-
Nave Shaikshanik Dhoran (नवे शैक्षणिक धोरण)
५५ प्रश्नांची नेमकी उत्तरं, आणि आणखीही पुष्कळ... सरकारी धोरणं वेळोवेळी जाहीर होत असतातच की. मग नव्या शैक्षणिक धोरणाचा यंदाच एवढा गवगवा कशासाठी? ही फक्त सरकारी प्रसिद्धीची युक्ती? की त्यात खरंच आहे काही उपयुक्त? कुणाचा काय फायदा होणार यातून? शिक्षकांना काही लाभ मिळणार की कामंच वाढणार फक्त? आमच्या मुलांचं खरंच काही कल्याण होणारे का? भाषांची संख्या वाढवणार का? पदवी परीक्षा तीनऐवजी चार वर्षांची? कशासाठी? क्रेडिट पॉलिसी फार किचकट नाही का वाटत? ‘मेजर, मायनर, कौशल्ये, व्होकेशनल' अशा वेगवेगळ्या श्रेणीत विषय विभागले आहेत ते का? १० ± २ ± ३ ऐवजी ५ ± ३ ± ३ ± ४ हा नवा पॅटर्न आणलाय. यातून गोंधळ वाढणार की काही पदरात पडणार? पालकांनी नक्की करायचं तरी काय? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२०) यंदापासून अमलात येतंय, अशा वेळी शिक्षणातल्या सगळ्या घटकांना पडणा-या तब्बल ५५ प्रश्नांची नेमकी उत्तरं देणारं, शिक्षणतज्ज्ञांनी लिहिलेलं मोलाचं पुस्तक.
-
Nandighosh Yatra Shreekrushna Katha (नंदीघोष-यात्र
डॉ. रघुनाथ माशेलकर (FRS) जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत पुस्तक वाचताना आपण सहप्रवासी कधी होतो ते समजतच नाही, ही त्यातली खरी गंमत आहे. त्या दोन मित्रांच्या गप्पांत आपण रंगून जातो, जणू तो काळ जगू लागतो, त्यायोगे आपल्या ज्ञानात तर भर पडतेच, पण आपण नकळत सुज्ञतेचे धडेही आत्मसात करतो.... कृष्णाच्या दैवी रूपापल्याड नेणारी ही शिकवण आहे... प्रत्येकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे, हे मी आवर्जून सांगेन. डॉ. सुचेता परांजपे संस्कृत, ‘वेदिक स्टडीज' आणि ‘इंडॉलॉजी'; मध्ये जगभर मान्यताप्राप्त विदुषी; अमेरिकन, जर्मन विद्यापीठात प्राध्यापिका (BORI) महाभारत चिकित्सक आवृत्ती';च्या समितीवर; फग्र्युसन कॉलेज फेलो दोन निरनिराळ्या व्यक्तींनी एकत्र येऊन प्राचीन इतिहासाला आजच्या संदर्भात आणून एक अतिशय वाचनीय आणि उत्सुकता वाढवणारं वाङ्मय लिहायचं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. खूप अवघड मार्ग आहे हा. कुठेही, अगदी काळाबद्दलही चूक नाही; सगळं कसं एकसंध. आपल्या प्राचीन परंपरा आणि वाङ्मय यांना कारण नसताना धुत्कारणा-या नवीन पिढीचे डोळे उघडणारं हे मनोरंजक पुस्तक सर्वांनीच वाचावं असं आहे. डॉ. मोहन आगाशे मानसोपचारतज्ञ, कलाकार, संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते अगदी सामान्य परिस्थितीमधील गंमत शोधण्याची हातोटी लेखकांपाशी आहे आणि ही विनोदबुद्धी मला आनंददायी वाटली... पुस्तकाची भाषा सहज आहे. अनेक बोधकथा आणि दंतकथा सांगताना वापरलेली दोन पात्रांमधील संवादात्मक शैली मनोवेधक असल्यामुळे पुस्तक हातांतून सोडवत नाही... अनुभवानुसार हे पुस्तक वाचून झाल्यावरसुद्धा दीर्घकाळ माझ्या स्मरणात राहील.
