-
The Fakir
आत्महत्येकडे कल असलेला एक हिप्पी आणि अजब विनोदबुद्धी असलेला एक फकीर, असा प्रवास जो तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकेल.... जिथं देव आणि गुरूवास करतात, त्या तुमच्या अंतर्मनाला अर्पण केलेला, 'फकीर' हा श्वास रोखायला लावणारा, आत्म्याच्या साहसी मुशाफिरीचं रेखाटन करणारा 'अक्षर' नजराणा आहे. जिवंत असण्याचा आनंद अनुभवा, सोपं पण आयुष्य बदलून टाकणारं, सर्वांबद्दल दयाभाव राखण्याचं तत्त्वज्ञान शिका आणि बदलाकडचं पहिलं पाऊल उचलून स्वत:ला बरं करा. ही आहे एक चित्तवेधक कहाणी. कर्म, दैवी कृती, मृत्यूनंतरचं आयुष्य, आत्म्याचा आत्म्याशी संपर्क, प्रार्थनेतली शक्ती, श्रद्धा आणि क्षमा, ऊर्जा आणि बरं करणं, चांगुलपणात देवाचा शोध घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत गुरूशी सुसंवाद साधून राहाणं, यासारखे गहन प्रश्न, ती सोप्या, समजेल, उमजेल अशा पद्धतीनं हाताळते. 'द फकीर' फक्त तुम्हाला कसं जगायचं एवढंच शिकवत नाही... पण मरण कसं स्वीकारायचं तेही शिकवतं.
-
Girls Of Riyadh
त्या गुप्त जगातील एक दृश्य : चार तरुण मुलींचा प्रेम, अभिलाषा आणि इस्लामिक रूढी ह्यांच्या अरुंद खाडीतून केलेला तो प्रवास. प्रत्येक आठवड्यात शुक्रवारची प्रार्थना संपल्यावर एक ई-मेल आॅनलाईन नेटवर्कवरील सदस्यांत प्रसारित केली जाते. रियाधमधील विद्यापीठात शिक्षण घेणा-या गाम्राह, मिचौल्ली, सादीम आणि लामीस या चार उच्चस्तरीय विद्यार्थिनींच्या आयुष्यातील विदारक वास्तव वर्षभराच्या कालावधीत समोर आले. एकीकडे उच्च स्तरात आणि दुसरीकडे रूढीग्रस्तेत अडकलेल्या या मुली आहेत. या पेचातून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या नकळत केलेले डेटिंग, अनुभवलेले शहरी जगणे, सेक्स आणि यातून त्यांच्या आयुष्याची झालेली पडझड आपल्यासमोर येते. ह्या चार तरुणी अगणित सामाजिक, प्रेमविषयक, व्यावसायिक आणि लैंगिक दु:खांना तोंड देतात. एकविसाव्या शतकातील सुशिक्षित तरुणीला अजूनही जुन्या पद्धतीने जगणा-या समाजात वाढत असताना, न संपणा-या सांस्कृतिक मतभेदांना सामोरे जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या तरुण सौदी स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या जीवनातून प्रकटलेली एक दुर्मीळ आणि अविस्मरणीय जाणीव म्हणजे 'गर्ल्स आॅफ रियाध' ! त्यांच्या आश्चर्यचकित करणा-या गोष्टी ह्या आपल्याहून कितीतरी वेगळ्या असणा-या संस्कृतीच्या समाजात प्रकट होत आहेत, ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.
