-
Tablet (टॅब्लेट)
मुंबईमध्ये एका बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनीत केमिस्ट म्हणून महेश नोकरीला लागतो. ही नोकरी त्याला केवळ त्याच्या हुशारीवर मिळालेली असते. दैव मात्र ती हिसकावून घेणार असते पण त्याचे नशीब बलवत्तर असल्यामुळे ती नोकरी त्याला मिळते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात 'टाय' लावून जाणाऱ्या व्यक्तीकडे नशीबवान नोकरदार म्हणून पाहिले जायचे पण तिथे कामाची जबाबदारीही तितकीच असे. औषधे बनवणाऱ्या या कंपनीत विश्लेषक केमिस्ट म्हणून महेश लागतो. पण त्याच्या हुशारीवर तो उत्पादन खात्यात जातो कारण इथे कर्तृत्व दाखवण्याची जास्त संधी असते. इथे कामगारांशी संबंध येतो. त्यांच्या युनियनशी बोलावे लागते हे सर्व अत्यंत जबाबदारीने करणे जरूर असते. त्याचबरोबर कंपनीने दिलेले उत्पादनाचे 'टारगेट' कामगारांच्या सहकार्याने पुरे करणे जरुरीचे असते. औषधाच्या उत्पादनात अनेक अडचणी येतात. उत्पादनाची मशीन्स व्यवस्थित राखणे, त्यावर काम करणाऱ्या कामगाराकडून उत्पादन प्रोग्रामप्रमाणे काढून घेणे, एकीकडे वरिष्ठांची मर्जी सांभाळणे तर दुसरीकडे कामगारांमध्ये एकोपा राखणे, या सगळ्यात एक-एक तासाने उत्पादनाचा दर्जा तपासण्याकरिता येणाऱ्या गुणवत्ता विभागाच्या 'केमिस्टच्या' तक्रारी दूर करणे एक का अनेक अडचणी. हे सर्व महेश कसे पार पाडतो आणि शेवटी Managementची मर्जी संपादन करीत एक एक प्रमोशन घेत VICE PRESIDENT (PRODUCTION) या उच्च पदापर्यंत कसा पोचतो आणि शेवटी कंपनीच्या नियमाप्रमाणे साठाव्या वर्षी निवृत्त होतो. पण तो खरोखरीच निवृत्त होतो का? या प्रश्नाचे उत्तर कादंबरी शेवटपर्यंत वाचल्यावरच कळेल....
-
Plasi Panipat Ani Baksar (प्लासी, पानिपत आणि बक्सर
१७५७ साली झालेली प्लासीची लढाई ही बऱ्याच इतिहासकारांच्या मते लष्करी दृष्ट्या केवळ चकमक म्हणावी या दर्जाची होती. इंग्रज आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये झालेली ही लढाई ही खरे म्हणजे पीडलेल्या मुघल अधिकाऱ्यांनी आणि अन्यायग्रस्त हिन्दू व्यापाऱ्यांनी इंग्रजांच्या मदतीने सिराज उद्दौलाच्या क्रूर आणि मनमानी राजवटीविरुद्ध केलेले बंड होते. १७६१ साली पानिपत येथे अहमद शहा अब्दाली विरुद्ध महायुद्धासमान झालेल्या लढाईत मराठ्यांचा मोठा पराभव झाला, पण या पराभवामुळे हिन्दुस्थानच्या राजकारणात झालेली मराठ्यांची पिछेहाट जेमतेम दहा वर्षे टिकली, तरीही पानिपतच्या पराभवाची सल ही मराठी अंत:करणातून काही जात नाही.पनिपतचे युद्ध ही मराठी माणसाच्या शौर्याची, त्याच्या अस्मितेची, त्याच्या पराक्रमाची, त्यांच्या पराकाष्ठेच्या परिश्रमांची तशीच त्यांच्यातल्या आपसातल्या हेव्यादाव्यांची, त्यांच्यातल्या भाऊबंदकीची, त्यांच्यातल्या मुत्सद्दीपणाच्या अभावाची आणि शेवटी त्यांच्या हौतात्म्याची कथा आहे. १७६४ साली बक्सर येथे इंग्रजांविरुद्ध बंगालचा पदच्युत नवाब मिर कासीम, अवधचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशहा शहा आलम २ यांनी एकत्र दिलेल्या लढाईचे नावही जरी अनेकांनी ऐकले नसले तरी या मध्यम श्रेणीच्या लढाईतील विजयामुळे इंग्रजांना मुघल बादशहाकडून बंगाल सुभ्याचा महसूल वसूल करण्याचे अधिकार कायमचे प्राप्त झाले व त्यामुळे इंग्रजी सत्तेचे पाय हिन्दुस्थानात भक्कमपणे रोवले गेले. एका वेगळ्या दृष्टीकोनातून हिन्दूस्थानातल्या या तीन भिन्न श्रेणींच्या लढ्याचे केलेले वर्णन आणि विवेचन रसिक वाचकांच्या मनाचा वेध घेईल यात शंका नाही.
-
Rajmata Jijau (राजमाता जिजाऊ)
राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर... जिजाऊंची जडणघडण कशी झाली? त्यांनी शिवरायांना कसे घडवले? जिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता? जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले? हे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते. सर्वसमावेशक, सकलजनवादी परंपरेच्या पाईक जिजाऊ. महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी.