-
Vidroha (विद्रोह)
हेन्री डेन्करच्या ‘आऊटरेज` या गाजलेल्या कादंबरीचा ‘विद्रोह` हा स्वैर अनुवाद आहे. वाचताना अखेरपर्यंत मन खिळवून ठेवणार्या या कादंबरीत पुष्कळ काही असे आहे की, जे समाजजीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. कायद्याचाच आधार घेऊन खरे गुन्हेगार कसे सुटतात, यात कायद्याच्या तांत्रिक बाबींनाच कसं महत्त्व येतं, त्यामुळं एखादी केस लढविताना वकिलांना किती प्रचंड आणि जिकिरीचे खटाटोप करावे लागतात, एका नालायक सराईत गुन्हेगारानं एखाद्या मुलीवर बलात्कार केल्यानं त्या मुलीचं संपूर्ण घरच कसं उद्ध्वस्त होतं, एखाद्या सनसनाटी बातमीचे हक्क मिळवून कथाकादंबर्या लिहिणारे पोटभरू साहित्यिक कसे असतात, तसेच मूळ वस्तुस्थितीचा विपर्यास करून पोटभरू बातमीदारही कशी पत्रकारितेच्या नावाखाली सतत गुन्हेगारी करत असतात व शहाजोगपणे समाजात हिंडत असतात, न्यायाधीश म्हणून निर्णय देणार्याला खरा गुन्हेगार कोण हे माहीत असूनही केवळ कायद्याच्या तंत्राने त्याचे हात बांधलेले असल्यामुळे त्याला विपरीत निर्णय कसे द्यावे लागतात, आजची कायदा व्यवस्था ही अनेक दृष्टींनी कशी निकामी झाली आहे इत्यादी अनेक पदर या कादंबरीला आहेत. जेव्हा आपल्याला खरा न्याय मिळत नाही, खरा गुन्हेगारच जेव्हा सहीसलामत सुटतो, तेव्हा नाइलाजाने कायदा हातात घेऊन खरा न्याय मिळवावा लागतो; हा या कादंबरीचा मध्यवर्ती गाभाही तितकाच महत्त्वाचा आहे."
-
Bai Ga (बाय गं)
बाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... ‘बाय गं...’ या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... लहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते जीन्स... कुरडया - शेवया ते नूडल्स... निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनीअर मुली.. एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन... हा लांब पल्ल्याचा प्रवास.... आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, विचार करणारी नायिका.... अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी..... बाय गं.
-
Bread,Cement,Cactus (ब्रेड सिमेंट कॅक्टस)
घर म्हणजे नक्की काय? आणि त्याला जोडली गेलेली आपलेपणाची भावना म्हणजे काय? एखाद्या परिसरात अल्पसंख्याक म्हणून वावरताना या संकल्पनेपुढे भलतेच प्रश्न उभे राहतात. काय आपलं आणि काय परकं याचीच संदिग्धता लागून राहते. त्यातून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा संघर्ष आणखी गुंतागुंतीचा होतो. अॅनी झैदी अशाच एका प्रश्नातली गुंतागुंत मांडत स्वतःचं आयुष्य मांडतात. आपल्या वडिलोपार्जित गावापासून, गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या प्रदेशात, त्या आता राहत असलेल्या मेगा-सिटीपर्यंतचा हा प्रवास आहे. झैदी अल्पसंख्याक म्हणून आपलेपणाच्या भावनिक निकडीबद्दल आणि इतर समुदायांकडून मिळणाऱ्या तुसड्या वागणुकीबद्दल मांडणी करत स्थलांतरितांच्या जगण्याबद्दलचा एक सूक्ष्म दृष्टीकोन प्रदान करतात.
