-
Tisra Shwas (तिसरा श्वास)
हिंदी कादंबरीकार कामतानाथ यांच्या कथा जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत. त्या सामाजिक असमानतेच्या प्रश्नांशी दोन हात करतात. ते स्त्री, दलित, शेतकरी, शेतमजुर, अल्पसंख्या या सगळ्यांचे प्रश्न ऐरणीवर घेतात. पात्रांची एवढी विविधता एखादा कथाकाराच्या कथेमध्ये क्वचितच आढळते. स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाची स्वप्ने, संघर्ष, मोहभाग, संशय, संकल्प आणि परिवर्तनन यांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पडलेले आपणास दिसते.
-
Lokakatha 78 Aani Tyavishayee Sarvakahi (लोककथा ७८
‘लोककथा’७८’ हे चाळीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले नाटक त्यातील भेदक सामाजिक आशय आणि रंगमंचीय सादरीकरणातील वेगळेपणा यांमुळे बरेच चर्चेत आले. गेल्या चाळीस वर्षांत स्वतः लेखक रत्नाकर मतकरी, मराठीतले अनेक मोठे समीक्षक, पत्रकार, या नाटकात काम केलेले कलाकार अशा अनेकांनी या नाटकाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नाटकातून व्यक्त होणाऱ्या आशयामुळे आजही महत्त्वाच्या असलेल्या या नाटकावरील प्रतिक्रिया या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्याबरोबरच मूळ नाटकाची रत्नाकर मतकरींनी नव्याने वाढवलेली संहिताही यात समाविष्ट केली आहे.
-
Aswasthaparv-Vedh Jagatik Ghadamodincha (अस्वस्थपर
एका बाजूला प्रचंड कुतूहल वाटावं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड अस्वस्थता असावी अशा काळातील जागतिक घडामोडींचा वेध प्रस्तुत लेखन घेतं . प्रगतीसाठीची धोरणं राबवताना जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग सर्वांना व्हावंच लागेल ; ही वाटचाल उदारमतवादी लोकशाही बळकट करणारी ठरेल ; लोक जगाच्या व्यवहारात इतके सामावले जातील , की ते जागतिक नागरिक म्हणवणं पसंत करतील ; त्यातून राष्ट्र - राज्य संकल्पनेतील सीमारेषाही धूसर व्हायला लागतील ; या आदर्शवादाला ,त्यातील गृहीतकांच्या फुग्याला तीस वर्षांच्या वाटचालीनंतर टाचणी लावणारं वळण जागतिक व्यवहारात आलं आहे. हे का आणि कसं घडत गेलं ,या प्रश्नाचा शोध हे पुस्तक घेतं . वंश ,धर्म अशा बाबींवर आधारलेला बहुसंख्यांकवाद जगाच्या अनेक भागांत बोकाळतो आहे. अल्गोरिदम ,आर्टिफिशयल इंटेलिजन्स ,रोबोटिक्स ,नॅनो टेक्नॉलॉजी आणि डेटा सायन्स ही वर्चस्वाच्या लढाईची हत्यारं बनताहेत . यातून निर्माण होणारे नवे ताण ,नवी स्पर्धा ,जगाच्या अस्वस्थतेत भर टाकते आहे. या पार्श्वभूमीवर 'क्वाड 'सारखा गट बळकट होतो आहे. त्यातून इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्र हे प्रमुख स्पर्धा होण्याची चिन्हं दिसताहेत .
