-
Shashwat (शाश्वत)
चराचरातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये एक कथा आहे. आणि ती कथा कुठेतरी आपल्या भावनांना स्पर्श करणारी आहे. संजीव कोटकरांच्या शाश्वत पुस्तकातील कथा या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, कुठेतरी ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या वाटतात आणि म्हणूनच त्या हृदयात घर करतात. काही कथा आपल्याला विचारात टाकतात तर काही जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतात. अशा विविध कथांमधून मनाची आंदोलने उलगडून दाखवणारा लघुकथासंग्रह
-
Sahava Mahabhut Aani Mi (सहावं महाभूत आणि मी!)
सहावं महाभूत आणि मी!' ही गोष्ट आहे, आजच्या काळातल्या सहाव्या महाभूताची - कॉम्प्यूटरची - तशीच कॉम्प्यूटरने वेढून टाकलेल्या माणसांच्या जमातीची आणि ह्या प्रवासाचा साथीदार तसाच साक्षीदार असलेल्या सतीश जोशीची ! भारतीय कॉम्प्यूटर उद्योगाचा पाया ज्यांनी घातला अशी एक नामांकित कंपनी, पटणी कॉम्प्यूटर सिस्टिम्स. अत्यंत महत्त्वाच्या, जबाबदारीच्या पदांवरून सतीशने पटणीसाठी जगभरातले नवनवीन प्रोजेक्ट्स् केले. त्यांचा प्रत्ययकारी आढावा ह्या पुस्तकात घेतला आहे, शोभा बोंद्रे आणि सतीश जोशी ह्या लेखकद्वयीने. सतीशच्या अनुभवविश्वाचं, एक अद्भुत आणि रोमांचकारी असं शब्दचित्र इथे साकारलं आहे. ह्यामधून कॉम्प्यूटर आणि माणूस ह्या नव्या नात्यासंबंधी आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल, अनेक नवीन संकल्पनांचा परिचय होईल आणि कदाचित काही जुन्या संकल्पना मोडीत काढाव्या लागतील. 'भारत म्हणजे आय. टी. तज्ज्ञांचा देश' ही नवी व्याख्या जगाने मान्य केली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधला हा महत्त्वाचा 'भारतीय टप्पा' म्हणजे जागतिक पातळीवरच्या बिझनेसमधील एक महत्त्वाची उलथापालथ ! 'सहावं महाभूत आणि मी!' ही ह्या उलथापालथीचीही गोष्ट आहे.
-
Chintanika (चिंतनिका)*
हेन्री डेव्हिड थोरो या चिंतनशील प्रवृत्तीच्या, व्यासंगी लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही पैलूंचे दर्शन या पुस्तकातून घडते ते बहुरंगी आहे आणि तरीही ते व्यक्तित्व आपल्या मूळ प्रेरणांशी प्रामाणिक राहून आविष्कृत होते असे दिसते. त्याच्या विचारांचा वाचकांवर होणारा परिणाम, पडणारा प्रभाव दूरगामी आहे. त्याची कितीतरी विधाने आजही कालसुसंगत वाटतात कारण ती मानवी जीवनाच्या मूलाधाराशी व निसर्गाशी सुसंगत आहेत. जगभरच्या नेत्यांवर प्रभाव पाडणाऱ्या, 'सविनय कायदेभंग' या निबंधासह इतर निबंधांचा व काही पत्रांचा अनुवाद या पुस्तकातून वाचावयास मिळतो. मीना वैशंपायन
-
Rangnirang (रंगनिरंग)
रंगनिरंग' प्रेमानंद गज्वी यांची जीवनकथा - एक अनोखं घटित आहे. खेड्यातील शेतकरी कुटुंबात वाडेदार संस्कृतीत जन्मलेल्या प्रेमानंद गज्वी यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या त्या काळाची, गज्वींच्या एकूण जडणघडणीची, विचारांची, साहित्यिक प्रवासाची, विकासाची, रंगभूमीवरच्या कर्तृत्वाची ही कथा. त्यांनी आपल्या वाटचालीत जे अनुभवलं ते कुठलीही लपवाछपवी न करता प्रांजळपणे लिहिलं आहे. लेखक लिहितो म्हणजे काय करतो? जग समजून घेताना कुठल्या-कुठल्या अनुभवाला सामोरे जावं लागतं हे समजून घ्यायचं तर 'रंगनिरंग' अनुभवणं must! कविता, कथा, कादंबरी, नाटक हे वाड्मयाचे सारेच घाट (Form) इथं एकत्रित अनुभवणं हाही एक विलक्षण क्षण होय!