-
Chumban (चुंबन)
तळागाळातल्या असंख्य स्त्रिया आणि त्यांचे संघर्ष... कधी स्थलांतराच्या वाटेत भरडणाऱ्या, तर कधी पुरुषी वर्चस्वाखाली भरडणाऱ्या या स्त्रिया. त्यांच्या दुःखांना शब्दबद्ध करण्याचं काम तसलिमा नासरिन करतात. या नायिका जितक्या परिस्थितीने हतबल आहेत, तितक्याच खमक्याही आहेत. जगण्याची अगम्य जिद्द त्यांच्यात दिसते. त्या अघोरी धर्मवादाविरोधात उभ्या राहतात, अनिष्ट रूढी-परंपरांविरोधात उभ्या राहतात. प्रसंगी प्राणांची बाजी लावून स्वतःची मूल्ये जोपासतात. त्यामुळेच यातल्या प्रत्येक कथेत एक थक्क करणारी नायिका भेटते.
-
Moharlela Chandra (मोहरलेला चंद्र)
मोहरलेला चंद्र` — बाबाराव मुसळे यांचा हा कथासंग्रह. या संग्रहातील कथा वाचताना मुसळे यांच्या मनात फुलू लागलेला साहित्यिक मोहर स्पष्टपणे जाणवत जातो आणि हा मोहर कुठल्या साध्यासुध्या आंब्याचा नसून स्वत्वानं फुलून येणार्या नवतरुण ग्रामीण मनाचा आहे, याची खात्री होते. ग्रामीण जीवनात अनेक लहान-मोठे संघर्ष होत असतात. नवरा-बायकोतील रूसवे, तारुण्य बहरून आलेल्या विवाहित षोडशेच्या मनाचा कोंडमारा, अंधश्रद्धेमुळे निर्माण होणारा तणाव, जमीन हडपण्यासाठी पांघरलेले वेडेपण, आपल्याच समाजाविरुद्ध उभे राहिलेले कुटुंब, खेड्यातील राजकारण यांसारख्या विविध संघर्षाच्या ठिणग्या घेऊन मुसळ्यांनी आपल्या कथा फुलविल्या आहेत. या कथांतील व्यक्ती असहाय्य न होता संघर्षाविरुद्ध धडपड करीत असल्याने कथेत वेधकता आली आहे. ग्रामीण बोलीभाषेचा गंध असलेल्या या कथा वैदर्भीय मातीचा कस घेवून आकाराला येतात आणि तरूण साहित्यिक पिढीत जे नव्य उमेदीचे वैदर्भीय साहित्यिक आहेत; त्यात श्री. मुसळे यांचे महत्त्वाचे साहित्यिक स्थान आहे, हे पटवून देतात.
-
Pyasa (प्यासा)
सुधीर नांदगावकर यांचे हे पुस्तक म्हणजे गुरुदत्तवरील त्यांच्या प्रेमाचा एक उत्कट आविष्कार ! गुरुदत्तच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या घरी पोहोचलेल्या मोजक्या पत्रकारांत नांदगावकरही होते. त्यावेळी झालेल्या चर्चा, पत्रकार म्हणून कळलेल्या काही आतल्या गोष्टी आणि गुरुदत्तविषयीचा अपार आदर यांमुळे ‘गुरुदत्तने आत्महत्या केली’ यावर नांदगावकरांचा विश्वास कधीच बसला नव्हता... सुधीर नांदगावकर यांनी या पुस्तकाच्या लेखनासाठी विशेष प्रयत्नांनी माहिती गोळा केली आहे. ‘चरित्र-कादंबरी-जीवनप्रवास’ असा एक संमिश्र घाट स्वीकारला आहे. गुरुदत्तच्या आयुष्यातल्या एरवी फार लिहिल्या-बोलल्या न गेलेल्या घटनांचे तपशील, त्याच्या जगण्याचे, चित्रपटनिर्मितीचे, विचारप्रकियेचे काही नवे पैलू आपल्याला कळतात. आपल्या ओळखीचे चित्रपट, गाणी यांचा जन्म कसा झाला, या माहितीत आपण गुंतत जातो आणि अनेकदा तर त्या घटनांचे आपण जणू प्रत्यक्ष साक्षीदार आहोत, असे आपल्याला वाटत राहते... श्रीकांत बोजेवार
-
Abhishekee Pandit Jitendra (अभिषेकी पंडित जितेंद्र
