-
Navrasancha Jadugar Mohammad Rafi (नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी)
मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...
-
Gosht Reserve Bankechi (गोष्ट रिझर्व्ह बँकेची)
विद्याधर अनास्कर यांच्या 'गोष्ट रिझर्व्ह बँकेची' या पुस्तकातून बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील आकर्षक जगाचा शोध घ्या. हे सर्वसमावेशक मराठी पुस्तक आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकिंग संस्थेच्या रिझर्व्ह बँकेच्या रंजक कथेचा उलगडा करते. आकर्षक कथा आणि तपशीलवार अंतर्दृष्टीद्वारे, लेखक भारताच्या आर्थिक परिदृश्यात आरबीआयची उत्क्रांती, कार्ये आणि महत्त्व यांचा शोध घेतात. हे पुस्तक वाचकांना चलनविषयक धोरणे, बँकिंग नियम आणि आर्थिक स्थिरता राखण्यात रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची भूमिका याबद्दल सखोल समज देते. तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी असाल, बँकिंग व्यावसायिक असाल किंवा भारताच्या वित्तीय व्यवस्थेबद्दल उत्सुक असाल, हे पुस्तक सुलभ मराठी भाषेच्या स्वरूपात मौल्यवान ज्ञान प्रदान करते.
-
Patra Ani Maitra (पत्र आणि मैत्र)
गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था ‘राजहंस प्रकाशन’. गेली चाळीस वर्षं ‘राजहंस’चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. अशा दिलीप माजगावकरांचा विविध नामवंतांशी ‘या ह्रदयीचे त्या ह्रदयी’ घातले असा चिंतनशील, भावगर्भ पत्रसंवाद : ‘सप्रेम नमस्कार’. ‘राजहंस’च्या वाटचालीचं विस्तृत सिंहावलोकन करणारी आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रपटाचा गेल्या पाऊण शतकाचा मागोवा घेणारी दिलीप माजगावकरांची प्रदीर्घ मुलाखत : ‘प्रवास श्रेयसाकडे’. ‘दिगमा’ या चतुरस्र अन् लोभस व्यक्तिमत्त्वाला न्याहाळणारे त्यांच्या सुह्रदांचे लेख : ‘असे दिसले दिगमा’. या सा-याचा अंतर्भाव असलेलं – महाराष्ट्राच्या साहित्यिक अन् सांस्कृतिक संचिताच्या इतिहासाचा जणू तुकडा वाटणारं – पत्र आणि मैत्र
-
Skalpel Te Skopee Te Robo (स्काल्पेल ते स्कोपी ते रोबो)
ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्त्र कार्याची . असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, ‘पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.
-
Ek Ulat Ek Sulat Bhag 2 (एक उलट एक सुलट भाग २)
हे एका शहाण्या मुलीचं मर्मस्पर्शी लिखाण आहे. तिच्यासाठी तिचं लेखन ही एक शोधाची वाट आहे. तिच्यामध्ये एक अतिशय उत्कट अशी शिकणारी मुलगी आहे. ती तिच्या लिखाणामधून स्वत:ला वाढवायला बघते. इतकी वाढण्याची धडपड मला फार कमी माणसांमध्ये दिसते. तिच्यात सतत एक ऊर्मी आहे, सतत एक उत्साह आहे. मोठ्ठा हात पसरून एखाद्या मुलीनी यावं ना, ‘हे सगळं मला हवंय!’ असं म्हणत, तशी मला अमृता तिच्या लिखाणातून दिसते. एकूणच जीवन समजून घेण्याची या मुलीला फार असोशी आहे. शिवाय विचारपूर्वक जगण्याचं भान आहे आणि अशा जातीच्या माणसांना कायम अतृप्त, अस्वस्थ राहण्याचा एक शाप किंवा वर असतो. तोही तिला मिळालेला आहे, असं मला वाटतं. तिच्याभोवती घरीदारी नाटक, सिनेमा, चित्रं, संगीत, गाणं, नाचणं या सगळ्यांनी झणकारणारं वातावरण आहे आणि या झणकारणार्या वातावरणामध्ये ती स्वत:चा आवाज लावू पाहतीये. अतिशय प्रामाणिक आणि उत्कट अशा मुलीचा तो आवाज आहे आणि अमृता, तुझा आवाज आम्हाला छान ऐकू येतोय. डॉ. अरुणा ढेरे
-
Manik Moti Manik Varma Ani Parivar (माणिक मोती माणिक वर्मा आणि परिवार)
माणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला. माणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि उर्दूचे ख्यातकीर्त शायर. दोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते सुप्रसिद्ध अभिनेत्री, तर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका. चौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट. संपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये लाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारी अनमोल रत्ने. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार्या स्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट -
-
Lokshahi Aani Hukumshahi (लोकशाही आणि हुकूमशाही)
आदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन करणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते. अनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची आठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व समतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश नसतो. ते कधीही दुसर्यााच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ हा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार्यास विचारांचा अवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात चपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात. लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते विचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार करणार्यांेना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते. न्या. अभय ओक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सशक्त लोकशाहीसाठी अत्यावश्यक असलेले विचारमंथन लोकशाही आणि हुकुमशाही
-
Chandrakant Kulkarni Sadar Karit Ahe (चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे)
कवीनं असावं अल्पाक्षरी,आणि नाटककारानं मितभाषी.अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद.ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनीटाकावा अवकाश भारून.प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन.समीक्षकांनी करावं नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक.पण मग,...दिग्दर्शकानं काय करावं? आरंभापासून अंतापर्यंत, प्रत्येक क्षण उजळून टाकण्याचं कसब शिकवावं.मंचावरील आणि मंचामागील प्रत्येकाचा मित्र, तत्त्वज्ञआणि दिशादर्शक व्हावं.हे का आणि कसं करावं?सांगत आहेत, मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते- चंद्रकांत कुलकर्णी.