-
Aathvanincha Payrav (आठवणींचा पायरव)
कुठल्याही क्षेत्रातील थोर व्यक्तीशी प्रत्यक्ष परिचय झाला, त्याचा सहवास लाभला की त्याच्या थोरवीची त्वचा खरवडली जाते, त्याखाली दडलेले गुण-दोष ठळकपणे दिसू लागतात. त्यामुळेच ज्यांच्या कर्तृत्वाने, विद्वत्तेने, प्रतिभेने आपण स्तिमित होतो, त्यांच्या फार जवळ जाऊ नये, असे म्हणतात. मात्र या वास्तवाची जाणीव ठेवून आणि ते स्वीकारून जर अशा प्रज्ञावंतांशी जवळीक केली तर सहज मानवी वृत्तीचे विविध पैलू लख्खपणे दिसतात. व्यक्तिगत रागा-लोभाच्या भावनापल्याड जाऊन त्यांच्या वागण्या-बोलण्याचा ताळेबंद मांडता येतो. त्यातून त्या माणसाचे मोठेपण कमी होत नाही अथवा त्याला न्यूनताही येत नाही. अंजली कीर्तने यांनी त्यांना गुरुस्थानी असलेल्या काही श्रेष्ठ व्यक्ती आणि पुढे परिचय होऊन ज्यांच्याशी घट्ट संबंध तयार झाले अशा काही प्रसिद्ध व्यक्तींविषयी या पुस्तकात याच भूमिकेतून लिहिलेले आहे. त्यामुळे या लेखांना 'स्वभावचित्रे' म्हणावे लागेल. या व्यक्तिंविषयी वाचकांना असलेल्या आदराला कुठेही धक्का बसणार नाही आणि तरीही त्यांच्या स्वभावातील सहज मानवी उणिवा दिसतील असे हे अत्यंत आत्मीयतेने केलेले लिखाण आहे. या पुस्तकातील लेखात 'डोह'विषयी 'वालं'नी 'या गद्याला डोळे आहेत, कान आहेत, संवेदना टिपणारी त्वचा आहे, स्मृती आहे..' असे म्हटल्याचे लेखिका सांगते. 'डोह' हे तर निव्वळ ललित लेखन आहे, डोळे, कान, स्मृती आणि मन यांचा उपयोग खरे तर आपल्याला प्रिय असलेल्यांविषयी लिहिताना अधिक जाणतेपणी करता येतो, तसा तो या पुस्तकातील सर्वच लेखांमध्ये केलेला असल्याचे दिसते. माहीत असलेल्या व्यक्ती 'अधिक माहीत' होण्यासाठी आणि कळलेल्या व्यक्ती 'आकळण्यासाठी' यातील लेख आपल्याला सहजपणे सोबत घेऊन जातात. - श्रीकांत बोजेवार
-
Tirpagadya Katha (तिरपागड्या कथा)
निखळ निर्मळ वृत्तीच्या विनोदाचं निरोगी असं जे लक्षण असतं - ज्यात आदर्श म्हणून चि. वि. जोशी यांचं उदाहरण घेतलं जातं, त्या जातीचा टाकसाळे यांचा विनोद आहे. जयवंत दळवी आणि श्री. ना. पेंडसे यांनी त्यांना तसं लेखी सर्टिफिकेटही दिलं आहे.