पं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं. स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरिक उर्मी! त्यामुळे असेल, आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळं काही करण्याचा अट्टाहास त्यांनी केला नाही; पण आपोआप खूप काही वेगळं घडत गेलं. त्याविषयी संगीतवर्तुळात कौतुक होतं, कुतूहल होतं. पं. जसराजजी म्हणत असत, `उस शिष्य का क्या कहना कि जिनके गाने पे उनके गुरुही हजार जान से फिदा हों।' तर पं. भीमसेन जोशींचा अनुभव होता, `पं. जितेंद्र अभिषेकी हे रसिकांची मागणी असलेले कलाकार आहेत. त्यांच्याविषयी रसिकांच्या मनात एक वेगळं आकर्षण आहे.' ज्येष्ठ गायक-संगीतकार सुधीर फडके यांना बुवांच्या चालींमध्ये त्यांचं प्रतिभासंपन्न समृद्ध व्यक्तिमत्त्व दिसत असे, `मीच काय, अनेक कीर्तिवंत संगीतकारांनी अभ्यास करावा, अशा त्यांच्या नाट्यसंगीतरचना आहेत.' ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री ज्योत्स्नाबाई भोळे यांनी आपल्या गोव्याच्या गंपूची जडणघडण, त्याचा उत्कर्ष जवळून पाहिला होता. बुवांना गंपू म्हण-यांपैकी ज्योत्स्नाबाई एक होत्या. `खूप मोठी शिष्यपरंपरा एका विशिष्ट पद्धतीनं निर्माण करण्याचं फार मोठं श्रेय जितेंद्रला आहे.' अशा या प्रतिभावान, चतुरस्र कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अन् संगीतकर्तृत्वाचा वेध घेणारा चरित्रग्रंथ.
-
Punashcha Honeymoon (पुनश्च हनिमून)
पुनश्च हनिमून एका लांबलेल्या आत्महत्येचा प्रवास. आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील मध्यमवर्गीय, चाळिशीतील जोडप्याच्या वैवाहिक जीवनातील वैचारिक विसंवादाची जीवघेणी आंदोलने या दोन तासांच्या नाट्यप्रयोगात आहेत. ही आंदोलने आषाढातील भरलेले आकाश अधिक झाकोळून टाकतात. हे काही अवखळ करमणुकीचे नाटक नाही. सध्याच्या जगण्यातील विखंडतेवर हे नाटक सतत भाष्य करते. जगण्यातील अपरिहार्यता, स्त्री-पुरुष लग्नसंबंधांची सार्थकता, अर्थपूर्णता आणि कालौघातील निरर्थकता, त्यातील भाव-विषता यांच्या रंगमंचीय खेळाचे गारूड नाटक संपल्यावरही आपल्याबरोबर येते. वरकरणी मस्त चाललेल्या लग्नसंसाराच्या अंतर्मनाचे हे रंगमंचीय धिंडवडे आहेत. अशा नाटकाला सुरुवात असते, पण शेवट असतोच असे नाही. तो प्रत्येकानी आपापला समजून घ्यायचा असतो. सतीश आळेकर
-
Dagabaj (दगाबाज)
शरद पवारांची नेहमीच "आयत्या बिळावर नागोबा"! अशी भूमिका राहीली आहे. त्यांची 62 वर्षातील राजकीय वाटचाल अभ्यासल्यास ते भ्रष्ट्राचारी व.. दरोडेखोर वाटतात. त्यांची सर्वच धोरणे, योजना या स्वतःसाठीच असतात. त्यांचे राज्य, देश व किंबहुना .. ज्या जातीचे ते आहेत त्यांचेही होऊ शकले नाहीत. ही., वास्तव्रता आणि तेवढेच मोठे दुर्दैव सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याचा हा नवा मंत्र त्यांनी राज्य व देशाच्या राजकीय पटलावर आणला. ते कधीही अभ्यासू, बुद्धिमान नेते नव्हते व नाहीत. अभ्यासू नेते ही त्यांनी स्वतः जाणीवपूर्वक तयार केलेली प्रतिमा आहे. वास्तविक जीवनात ते गुन्हेगार, भ्रष्ट्राचारी राजकारणी आहेत. जर खरच ते अभ्यासू नेते असते वर राजकारण, समाजकारणाला विधायक व सकारात्मक वळण देऊन विकासकामांची गती वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण अपेक्षित होते, अशा मिळालेल्या अनेक सुवर्णसंधी त्यांची वर्तणूक व घातकी स्वभावदोष यामुळे त्यांनी त्या गमावल्या. शरद पवार म्हणजे यशवंतराव चव्हाण व जनसंघ यांचे अनैतिक राजकीय अपत्य होय. अशी त्यांची समर्पक व्याख्या करता येईल.