-
Pankh Sakaratmakateche (पंख सकारात्मकतेचे)
लेखक डॉ. ओस्तवाल हे जरी डॉक्टर असले तरी हे लेख म्हणजे निव्वळ आरोग्यावरचे कथन नाही. ते स्वत: या सगळ्या अनुभवांतून गेलेले आहेत. या सर्व प्रसंगात त्यांनी सकारात्मकता कृतीत उतरवली आहे. अत्यंत अवघड प्रसंगांमध्ये परिस्थितीवर फक्त आणि फक्त सकारात्मकतेने कशी यशस्वी मात करता येते, याचे वस्तुनिष्ठ अनुभव या पुस्तकात सर्व वाचकांना वाचायला मिळतील. या पुस्तकातील प्रत्येक कथा ओघवत्या शैलीमध्ये लिहिली आहे. या कथा वाचकांसाठी अत्यंत बोधप्रद ठरतील आणि त्यातून त्यांना जीवनभरासाठी सकारात्मकतेची ऊर्जा मिळेल.
-
Kali Kala (काली काला)
काली आणि काला अर्थात कृष्ण हे दोन्ही अवतार दुष्टांचे निर्दालन करून पृथ्वीवर सुशासन प्रस्थापित करण्यासाठी अवतरले. अहिंसेची, शांततेची पुनर्स्थापना आणि सौख्यदायी नवसर्जनासाठी अपवादात्मक परिस्थितीत हिंसा गरजेची आहे, असा संदेश महाकाली व काला म्हणजेच कृष्ण या अवतारांनी दिला आहे. काली कालाच्या उत्पत्तीपासून त्यांनी जनमानसावर पिढ्यान् पिढ्या उमटवलेल्या अमिट ठशाची विविधांगी कारणमीमांसा शोधणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक.
-
Rashtrachya Shodhat Bharat (राष्ट्राच्या शोधात भार
'सगळ्या विविधता, भेदाभेद यांच्यापलीकडे जाऊन 'एकमय भारतीय' होण्यासाठी राज्यघटनेने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे अनुसरणे अपरिहार्य आहे. या अनुशासनातूनच भारत एकसंघ, बलशाली राष्ट्र बनू शकेल, हा विचार प्रभावीपणे मांडणारे चिंतनपर पुस्तक. आपण खरोखर एक 'राष्ट्र' आहोत का? कसे बनते एक राष्ट्र? राष्ट्र म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य चळवळीत निर्माण झालेली राष्ट्रवादाची भावना राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण करू शकलो नाही का? विविध धर्म-वंश-जाती-भाषा-संस्कृती असणारा हा खंडप्राय भूभाग खरंच एक राष्ट्र बनू शकेल का? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. विद्यार्थ्यांसाठी, राजकीय नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी... प्रत्येक सजग भारतीय नागरिकासाठी संग्राह्य, वाचनीय पुस्तक राष्ट्राच्या शोधात भारत
-
Teen Divsanchi Narmada Parikrama (तीन दिवसांची नर्
नर्मदा नदी ज्याठिकाणी गुजरात मध्ये तिलकवाडा जवळ उत्तरवाहिनी वाहते त्याठिकाणची उत्तरवहिनी नर्मदा परिक्रमा. ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करता येत नाही त्यांचेसाठी तितकीच पुण्यदायी आणि आनंददायी पर्वणी. संपूर्ण नर्मदा परिक्रमेची पहिली पायरी.
-
Sunahare Geet (सुनहरे गीत)
हिंदी चित्रपट संगीत कायम प्रवाही राहत आले, बदलत आले आणि म्हणून प्रत्येक पिढीला त्यांची त्यांची नवीन गाणी मिळत राहिली आहेत. गाणी येतात, गाजतात, कानाआड जातात. मात्र, बदलांचे प्रवाह पचवून आजही तेवढेच लोकप्रिय असलेले संगीत ढोबळमानाने १९५० ते १९७५ या पंचवीस वर्षातले! हजारो वेळा या काळातील गाण्यांवर बोलले गेले, लिहिले गेले असले तरीही कोणी या गाण्यांविषयी, त्यांच्या कर्त्याविषयी नव्याने लिहितो तेव्हा आपण त्याच रसिकतेने वाचतो. ती गाणी आठवतो आणि गुणगुणतोही. पद्माकर पाठकजी यांच्या पुस्तकातील लेख वाचताना तसेच होते.
-
Afsana Likh Rahi Hoo (अफ़साना लिख रही हूँ)
एक जमाना होता जेव्हा हिंदी चित्रपटांत ‘गाणी’ हा एक अविभाज्य घटक असे. काही चित्रपटांतील काही गाणी तर कथानक पुढे नेण्याचा भार उचलत… कथानकाचा भागच जणू! अशी गीतं रचताना, ती संगीतबद्ध करताना व ती चित्रित करताना त्यात कथेचं प्रतिबिंब पडेल असं पाहिलं जाई. चित्रपटसंगीताच्या अभ्यासिका डॉ. मृदुला दाढे यांनी या पुस्तकात आपल्या भावविश्वात अढळपद मिळवलेल्या अशा १५ चित्रपटांची निवड केली आहे. त्या चित्रपटांच्या कथेला समर्थ जोड देणाऱ्या गीतांचं चित्रपटातलं स्थान, त्यांची सौंदर्यस्थळं, त्यांची सांगीतिक बलस्थानं डॉ. मृदुला यांनी पारखी नजरेने पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. गीतकाराची तरलता, संगीतकाराची सर्जनशीलता अनेक ‘अफसाने’ या रसग्रहणात आढळत जातील. चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील मेळ उलगडणारं… अफ़साना लिख रही हूँ!