्मसामर्थ्य कमावत कमावत ती तुडविणे, हा लेखकाबाबत पाचवा पुरुषार्थ म्हटले पाहिजे. ग्रंथांनी, माणसांनी हे बळ पुरविले. बळ स्वीकारण्याचे सामर्थ्य लेखकापाशी बीजभूत होतेच. पेपर विकता विकता एक दिवस संपादक होण्याचे स्वप्न पाहणार्या लेखकाची स्वीकारशीलता किती तीव्र असेल, याची आपण कल्पना करू शकतो. या संपूर्ण आत्मकथनात साहित्य, तत्त्वज्ञान, धर्म, समाजशास्त्र अशा विविध विषयांवरील मराठी, इंग्रजी अशा शेकडो ग्रंथांचे संदर्भ येतात. जगातल्या उत्तमोत्तम लेखकांचे हे संदर्भ लेखकाच्या हाती एक महत्त्वाची शब्दसत्ता प्रदान करतात. शब्द माणसाला सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करतात. जगातल्या सर्व महान पुरुषांनी आपल्याला शब्दांद्वारेच मुक्त केल्याचे अनेक दाखले मिळतात. शब्दांद्वारा स्वातंत्र्य प्राप्त करून घेणार्या माणसाच्या ठायी शब्दसत्तेद्वारा मानवाचे सर्वंकष कल्याण व्हावे, हा ध्यास वसतो आणि एक वसा घेतल्यासारखे आपले कार्य करीत असतो. शब्दांशी तो यामुळेच आपले नाते तुटू देत नाही. या आत्मचरित्राच्या अखेरीस लेखक लिहितो, 'मीही माझी वाट तयार करतोय... मी माझी वाट तुडवतोय- स्वत:ची- माझ्याच घामातून तयार होणारी आणि मलाच ठेच लागल्यामुळं माझ्याच अंगठयातून वाहणार्या रक्तामुळं चकाकणारी... या सर्व प्रवासात पुस्तकं माझी छत्रं आहेत. शब्द माझे सोबती आहेत. काळीज ओले ठेवण्यासाठी आवश्यक ते अश्रूही माझ्याकडे आहेत... माझ्या जगण्यात ग्रंथांचा वाटा प्रचंड मोठा- मोजता येणार नाही इतका मोठा. माझ्यावर सावलीही ग्रंथाची आणि माझे हातही ग्रंथाच्याच हातात- मोठया विश्वासाने गुंतलेले. मला वाचण्यासाठी अजून वाचायचे आहे.'' जीवनविषयक कथन करताना लेखक केव्हा चिंतनाची उंची गाठून तरलपणे उंच विहार करतो, तर केव्हा भाष्याच्याद्वारे जमिनीच्या तळावर घट्ट पाय रोवून उभा राहतो, हे कळू नये असे भाषेचे लवचिक विभ्रम पाहायला मिळतात. अनेक वाङमयप्रकार लेखक हाताळत असल्यामुळे तीही परिमाणे या भाषेला लाभतात. हे सर्व लेखकाच्या मूळच्या झर्याला नितळ, पारदर्शक करतात. 'माझे वाचन माझे वाचन' या सदरात 'ग्रंथपरिवार' मासिकाने ही लेखमाला प्रसद्ध केली त्याबद्दल ग्रंथपरिवाराचे भा. बा. आर्वीकर व श्री. कांबळे यांच्यामागे लागून त्यांना लिहायला भाग पाडल्याबद्दल व ग्रंथरूपाने ही लेखमाला प्रसद्ध झाल्यानंतर चिकित्सक प्रस्तावना लिहिल्याबद्दल प्राचार्य प्रभाकर बागले यांचे समस्त वाचकांच्या वतीने आभार मानतो.
-
Touching the Void (टचिंग द व्हाईड)
गिर्यारोहण करताना अपघात होत असतात. या पुस्तकात अशा अपघाताचे आणि त्यात सापडलेल्या ज्यो सिंप्सन या गिर्यारोहकाचा जो अनुभव आहे, तो चित्तथरारक आहे. अँडीज पर्वत रांगांतील 21,000 फूट उंचीच्या हिमशिखरावरून ज्यो खाली कोसळला. तो मृत्युमुखी पडलाय असेच सगळ्यांनी गृहीत धरले होते, मात्र पर्वताच्या एका कपारीत पडलेला ज्यो जिवंत होता. प्रचंड अडचणींना तोंड देऊन ते सायमन थेट्सच्या तळावर परतला. मूळ इंग्रजीत असलेले हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने मराठीत आणले आहे. उष:प्रभा पागे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
-
Bharatratna
भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये सात महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. या पुरस्कारावर या सात मंडळींनी आपल्या कर्तृत्वाने नाव कोरले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासून ते पंडित भीमसेन जोशी यांच्यापर्यंतच्या सात व्यक्तींच्या कारकिर्दीचा आढावा नयन सरस्वते यांनी या पुस्तकात घेतला आहे. या सात मंडळींनी किती वेगवेगळ्या संघर्षाला तोंड दिले आणि आपले ध्येय कसे साध्य केले, ते सारे या पुस्तकातून एकत्रितपणे समोर येते.
-
Vikram Vetal Ani Kala Nirnay Ghenyachi (विक्रम-वेत
विक्रम-वेताळच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र या कथांचा उपयोग एखादे व्यवस्थापनाचे तत्त्व शिकण्यासाठी कसा करता येईल, असा विचार केला गेला नव्हता. इथे याच कथांचा आधार घेत व्यवस्थापन तत्त्व अत्यंत सोपेपणाने समजावून सांगितले आहे. रंजक शैलीत कथा सांगून एखादा निर्णय हुषारीने कसा घ्यायचा याबाबतचे मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे.