-
Ratan Tata Ek Deepstambh (रतन टाटा एक दीपस्तंभ)
शंतनू नायडू हा विशीतला तरुण, 2014 साली, ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करू लागला. वेगाने धावणार्या गाड्यांच्या चाकांखाली चिरडल्या जाणार्या स्थानिक भटक्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्याने एक अभिनव योजना शोधून काढली. स्वतः रतन टाटांना भटक्या कुत्र्यांबद्दल अतोनात कणव असल्याने त्यांनी शंतनूच्या कृत्याची दखल घेतली. त्याने प्रभावित होऊन त्यांनी शंतनूच्या या व्यवसायात पैसे तर गुंतवलेच; पण कालांतराने ते शंतनूचे गुरू, बॉस आणि अनपेक्षितपणे प्रिय मित्रसुद्धा झाले. ‘रतन टाटा एक दीपस्तंभ’ ही एक अतिशय प्रामाणिक आणि मनःपूर्वक सांगितलेली भावकथा आहे. एकविसाव्या शतकातला तरुण आणि ऐंशीच्या दशकातला तपस्वी यांच्यातल्या अनोख्या नात्याची चुणूक आपल्यासमोर येते आणि त्यातूनच भारताचा लाडका मेरूमणी आपल्यासमोर वेगळ्याच प्रकाशात झळकतो.
-
CCTVnchya Gard Chayet (सीसीटीव्हींच्या गर्द छायेत)
विद्यमान मानवी संस्कृतीवर तंत्रज्ञान क्रांतीचे अनेक तऱ्हेचे भलेबुरे परिणाम झाले आहेत. नवऔद्योगिक व तंत्रज्ञानप्रणित आधुनिकोत्तर काळाच्या परिणामातून गीतेश गजानन शिंदे यांची कविता निर्माण झाली आहे. या जगातले ताणतणाव आणि पेच त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहेत. भूतकाळातील मानवी जग, निसर्गसृष्टी आणि सध्याच्या जगातील अंतर्विरोधातून ही कविता निर्माण झाली आहे. हरवलेली स्वप्नभूमी आणि आत्ताच्याकृष्णविवरातील छायांनी या कवितांना आकार प्राप्त झाला आहे. भूतकाळातील भरलेपणाची जाणीव आणि विविध प्रकारच्या अंतरायाचा स्वर या कवितांमधून ऐकू येतो. आजच्या जगातील रिळाचित्रदर्शनातील (रिल्समधील) स्वमग्न, सेल्फी समाजाच्या एकाकी रंजनमायेची असोशी या कवितेतून प्रकटलीअसून आभासी मायाजाळात हरवलेल्या जगाच्या मायाबंधाची ही जाणीव आहे. भाषा आणि भावना रक्तबंबाळ झालेल्या जगाचे हे संवेदन आहे. कवितेतील या ताणतणावाला समांतर स्त्रीत्वाचा आणि वडील-मुलाचा जाणीवशोध आहे. स्त्रीचा सृष्टिशोध तसेच इतरेजनांचा तिच्याविषयीचा शोध या कवितेत असून त्यास गतविस्मृतींचे पदर आहेत. तर वडील आणि मुलातील विस्कटलेल्या विसंवादात विभक्तपणाची जाणीव आहे. हरवलेल्या जगाचा आठवशोध म्हणून या कवितेत समुद्र, झाड, स्वप्नं आणि हिमालय शोधाला विविध परिमाणे प्राप्त झाली आहेत. आधुनिकतावादी, सामाजिक तर काही प्रमाणात भावकवितेची सरमिसळ गीतेश शिंदे यांच्या कविताविश्वात आहे.