-
Shah Ani Katshah (शह आणि काटशह)
रुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा ! वैद्यकीय प्रवेशांमधे होणार्याा गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार्या् लढ्याची ! प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध :
-
Vastragatha (वस्त्रगाथा)
अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला सोन्यासारख्या धातूच्या तारेची जरतारी जोड देणे या साऱ्यांतून साकारलेला वस्त्राविष्कार म्हणजे शास्त्र-कलेचा अनोखा संगम ! कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण-अभ्यास-प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यांतून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन् वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली. जनजीवनाशी अतूटपणे एकरूप झालेल्या या वस्त्रधाग्यांच्या मोहक प्रतिमा साहित्याच्या कथाकाव्यातून, चित्र-शिल्पांच्या रंगरेषांमधूनही उमटल्या. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगांनी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध.
-
Sfoortivadi Neetishashtra (स्फूर्तिवादी नीतिशास्त्
आज परिवर्तनाच्या चळवळी कुंठित झाल्याचे चित्र दिसते. हे कशामुळे घडले, याची मीमांसा विविध अंगांनी केली जात आहे. अशाच शोधयात्रेत राजीव साने यांना प्रकर्षाने जाणवले की, कोणत्याच नीतिशास्त्राचा धड आधार न घेतल्याने ही स्थिती ओढवली आहे. केवळ चिकित्सा करून ते थांबले नाहीत, तर स्वतंत्र नीतिशास्त्राच्या उभारणीची गरज त्यांनी ओळखली. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे अभिनव नीतिशास्त्राच्या उभारणीची पूर्वतयारीच ठरू शकेल. भविष्यातील आवश्यक अशा विचारमंथनाची एक नवी पायवाटच साने यांनी घालून दिली आहे. त्या दिशेने जाणाऱ्यांना त्यात अनेक नवी विचारक्षितिजे खुणावतील.
-
Ajaan Ani Chalisa (अजान आणि चालिसा)
करुणेला काट्यांत बांधणा-या कोंडवाड्याला धर्म कधी म्हणू नये मानवतेचा मुडदा पाडणा-या क्रौर्याला शौर्य कधी म्हणू नये माणसांना ‘व्होटबँक' बनवणा-या व्यवस्थेला लोकशाही म्हणू नये ‘ते आणि आपण' अशा भेदभिंतींना घर कधी म्हणू नये दुरावा मनाचा वाढवी, त्याला स्तोत्र कधी म्हणू नये अनिष्ट प्रथा, कर्मठता, शोषण, अज्ञान अन् दारिद्र्य यांत पिचत असलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी उमटलेला संवेदनशील सूर
-
1695 Smart Robot, AI aani Aurangzeb (१६९५ स्मार्ट
‘राजहंस’ने आयोजित केलेल्या, ‘कुमारवयीन वाचकांसाठी विज्ञानकादंबरी’ लिहिण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी ही कादंबरी केवळ कुमार वाचकांनाच नाही, तर प्रौढ वाचकांनाही रंजक वाटेल अशी आहे. कादंबरीचे कथासूत्र फार विलक्षण आहे. इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये औरंगजेबाच्या मालकीच्या एका जहाजावर पडलेल्या दरोड्याचा शोध घ्यायचा प्रयत्न आज एक प्राध्यापक आणि त्याचा पंधरा वर्षांचा हुशार मुलगा करतात, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेतात, ही कल्पनाच मुळी अफलातून आहे. विज्ञान कादंबरी असली, तरी लेखकाने तिच्यात तांत्रिक माहितीचा भडिमार केलेला नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यंत्रमानव याबद्दलची माहिती कादंबरीत अधूनमधून येते, पण ती जरूर तेवढीच आणि निवेदनाच्या ओघात येते. वाचकाचे कुतूहल जागृत व्हावे पण त्याला अडखळायला होऊ नये, अशा बेताने. कादंबरीतील व्यक्तिरेखा ठसठशीत उतरल्या आहेत. संवाद सहजसुंदर आहेत. विज्ञान अचूक आहे आणि रहस्य वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवते. त्यामुळे पुस्तक एकदा हातात घेतले, की संपूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवता येत नाही.सुबोध जावडेकर