-
Cinemayache Jadugar
सिनेमाच्या मायेची जादू पसरण्यास सुरू होऊन उणीपुरी शंभर वर्ष झाली आहेत. या कालावधीत असंख्य जादूगारांनी-दिग्दर्शकांनी आपल्या किमयेने सिनेमाची ही सृष्टी समृद्ध केली. तिला अभिजात कलेचे रूप दिले. या दिग्दर्शकांपैकी निवडक अशा पन्नास दिग्गजांच्या कार्यावर, कर्तृत्वावर, स्वप्नांवर आणि स्वप्नपूर्तीवर; तसेच कल्पनांवर आणि कृतींवर प्रकाशझोत टाकणारी `सिनेमाटोग्राफ’ ही लेखमाला विजय पाडळकर यांनी `लोकसत्ता’मधून लिहिली. एका साक्षेपी अभ्यासकाने व अभिजात रसिकाने घेतलेला सिनेमायेचा हा लालित्यपूर्ण वेध जाणकारांना व सामान्य वाचकांनाही खूप आवडला, त्या लेखमालेचे हे ग्रंथरूप. `भारतातील प्रत्येक भाषेत एक विजय पाडळकर निर्माण व्हावा,’ असे ज्यांच्याबद्दल गुलजारांनी लिहिले आहे त्या पाडळकरांचे हे नवे मराठी चित्रपटसमीक्षेला समृद्ध करणारे पुस्तक…
-
Vishvalli
सगळेजण त्याला त्वेषाने मारू लागले. त्याला फरफटत, मारतच सगळे वाड्याकडे आले आणि पायरीवर टाकून निघून गेले. शुद्धीवर आल्यावर "पाणी पाणी" करत दिगूनं प्राण सोडला. मरताना त्याच्या मनात एकच भावना थैमान घालत होती. सूड ! सूड ! गावाचा सूड ! इतकी वर्ष मला तुम्ही एकटं ठेवलंत, तळमळत ठेवलंत. आता मला रक्त हवंय. मी माझी सोय केलीय. कायमची. डॉक्टरचा भयानक चेहरा आणि ओठांबाहेर येणारे तीक्ष्ण सुळे ती बघतच राहिली.
-
Dhage Aadave Ubhe
ज्या ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात, त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो; आणि त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. मी एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपलो गेलो असतो, तर? किंवा कामाठीपुर्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो, तर? या समूहांमध्ये जन्मणार्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! या थरात जन्मलेली हुशार, हुन्नरी मुलं जागच्या जागी जिरून जात असतील, बघता-बघता यंत्रमागावर हात किंवा पाय हलवणारे ते त्या यंत्राचा एक भाग बनून जात असतील. एखाद्याच्या निर्मितिक्षमतेचा, जगण्याच्या ऊर्मीचा नाश करणं हे मला त्या माणसाच्या खुनापेक्षाही भयंकर वाटतं.
-
Karyarat
अनिल अवचट यांचे `कार्यरत’ हे सोळावे पुस्तक. कार्यहीनता, भ्रष्टाचार, अविवेकी राजकारण यांनी काळोखलेल्या वातावरणात हे काही आशेचे किरण. या पुस्तकातील माणसे समाजातल्या प्रश्र्नांवर सर्वस्व झोकून देऊन काम करणारी. प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणारी.आदिवासींमधे काम करणारी सुरेखा दळवी, विंचूदंशावर इलाज शोधणारे बावस्कर, तुंगभद्रा नदीच्या पर्यावरणाच्या नाशाविरुद्ध लढणारे हिरेमठ, दुष्काळी भागात प्रतिसृष्टी निर्माण करणारे अरुण देशपांडे आणि काका चव्हाण, आणि गडचिरोलीतील आदिवासींमधल्या आरोग्याच्या प्रश्र्नांवर उत्तर शोधणारे अभय व राणी बंग, यांच्या कामाकडे, चारित्र्याकडे पाहिलं तर जगायची नवी उभारी येते. सर्वच काही संपलं नाही, याची ग्वाही, या पुस्तकातली माणसं पानापानावर, वाक्यावाक्यात देत राहतात.
-
Vanat Janat
जवळच्या टेकडी परिसरात फिरायला जायचो, तेव्हा तिथल्या झाडांशी, वेलींशी, पायवाटेशी मी मनातल्या मनात बोलू लागलो आणि त्याची गंमत वाटू लागली. या झाडांच्या, वेलींच्या, दगडांच्या, कोळीकीटकांच्या दृष्टीने जग पाहू लागलो. मी त्यांना शब्द दिले, संवाद दिले, ते माझ्याशी बोलू लागले. खरं तर मीच माझ्याशी बोलू लागलो होतो. लहान मुलांमध्ये जशी `फॅंटसी’ असते, तिने उतारवयात माझ्यात प्रवेश केला आणि मीही परत लहान झालो. या गोष्टींनी मला खूप खूप दिलंय. बालपण तर दिलंच. माणसांच्या सुखदुःखांकडे आजवर पाहत होतो आता त्या पलीकडच्या सृष्टीला काय म्हणायचंय तो आवाज ऐकू लागलो आणि भराभरा लिहीत गेलो. `सृष्टीत… गोष्टीत’ या पहिल्या गोष्टींना छान प्रतिसाद मिळाला. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या या पन्नास गोष्टी. त्याही तुमच्यापुढे ठेवीत आहे.