-
Putting Women First-Grameen Bhagateel Striya Ani T
जेव्हा जागतिकीकरण आणि मुक्त आर्थिक व्यवहाराचे वारे भारतीय उपखंडातून वाहू लागले, तेव्हा ग्रामीण कुटुंबे त्यामुळे होणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि व्यक्तिगत परिणामांसाठी तयार नसल्याने भरडली जाऊ लागली. विोषतः शिक्षण, माहिती, साधनसंपत्ती या क्षेत्रांत फार मोठे फरक जाणवू लागले. खाण्यापिण्याच्या सवयी, पोशाखाची पद्धत, माणसांचं दिसणं, वागणं या सगळ्यात बदल झाल्यामुळे जीवनपद्धतीच बदलली आणि या सगळ्याचा परिणाम माणसामाणसांतली नाती, आरोग्य आणि आयुष्यावर होऊ लागला. राणी बंग यांच्यासारखे डॉक्टर या लोकांच्या जवळून सान्निध्यात असतात आणि त्यांच्याकडून होईल तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करून या समाजाभोवती झालेली समस्यांची कोंडी फोडून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. या समस्या म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे रोग, नको असलेले गर्भ, दारूचं व्यसन, तीव्र निराशा, सैल होत चाललेले कौटुंबिक आणि सामाजिक बंध वगैरे वगैरे. हे पुस्तक आपल्याला ग्रामीण स्त्रीपुरुषांच्या कहाण्या सांगतं. हे स्त्रीपुरुष इतक्या वर्षांत बंगबार्इंच्या दवाखान्यात आलेले. त्यांनी त्यांचे प्रश्न कसे सोडवले, त्यांचे आपापसांतले नातेसंबंध कसे होते, त्यांवर कसा परिणाम झाला नि आजही होतो आहे हे आपल्याला यात वाचायला मिळतं. आणि या कहाण्या वाचत असताना एक सत्य उमगतं की, माणसांचा भूगोल, संस्कृती, वर्ण आणि वर्ग वेगवेगळे असले तरी बऱ्याच समस्या या वैश्विक असतात.
-
Rajani Te Rajiya (रजनी ते रजिया)
आत्मकथन लिहिणं ही लेखकाला एक प्रकारची शिक्षाच असते, स्थिरावलेलं आयुष्य ढवळून काढावं लागतं. हे जखमेवर मीठ चोळणंच असतं. सुखद आठवणींचं काही वाटत नाही, दु:खाची बेरीज-वजाबाकी करतांनी मात्र वेदनांचा आकडा पार होतो. ‘संसारसंन्यासी’ नवर्याबरोबर मी गेली कित्येक वर्षं राहते आहे. मनाचा खूप कोंडमारा होतो. पण त्यावर मात करत जिद्दीने मी माझा अस्तित्व आणि अस्मितेचा लढा लढले. वेदनांचं भांडवल नाही, पण संकटं आली तरी स्त्री आयुष्यात ठामपणे उभी राहू शकते, हे मला दाखवून द्यायचं आहे. त्यात कार्यकर्ती म्हणून माझं क्षेत्रही असंच, जे सहजासहजी कोणी स्वीकारत नाही. महिलांच्या लैंगिक अधिकारांबरोबरच सेक्सवर्कर, कैदी, किन्नर, समलिंगी यांच्या मानवाधिकारावर काम करतांनी जखमही माझीच नि उपचारही माझेच! हे सगळं आयुष्य कोणताही आडपडदा न ठेवता मी या पुस्तकात कथन केलं आहे.
-
The Gorakhpur Hospital Tragedy (द गोरखपूर हॉस्पिटल
१० ऑगस्ट २०१७... गोरखपूरच्या सरकारी इस्पितळातला द्रवरूप ऑसिजन संपला... पुढच्या दोन दिवसांत ६३ मुलं आणि १८ प्रौढ यांचा मृत्यू झाला... ऑसिजन मिळवण्यासाठी डॉ. कफील खान यांनी एकहाती संघर्ष केला... ऑसिजन व्यवहारातली भ्रष्टाचाराची साखळी उघडी पडली... लोकांच्या लेखी कफील हिरो ठरले... आणि सत्तेच्या लेखी शत्रू... कफील यांनाच चोर ठरवलं गेलं... तुरुंगात टाकण्यात आलं... कुटुंबाची ससेहोलपट झाली... पण कफील हरले नाहीत. ते लढत राहिले. आजही लढताहेत... एक उन्मत्त सत्ता आणि कर्तव्यनिष्ठ डॉटर यांच्या झुंजीची ही कहाणी. हृदय पिळवटून टाकणारी. तितकीच लढणार्यांना बळ देणारी... द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी डॉ. कफील खान । अनुवाद : राजेंद्र साठे
-
Vidyechya Pranganaat (विद्येच्या प्रांगणात)
एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याबरोबर या बदलामुळे सामाजिक जीवनाला मात्र तडे गेले आहेत. या नव्या आव्हानांनी जागतिक व्यवस्थेचा ढाचा बदलला आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर डॉ. माणिकराव साळुंखे यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून शिक्षणव्यवस्थेचे वेगळे जग प्रस्तुत केले आहे. डॉ. साळुंखे यांनी पाच विद्यापीठांचे कुलगुरू पद भूषविले आहे. राज्याचे, केंद्राचे व स्वायत्त विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शिवाजी विद्यापीठात व राज्यस्थान केंद्रीय विद्यापीठात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांनी विविध विद्यापीठांमध्ये केलेल्या प्रयोगाचे व उभारलेल्या नवीन प्रकल्पाचे वर्णन या आत्मचरित्रात आहे. तसेच डॉ. साळुंखे यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाचे व तेथील शैक्षणिक प्रगतीचे सखोल वर्णन आहे. कधी काळी शिक्षणक्षेत्र हे स्वतंत्र व आत्मनिर्भर होते, तसे ते आता राहिले नाही. अलीकडे विद्यापीठे राजकीय हस्तक्षेपाने गढुळली आहेत. या संदर्भात डॉ. साळुंखे यांनी शिक्षणाबद्दल मांडलेले विचार महत्त्वाचे आहेत. एका उत्तम संशोधक, तत्त्वनिष्ठ प्रशासक व शिक्षणचिंतकाचे हे आत्मचरित्र नव्या पिढीला व शिक्षण जगताला निश्चितच दिशादर्शक ठरेल. पृथ्वीराज चव्हाण, (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
-
Kajava (काजवा)
अपवादाच्या जगण्याची, लढण्याची, जखमी होण्याची, जखमांना फुलांचं रूप देण्याची एक चित्तरकथा म्हणजे हे आत्मकथन आहे. ते वास्तवाशी बेइमानी करत नाही, वास्तव सजवण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जात नाही, दु:खाची सजावट करत नाही, विनाकारण आपल्या दुःखांना याचकाचं स्वरूपही देत नाही; तर जीवन एक संघर्ष आहे, अंधार भेदता येतो. उजेडाचं आभाळ तयार करता येतं, स्वयंप्रकाशित बनता येतं, व्यवस्थेनं तयार केलेली वादळं पचवता येतात, हे मोठ्या आत्मविश्वासानं आणि निखळ स्वानुभवातून ते सांगत राहतात. आपल्या वाट्याला येणाऱ्या व्यथा-वेदनांचं ते नुसतंच वर्णन करत राहत नाहीत किंवा दुःखाच्या नावानं काही मागत राहत नाहीत, तर वास्तव बदलता येतं, त्यासाठी लढता येतं, लढायांमध्ये विजयी होता येतं आणि अंधार भेदता येतो हेही या आत्मकथनातून सांगण्याचा ते प्रयत्न करतात. वयाच्या साठीजवळ पोहोचताना त्यांचं आयुष्य आटपाट नगरातील एका सुफल कहाणीप्रमाणं झालं असलं तरी, या बिंदूवर ते कसे पोहोचले, हे सर्वांत अधिक महत्त्वाचं आहे.
-
Laplel London (लपलेलं लंडन)
या पुस्तकात लंडननिवासी लेखक अरिंवद रे लंडनचा एक वेगळाच, लपलेला कोपरा आपल्याला दाखवतात. इथं आहेत भारत, पाकिस्तान, पोलंड, ग्रीस, इस्टोनिया, इटली, बल्गेरिया, आफ्रिका अशा देशांतून लंडनमध्ये स्थलांतरित झालेली माणसं. मुकुंद दीक्षित या समंजस, सहृदयी इंग्रजी शिक्षकाच्या वर्गात ती माणसं दाखल होतात आणि आपल्यासमोर लंडन जीवनशैलीचे एकेक अनोखे पदर उलगडू लागतात. रक्तात भिनलेले स्वत:च्या मातीतले संस्कार विसरू शकतात का ही माणसं? ‘वेळ आणि पैसा' ही ब्रिटिश संस्कृती कितपत आत्मसात करू शकतात ही माणसं? लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठी राबराब राबणं.... पासपोर्ट्स जाळणं.... कागदी लग्न जुळवणं.... काय काय वाटा पळवाटा शोधतात ही माणसं ! लंडनमधील खाजगी इंग्रजी शाळा, त्यांचे लबाड संस्थाचालक ! शेअरींग हाऊसमध्ये दाटीवाटीनं राहणारे टेनंट्स, त्यांच्या व्यथा आणि कथा ! अरिंवद रे ही सारी पात्रं, प्रसंग इतक्या चित्रमय, संवेदनशील, खेळकर शैलीत मांडतात की, हे पुस्तक उघडल्यावर पूर्ण केल्याशिवाय मिटणं अशक्य ! अ-निवासी भारतीयाची आपल्याला अंतर्मुख करणारी कहाणी.