-
Chhanda Majha Vegala (छंद माझे वेगळे )
जन्मभर नाना छन्दांमागं धांवत राहिलों. पायांखालीं काय तेंही पाहिलं नाहीं. आतां शेवटपर्यंत हे छन्द सुटतीलसं वाटत नाहीं. एक मात्र झालं. आयुष्य बहुशः कधींच उबगवाणं वाटल नाहीं. हा छन्द, तो छन्द, असं स्वतःचं कौतुक पुरवीत राहिलों. त्या छंदांसवें वाटचाल करीत असतांनाचे हे कांहीं मोहरलेले क्षण!
-
Mogara Phulala (मोगरा फुलला)
ही कहाणी आहे विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची! म्हणजे निवृत्तिनाथाची, ज्ञानदेवाची, सोपान-मुक्ताईची आणि प्रात:स्मरणीय अशा त्यांच्या माता-पितरांची! त्यांनी लौकिकात जे भोगले, ते केवळ शब्दातीत आणि जे अ-लौकीक अनुभविले, ते तर ‘शब्देंविण’ संवादिण्यासारखे! अशांची चरित्र-चित्रे रेखाटण्यास कलाकाराची कल्पनाशक्ती आणि शब्दसिद्धी ‘अमृतातेंहि पैजा’ जिंकणारी असावी लागते. ‘भावार्थदीपिके’च्या सौम्य-शांत, प्रसन्न-मनोहर, जीवनोद्धारक प्रकाशात तीन तपांहून अधिक काळ न्हाऊन निघालेल्या गो. नी. दाण्डेकरांच्या कविमनाने अरूपाचे रूप ‘दावण्या’चा ध्यास घेतला. आजच्या कळाहीन जगात ‘ज्ञानेश्वरी’ जगू पाहणार्या एका विलक्षण जीवाची भावनोत्कट कहाणी त्यांनी या आधीच आपल्या ‘मृण्मयी’ या कादंबरीत सांगितली आहे. पण ‘वसुधैव कुटुंबकम्’ झालेल्या त्या मूळ कुटुंबाची कथा-गाथा गायिल्याविना त्यांचे कविमन कृतार्थ होऊ शकत नव्हते. आता ‘मोगरा फुलला’ आहे, फुले वेचिता कळियांसी बहर आला आहे; कल्पित पात्रांच्या मुखांतून अकल्पिताची कथा सांगण्याचे नवल वर्तले आहे. ह्या नवलगंधाने दाण्डेकर प्राणा-मनांतून फुलून आले आहेत, आणि मराठी कादंबरी-सृष्टीला एक नवलभेट देऊन कृतकृत्य झाले आहेत.
-
Tuka Akashaevadha (तुका आकाशाएवढा)
तुका झालासे कळस तुकारामबावांचे जीवन, म्हणजे मन आणि जनलोक या उभयतांसवें रात्रंदिवस चालणारा समरप्रसंग. त्यांची अभंगगाथा हा या समराचा त्यांनीं काढलेला आलेखच आहे. त्या अभंगांचे सूत्र कुठेंही सुटू न देतां, त्यांतील अन्त:प्रवाहांची नोंद घेत चितारलेलें बावांचे जीवनचित्र म्हणजे ‘तुका आकाशाएवढा’. त्यांचे नि:स्पृहपण, त्यांचा नि:संग स्वभाव, श्रीहरिदर्शनांचे त्यांचे आर्त, त्यांची उत्कटता, विठ्ठलप्रेमाच्या प्रवाहामध्ये त्यांचे स्वत:स झोकून देणें, त्यांची सामाजिक जाणीव हें सारेंच इथें चितारलें गेलें आहे.
-
Mrunmayi (मृण्मयी)
'मृण्मयी' मात्र केवळ शब्दकृत्य नव्हतं. तो एक आध्यात्मिक अनुभव होता. अशा तशा कुणाचा नव्हता, तो मीरेचा होता. मीरा जीवनाच्या उत्तरार्धात द्वारकेला जाऊन राहिली. राजाची राणी असल्यामुळं उणं कुण्या गोष्टीचं नव्हतं. तिच्या इथं जो येई. त्याला इच्छाभोजन मिळे. एके दिवशी एक तरणादेखणा जोगी येऊन उभा राहिला. त्यानं इच्छाभोजनाचं ऐकून मीरेला तिचं शरीर मागितलं. इवलं हसून नी म्हणाली, ‘‘बस? हेच मागितलंत? ते माझं उरलंच आहे कुठं? ते तर हरिनिर्माल्य आहे. हे माझं सखेसहोदर भवताली बसले आहेत. त्यांच्या समक्ष घ्या ते. विस्कटून टाका. इथंच अंथरुण मागवत्ये!’’ मनूनंही जोश्याला हेच म्हटलं- ‘‘-- हा तर आहे श्रीहरीच्या रूपावरून उतरलेला उतारा. माझी सत्ता तिळमात्र राहिली नाही यावर. तेव्हा हे घ्या. विस्कटा. टाका फाडून-’’ ‘‘मात्र जे कराल, ते या माझ्यांच्या साक्षीनं होऊ द्या. या माडांच्या झावळ्या डोलत असोत. रातांब्याची पालवी हालत असो. त्या अवघ्यांच्या कुशीत या शिवनिर्माल्याचं हवं ते होऊ द्या.-’’ हे ज्याला कळलें, त्याला ‘मृण्मयी’ कळली. ती प्रयत्नपूर्वक समजून घ्यायचा विषय आहे. केवळ पानं उलटायचा ग्रंथ नव्हे.