-
Manat ( मनात )
अच्युत गोडबोले लिखित "मनात' हे मानसशास्त्रावरचं पुस्तक अलीकडंच प्रसिद्ध झालं. केवळ सात आठवड्यांत या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या. शालेय वयात "मनाचे श्लोक' बहुधा प्रत्येकानंच वाचलेले असतात. गोडबोले यांनाही त्या मनाच्या श्लोकांनी मनाविषयी विचार करायला भाग पाडलेलं दिसतं. त्यानंतर पुढच्या आयुष्यभराच्या शालेय, महाविद्यालयीन, चळवळीच्या काळात आणि पुढं विविध महत्त्वाच्या जागतिक कंपन्यांमध्ये काम करतानासुद्धा या मनाच्या प्रकरणानं लेखकाला पछाडलेलं होतं असं दिसतं. व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तोंड देताना या "मन' नावाचं प्रकरण लेखकाच्या मध्ये येतच असे. साहित्य, कलेच्या प्रांतात मुशाफिरी करतानाही लेखकाला जागोजागी या "मनाच्या' दर्शनानं स्तिमित व्हायला व्हायचं. या आणि अशा अनेक गोष्टींनी लेखकाला मनात हे पुस्तक साकारण्याची प्रेरणा आणि बळ दिलेलं दिसतं. अर्थात हे पुस्तक जाणत्या पण सर्वसामान्य वाचकांना कळेल, अशा भाषेत समजवायचं या विचारानं जन्माला आलं. सर्वसामान्य माणसानं ठिकठिकाणी मनाविषयी ऐकलेल्या कथा, संकल्पना, शास्त्रज्ञांची नावं, त्यांचं जे कुतूहल चाळवलं जातं, त्याला शास्त्रीय ज्ञानाचा पाया या ग्रंथाच्या वाचनातून जरूर लाभतो. मन म्हणजे काय, मनाचा शोध घेताना प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास गोडबोले यांनी उलगडून दाखवला आहे. मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत - एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या पुस्तकात आहे. सोपी, सुलभ, सुटसुटीत वाक्यरचना आणि सर्व प्रकारच्या वाचकांना कळेल अशी ओघवती, खुसखुशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. वाचायला सुरवात करताच वाचक त्यात पूर्ण बुडून जातो. पुस्तक हातावेगळं केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. यातल्या प्रकरणांची नावं वाचल्यावरच आपल्याला हव्या असलेल्या माहितीवर ज्ञानाची किल्ली सापडल्याचा आनंद होतो. मन एक शोध, मेंदू : शोध आणि रचना, फ्रॉईडपर्यंतची वाटचाल, फ्रॉईड आणि युंग, एक्सपरिमेंटल सायकॉलॉजी, बिहेविअरिझम, गेस्टाल्ट सायकॉलॉजी, डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी, बुद्धी, व्यक्तिमत्त्व, भावना-प्रेरणा, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, पर्सेप्शन सायकॉलॉजी, तसंच मनोविकार आणि मानसोपचार अशा 17 भागांतून आणि जवळपास 600 पृष्ठांतून हा खजिना वाचकांसमोर गोडबोले यांनी रिता केला आहे. जवळपास 87 संदर्भग्रंथांच्या संदर्भानं "मनात' हा ग्रंथ समृद्ध झाला आहे. आपल्याला हव्या असलेल्या विशिष्ट संकल्पना किंवा शास्त्रज्ञांविषयी जाणून घेण्यासाठी नामसूचीही दिलेली आहे. सर्वसामान्य वाचकांच्या हाती हा ग्रंथ देताना या विविध विभागांची केवळ वरवरची आणि साधी सोपी माहिती न देता तिच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अतिशय गंभीरपणे, पण तरीही अत्यंत उत्कटतेनं लेखकानं केलेला जाणवल्याशिवाय राहत नाही. अनेक पाश्चिमात्य तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ यांचा आधार घेतानाचा पौर्वात्य ज्ञानशाखा आणि तत्त्वज्ञान यांचाही सुरेख मेळ लेखकानं साधला आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानाचा समर्पक संदर्भ देताना लेखकानं आनंदाची गुरुकिल्ली आपल्याला शोधून दिली आहे. लेखक म्हणतो त्याप्रमाणे एखाद्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना मधल्या प्रवासातील, प्रक्रियेतील आनंदही तितक्याच उत्कटतेनं उपभोगला पाहिजे. अंतिम साध्य शेवटी लाभत नाही, तर ते प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यात थोडं थोडं सापडत जातं. त्याचं "सेलिब्रेशन' करतच ही सफर पुढं चालली पाहिजे. प्रसिद्ध सामाजिक विचारवंत आणि संशोधक डॉ. अभय बंग आणि डॉ. प्रकाश आमटे, प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी बापट, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे, समाजाचं मानसशास्त्राबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारे डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. प्रदीप पाटकर, विविध विद्यापीठांतले मानसशास्त्राचे विभागप्रमुख अशा सर्वांनी मन:पूर्वक दिलेल्या अभिप्रायांनी "मनात' या पुस्तकाच्या उपयुक्ततेवर आणि सौंदर्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. तसंच त्यांच्या प्रतिक्रियांमधूनग्रंथाची उंची आणि खोलीही अधोरेखित झाली आहे.