-
Daddy Longlegs (डॅडी लाँगलेग्ज )
जेरुशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी. तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. मात्र अट एकच. तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची. जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला. लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव - ’डॅडी लाँगलेग्ज’! आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी. एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...
-
Hasre Dhukha ( हसरे दुःख )
'माझं आयुष्यच नाट्यमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वतःच अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दुःख दाखवून देतो.’ आपल्या हसर्या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणार्या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.
-
Akrosh ( आक्रोश )
बेरडांनी चोरी करावी, प्रतिष्ठितांची चाकरी करावी, पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन- लाचार, दरिद्री! देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचं पतिपतापण शाबूत राहतं. उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणार्या जागत्या चळवळीची सत्यकथा.
-
Chandramukhi (चंद्रमुखी )
दौलतराव - एक ध्येयधुरंधर राजकारणी. आपला ’संसार’ सांभाळत लोककलेची कदर करणारा रसिक. ती - चंद्रमुखी! नावाप्रमाणेच देखणी. तमाशातली शुक्राची चांदणी. नृत्यकौशल्य, सौंदर्याबरोबरच ’बाई’पणाचा शाप घेऊन आलेली कलावंतीण. मग ’लाल दिवा’ आणि ’घुंघरा’च्या गुंतावळीतून निर्माण झाली ही रशिली कहाणी.
-
Drohparv ( द्रोहपर्व )
इ.स. १७७३ ते १७७९ शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्यांचा झालेला अमानुष खून... लबाडीनं पेशवाईची वस्त्रं धारण करून राघोबांनी पुन्हा सुरू केलेली राघोभरारी... गंगाबाईंच्या पोटात वाढत असलेला नारायणरावांचा अंकुर चिरडण्यासाठी आसमंतात घोंघावणारी कारस्थानं... नाना फडणीस आणि बारभाईंनी तो अंकुर वाचवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा... रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबांस दोषी ठरवल्यावर त्यांच्यामागे लागलेलं शुक्लकाष्ठ... निजाम, हैदर आणि इंग्रजांच्या कारवाया.... सदाशिवरावभाऊंच्या तोतयानं सुरु केलेला उत्पात आणि त्याचा निःपात... संधिसाधू इंग्रजांनी राघोबांशी हातमिळवणी केल्यावर मराठ्यांच्या पुण्यभूमीवर ओढवलेलं पहिलं फिरंग्यांचं परचक्र... ते उलटवून लावण्यासाठी उभ्या हिदुस्थानभर पसरलेल्या प्रबळ मराठा सरदारांची झालेली अभूतपूर्व एकजूट... इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेल्या पराक्रमी मराठ्यांच्या यशोगाथेत - ’वडगावच्या लढाई’त - इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात जाता! इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी.
-
Maharshi Te Gauri ( महर्षी ते गौरी )
समाजानं घालून दिलेल्या रूढ-परंपरांच्या चौकटीच्या धाकाला न बधलेलं कर्वे घराणं. शिक्षणानं स्त्री स्वावलंबी बनेल या विश्वासानं स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे! संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्य या दोन गोष्टींनीच स्त्रीला मानसिक, शारीरिक आरोग्य लाभेल हे आपलं मत तर्कशुद्धपणे मांडताना समाजाशी एकाकी झुंज देणारे र. धों. कर्वे! आणि सत्तेच्या खेळाला मान्यता न देता व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या गौरी देशपांडे! ' या तीन नावांनी कर्वे घराण्याच्या तीन पिढ्या स्त्री-स्वातंत्र्याच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या. त्यांच्या रक्तातून वारसाहक्कानं प्रवाही झाले केवळ पुरोगामी विचार. स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल, तर त्या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही पाने कर्वे घराण्यातील या तीन व्यक्तींचा इतिहासच आहेत.
-
Brush Mileage ( ब्रश मायलेज )
एका चित्रकरांची ही सुरेल, रंगतदार आत्मकथा आहे … रंगांच्या समृद्ध दुनियेत वावरणा-या एका मनस्वी कलावंतनं आपल्या जडण- घडणीची, सोसलेल्या उपेक्षेची आणि मिळालेल्या यशाची मोकळेपणानं सांगितलेली ही श्रवणीय कथा आहे… कुंचल्याच्या साक्षीनं रंगरेषांची शिखरं पादाक्रांत करणा-या एका रंगयात्रिकांनं अनुभवलेल्या जीवनसंगीताचं हे अनोखं दर्शन आहे...
-
Chinmadhala Dr. Jinduo
१९४९ साली चीनमध्ये साम्यवादाची राज्यपद्धती आली. तेव्हापासून चिनी जनतेने फार सोसलंय. साम्यवादाच्या बगलेत पडलेला दहशतवाद भोगलाय. कॉम्रेड्सच्या त्या राज्यात ’जगत राहणे’ म्हणजेही कोणते दिव्य, याची खबर जगाला पोहोचू न देण्याची दक्षता तिथल्या राज्यकर्त्यांनी पुरेपूर घेतली होती. चीनला प्रत्यक्ष भेट देऊन बांबूच्या पडद्याआडचा दहशतवाद कादंबरीरूपात आणणारी ही साहित्यकृती. लेखिका म्हणते, ’आपल्याहाती असलेल्या लोकशाहीच्या ठेव्याची जाणीव व्हावी; लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका, न्यायालयात दाद मिळण्याची सोय, कुणावरही जाहीर टीका करण्याचा परवाना, अशा सोयीस्कर समजुतीत बेपर्वा वागणार्या आपले डोळे उघडावेत, म्हणून ही लिहिली.’ स्वातंत्र्य मिळताच ’लोकशाही’ ऐवजी ’साम्यवाद’ आपल्या कपाळी आला असता तर...?