-
Vadalatil Deepstambha (वादळांतील दीपस्तंभ)
जो भगवी वस्त्रें त्याला नाहीं, तरी पण जो जन्मभर संन्याशाचें जीवन जगला – समाजाच्या कल्याणासाठीं जो चंदनासारखा झिजत राहिला, अशा एका योद्धयाची ही जीवनगाथा— पू. सरसंघचालकांच्या शब्दांत सांगायचे, तर `संघनिर्मात्याविषयीं लिहिलेली ही कादंबरी हें मराठी ललित साहित्यामध्यें एक वैशिष्ट्यच म्हणावें लागेल.’
-
Nagin (नागीण)
पहिल्या झटक्यात नाग लोळवायला हवा आणि दुसऱ्या झटक्यात नागीण उलथी करायला हवी. जुळी आहेत. मारली, तर दोन्ही मारायला हवीत. नाहीतर एक जायचं नि एक राह्य़चं. घाव घालता येईल असा तो नागाला आवाक्यात घेत होता. हातातली शक्ती एकवटत होता. आणि एकाएकी नाग मागं मान फिरवून बघायला गेला. त्याच क्षणी घाव वर्मी बसला. नाग हातभर उडाला आणि उलटा फिरला. फडा काढून उभा राहिला; पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या अंगभर विलक्षण कळ आली. आपलं अंग गळून पडलंय वाटलं. धड फूत्कारताही येईना. बापूनं दुसरा टोला फडा गवसून लगावला. तो भुईसपाट झाला. जागच्या जागी लोळू लागला. आ वासलेलं तोंड माती घोळू लागलं. एव्हाना नागीण पसार झाली होती. चंद्रा पळत पळत आली. नाग गतप्राण होऊन पडला होता. तोंड मातीनं माखलं होतं. शरीर उलटपालटं झालं होतं. कसलं विपरीत धूड. क्षणापूर्वी तर नजर ठरत नव्हती. आगीचा लोळच होता.’ ..या ओळी आहेत मराठीतील ज्येष्ठ कथालेखक चारुता सागर यांच्या ‘नागीण’ कथासंग्रहातील ‘नागीण’ या कथेतील. यातून बापू आणि नागिणीचा विरह मनाला चटका लावून जातो. वाचकही प्राणी आणि मानवाचं दु:ख वेगळं समजत नाहीत. अशी विलक्षणता त्यांच्या सर्वच कथांतून वेगवेगळ्या घटना-प्रसंगांतून प्रकट झालेली आहे.
-
African Safari (आफ्रिकन सफारी)
जयंतरावांची तीष्ण नजर हे त्यांच्या लिखाणचं वैशिष्टय आहे. वाईल्ड लाईफ अभ्यासात निसर्ग आणि प्राण्यांचे बारकावे शब्द आणि आणि कॅमेरा-याने ते अचूकतेने टिपतात. याचे प्रत्यंतर म्हणजे 'आफ्रिकन सफारी' हे त्यांचं पहिलं पुस्तक आणि पुस्तकातील चित्रं आहेत.
-
Kailas - Manas ( कैलास - मानस)
कैलास पर्वत हे सृष्टीचे बीज मानले जाते. तसेच ही संकल्पभूमी आहे इथे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. विष्णू व शंकर यांचे संकल्प म्हणजे ब्रह्मदेवाचे सृजनत्व अशी हिंदूंची श्रद्धा आहे. कैलास हे शंकर आणि पार्वतीचे हिमालयातील निवास्थान, तर मानस यां सरोवराची निर्मिती केली. गौतम बुद्धांनी याच सरोवराच्या मध्यभागी बसून जगाला ज्ञान दिले. महानुभाव पंथीय त्यांचा हंस अवतार मानसमध्ये झाला. असं मानतात. तर जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभदेवाचे महानिर्वाण कैलासाहून झाले वेद, उपनिषदे, स्कंदपुराण, महाभारत आणि मेघदूत यां ग्रंथात कैलास-मानसाचा उल्लेख आहे. मराठी संतांचे मेरुमणी संत नामदेवांनी तेराव्या शतकात हिमालय ओलांडून कैलास - मानसाची यात्रा केली. तसा त्यांचा अभंग आहे . कैलास मानस हे श्रीकृष्ण, दत्त्तात्राय, जैन तीर्थकर आणि आदिशक्ती महालक्ष्मीची भूमी आहे . असे हे हिमालयातील निसर्गचक्राची बदलती सुंदर रूपे, अद्भूत सौंदर्याचा अनुभव आणि मानस काठाची निळ्याभोर आकाशाखालाची चिरशांतता अनुभवणे हे या प्रवासाचे वेगळेपण आहे
-
Mamacha Vada (मामाचा वाडा)
"मामाचा वाडा' या कथासंग्रहात एकूण चौदा कथा आहेत. या सर्व कथा बहुतेक ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त झालेल्या आहेत. या कथासंग्रहातील पेटलेला क्षण, अवर्षण, विहीर, पाषाण या कथा प्रामुख्याने दारिद्य्र व्यक्त करतात.