-
Vyatha Katha (व्यथा कथा)
संभ्रमाचे सांगाती' या पुस्तकाच्या निमित्तानं डॉ. नंदू मुलमुले यांची 'लेखक' म्हणून ओळख झाली आणि मी त्यांच्या लिखाणाच्या अक्षरशः प्रेमात पडलो. एकाच वेळी बुद्धीलाही पटतंय आणि हृदयालाही भिडतंय, विचारप्रवृत्तही करतंय आणि अंतर्मुखही करतंय असा तो क्वचितच येणारा विलक्षण अनुभव. या भारावण्यातूनच पुढे 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा जन्म झाला. 'व्यथा-कथा' या त्यांच्या दुसऱ्या संग्रहातल्या कथाही तितक्याच कसदार व्हाव्यात ही गोष्ट त्यांच्या अनुभवाची समृद्धता आणि प्रतिभेची संपन्नता दर्शवते. शास्त्रीय बैठकीचा कणा असलेल्या या लेखनाला कथेचा आत्मा आणि 'व्यक्तिचित्रणाचा' चं शरीर आहे. या कथा 'माणूसकेंद्री' आहेत. आजारामागच्या लोभस माणसाचं ते त्याच्या भोवतालासकट दर्शन घडवतात. 'आजाराची लक्षणं' आणि 'स्वभावाची वैशिष्ट्यं' यांची थक्क करणारी सरमिसळ ते आपल्यासमोर ठेवतात. 'एकाकीपणा', 'भयातिरेक', ‘असुरक्षितता’,‘विस्मृती', 'संशयग्रस्तता', 'छिन्नमानस', अशा मानवी व्यथा मांडतानाही ते वाचकाला 'व्यथित' करीत नाहीत तर उलट जागृतीची, साक्षात्काराची अनुभूती देतात. लेखक मानसतज्ज्ञ असला तरी 'तज्ज्ञपणा'च्या ओझ्यापासून या कथा मुक्त आहेत. म्हणूनच ते मानसिक आजारावरचं शुष्क लेखन न होता मानवी भावभावनांचा तो रसरशीत ऐवज होतो. डॉक्टरांच्या लेखनात लालित्य आहे, चिंतनाचं सार आहे, शैलीत सामाजिक उपहास टिपणारा मिश्कीलपणा आहे, भाषेत लवचिकता आणि बहुभाषिक सजगता आहे, विषयात वैविध्य आहे. मांडणीत उत्कंठा, दृष्टीत नावीन्य आहे आणि या सगळ्यांतून खळाळत वाहणारा अनुभव आणि ज्ञानाचा अखंड स्रोत आहे. - प्रशांत दळवी ज्येष्ठ नाटककार
-
Ekla Chalo Re (एकला चलो रे)
ही कथा एका निराशेच्या कड्यावर पोहोचलेल्या, दु:खाची, वेदनेची, कौटुंबिक वाताहत झालेल्या व्यक्तीच्या जगण्याच्या संघर्षाची आहे. वाचताना मन कुंठित होते. व्याकूळ होते. परंतु संजीव सबनीस यांची विजीगीषा अशा उत्तुंग श्रेणीची आहे की त्यांना दया, करुणा, अनुकंपा यांची मातब्बरी वाटत नाही. त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास व पराकोटीची सकारात्मकता यामुळे त्यांना भोवतालच्या जगाकडून अनुकंपेची गरज वाटत नाही. अपंगावस्थेतील हॉस्पिटल, घऱ, विकलांग आश्रम यांतील दैनंदिन दिनक्रमाचे, तेथे वेळोवेळी भेटलेल्या डॉक्टरांपासून साहाय्यकांपर्यंतचे त्यांचे अनुभव वाचताना अंगावर काटा येतो.
-
Click (क्लिक)
ज्यावेळेस क्लिक आवाजासरशी कॅमेऱ्याचे शटर काही क्षण उघडून पुन्हा बंद होते त्यावेळी एक आल्हाददायक आठवण फोटो स्वरुपामध्ये साठवली जाते. असे हे फोटो आपण पुन्हा पाहतो तेव्हा ते आपण नुसते पाहत नाही तर ते पुन्हा नव्याने जगतो. आपल्या मनाच्या अंत:पटलावर काही गोष्टी कायमस्वरूपी उमटलेल्या असतात ज्यांना आपण हवं तेव्हा स्मरणात आणू शकतो. मनाने क्लिक केलेले असेच काही आल्हाददायक, हवेहवेसे क्षण पुन्हा जिवंत करणाऱ्या कथांचा संग्रह क्लिक..
-
Shakuni (शकुनी)
महाभारतात अनेक खलनायक आहेत. धीवरराज यशराज, कंस, जयद्रथ, दुर्योधन पण या सर्वांना झाकोळून टाकणारा खलनायक म्हणजे शकुनी. गांधारीचा भाऊ. दुर्योधनाचा मामा - महाभारत घडले ते याच्यामुळेच. जनमानसात आज शकुनीची जी प्रतिमा आहे ती सर्वथ: टेलिव्हिजनवर सादर झालेल्या महाभारतावर बेतलेली आहे. क्रूर, खुनशी, लंगडा अशी. पण खरा शकुनी असा नव्हता. शकुनी गांधार देशाचा युवराज होता. मुरलेला राजकारणी होता. धुरंधर योद्धा होता. भारतीय युद्धात त्याने पांडवांचे अनेक सेनापती ठार केले होते. तो कौरवांचा रणनीतिकार होता. तो गूढविद्येत प्रवीण होता. शेवटच्या दिवशी त्याने दुर्योधनाला प्राण वाचवायचा सल्ला देऊन रणभूमीवरून बाहेर पाठवले. पण तो स्वत: शेवटपर्यंत प्राणपणाने झुंजला. त्याने वीरमरण स्वीकारले. कोणीही मूळचा खलनायक नसतो. काही कारणांमुळे तो खलनायक बनतो. मग शकुनी खलनायक कसा झाला ? त्यामागची कारणे काय होती ? या सर्वांचा शोध घेणारी, शकुनीचा राजकुमार ते खलनायक हा प्रवास दाखवणारी कादंबरी...
-
Satvasheel (सत्वशील)
मी सदैव हस्तिनापूर आणि कुरुवंशाच्या हिताचाच विचार करत आलो आहे. महाराज धृतराष्ट्र, आपले पुत्र जेवढे कुरुवंशीय आहेत, तेवढेच सम्राट पांडूचे पुत्रही कुरुवंशीय आहेत. महाराज, महर्षी व्यासांच्या भविष्यकथनाचे कदाचित आपल्याला विस्मरण झाले असावे. परंतु माझ्या ते स्पष्ट स्मरणात आहे. कुरुवंशाचा विनाश होऊ नये एवढ्यासाठीच मी आपले पुत्र आणि पांडुपुत्र यांचे सख्य व्हावे म्हणून सतत प्रयत्नशील राहिलो आहे. परंतु मी हस्तिनापूरद्रोही, कुरुवंशद्रोही आहे असे आपल्याला वाटत असेल तर मला महामंत्रीपदाचा त्याग करण्याची अनुमती द्यावी अथवा आपल्या पुत्राच्या इच्छेनुसार मला दंडित करावे." जीवनभर कौरवांकडून 'दासीपुत्र' म्हणून अवहेलना सहन करणाऱ्या विदुरांनी अलिप्ततेने, निर्भयतेने आणि नि:स्पृहतेने आपले कर्तव्य पार पाडले. वेळोवेळी न कचरता कुरुवंशाच्या आणि कुरूराज्याचा हिताचा परामर्श ते देत राहिले. अशा या थोर पुरुषाच्या दृष्टीतून महाभारताचा विस्तीर्ण पट उलगडणारी कादंबरी 'सत्त्वशील'.
-
Customs Night (कस्टम्स् नाईट)
बर्वे साहेबांनी एकंदरीतच सर्व प्रकरणाचा, मुळापासून गांभीर्याने विचार केला. त्यांना मनातून खात्री वाटत होती की समोरची तरुणी खरं बोलते आहे. नटराजन साहेबांचे सुद्धा आतापर्यंतचे रेकॉर्ड चांगले होते. पण वस्तुनिष्ठ पुराव्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं. रेवती चंद्रन ही तरुणी यात पुर्णपणे फसली गेली होती. विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहिती आणि हा आत्ता आलेला फोन... नक्कीच काहीतरी मोठं कारस्थान शिजत होतं. डाव-प्रतिडावु, सत्य-असत्य, हेरगिरी, अमली पदार्थांची तस्करी आणि तून आकार घेणारं देशव्यापी षड्यंत्र यांचा थरार अनुभवायला लावणारी कादंबरी
-
Lekhsangraha (लेखसंग्रह)
मराठी मनावर पिढ्यान् पिढ्या अधिराज्य गाजवणाऱ्या जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई आणि शिखरशिंगणापूरचा शंभूमहादेव. या दैवतांबरोबरच १७ व्या शतकाने महाराष्ट्राला आणखी एका शूरवीर, लोकोत्तर दैवताची नव्हे महामानवाची देणगी दिली. ते दैवत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतवर्षाला ज्यांनी नवीन अस्मिता दिली, स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला, स्वातंत्र्याचे नवे सूक्त मराठी जनतेला दिले; ते लोकोत्तर पुरुष, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास तर सर्वश्रुतच आहेच, परंतु त्यासोबतच महाराजांचे विचार कौशल्य, स्त्री दाक्षिण्य, जनतेचा राजा, काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा पुरोगामी राजा, भाषाशैली जपणारा, धोरणी राजा हे ही काही अनन्यसाधारण गुण आहेत. महाराजांच्या अनेक गुणविशेषांपैकी काही पैलूंची माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाशी संबंधित अशा विविध मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेमध्ये अरुण भंडारे यांनी महाराजांची ही वेगळी भूमिका मांडायचा प्रयत्न केला आहे.