-
Tikasvayamvara (टीकास्वयंवर)
डॉ. भालचंद्र नेमाडे यांना १९९१चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचे समजले. टीकास्वयंवर हा समीक्षालेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरून व मुलाखतीवरून डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे... आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे. एकूण डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी वस्त्रहरण करणारे असले तरी आजच्या वाङ्मयीन संस्कृतीचे कुंठितपण घालविण्यासाठी आणि तिला योम्य दिशा कोणती व का हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे, यात शंका नाही. त्यांना अभिप्रेत असलेली भाषिक कृती डॉ. नेमाडे आपल्या कादंबऱ्यांतूनच नव्हे तर आपल्या समीक्षाविचारांतून जबाबदारीने व चोखपणे करीत आहेत. - म. द. हातकणंगलेकर रविवार सकाळ, २२ डिसेंबर १९९१ रा. श्री. जोग स्मृति पुरस्कार १९९० ह. श्री. शेणोलीकर पुरस्कार १९९० साहित्य अकादमी पुरस्कार १९९१
-
Hirabai Badodekar (हिराबाई बडोदेकर)
ही कथा आहे एका सावळ्याशा कृश मुलीची.. शंभर वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कलाविश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या एका दीपकळीची… ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर यांची. सभ्य घरांतील स्त्रिया जेव्हा जाहीरपणे गात नव्हत्या त्या काळात तिकीट लावून आपला जाहीर जलसा करणारी ही पहिली धाडसी गायिका ! आपल्या गाण्याच्या हिमतीवर २० जणांच्या चमूला घेऊन पहिला ‘फॉरेनचा दौरा करणारी, भारताबाहेर पाऊल टाकणारी ही पहिलीच गायिका. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व क्षेत्रांत आपली मोहर उमटवून ‘सात्त्विक, सोज्वळ गायिकेचा’ आदर्श घालून देऊन ‘स्त्रियांचे घराणे’ निर्माण करणाऱ्या हिराबाई बडोदेकर. डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्यावर हे ललित चरित्र लिहिताना केवळ एका कलाकार स्त्रीचे वैयक्तिक आयुष्य नव्हे, तर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या हिंदुस्थानी संगीतजगताचा एक आलेख मांडला आहे. सत्य आणि कल्पित यांचा हा ‘ख्याल’ आहे… हिराबाईंच्या गाण्यासारखाच सुरेल ! – डॉ. चैतन्य कुंटे
-
Hava Havai (हवा हवाई)
हवाई बेटसमूहाची सर्वसामान्यांमधली ओळख एका बाजूला नितांतसुंदर, निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून असते, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचं पन्नासावं घटकराज्य म्हणून जगाच्या नकाशावरचं त्याचं स्थान काहीसं अपरिचित असतं…. मात्र, एवढं निश्चित की ‘हवाई बेट’ हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. हे कुतूहल या पुस्तकातून अनेक अंगाने शमवलं जातं. हवाई बेटांची मूळ पॉलिनेशियन संस्कृती, राजकीय इतिहास, लोक-संस्कृती, तेथील निसर्गसौंदर्य आणि त्यातील वैविध्य या सर्वांची सविस्तर ओळख या पुस्तकातून होते. ही ओळख करून देता देता आजवर त्रेपन्न देशांची भ्रमंती केलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक हे जगप्रसिद्ध लेखक विचारवंत मार्क ट्वेन, कॅ. जेम्स कुक अशा हस्तींच्या तेथील वास्तव्याचा मागोवा घेतात. तसेच अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांची जन्मभूमी म्हणूनही ते ‘हवाई’कडे दृष्टिक्षेप टाकतात आणि तेथील स्थलांतरित भारतीयांचीही माहिती देतात. दुसऱ्या महायुद्धातील ‘पर्ल हार्बर’वरील जपानचा हल्ला तेथे म्युझियमरूपात कसा ‘जीवंत’ आहे, हेही नाईक पुस्तकात सांगतात. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य असं की लेखकाचं तेथील दीर्घ वास्तव्य आणि त्या वास्तव्यादरम्यान पाहिलेलं, अनुभवलेलं, अभ्यासलेलं ‘हवाई’ ते आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. हवाईचा सर्वस्पर्शी छोटेखानी एन्सायक्लोपेडिया… हवा हवाई!
-
Gandhivadacha Chemical Locha Ani Itar Katha (गांधी
लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या संग्रहातील कथांना तसा कुठलेही स्थानवैशिष्ट्य असलेला एक विशिष्ट असा परिसर नाही. त्या एकूणच भारतीय आणि जागतिकही पटलावरही घडतात. विशेषतः सांस्कृतिक बहुविधता हा आशय असणाऱ्या अनेक कथा या संग्रहात आहेत. ही बहुविधता हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. जाती-धर्माच्या सीमारेषा ओलांडून सर्वांच्या मनाला भिडणारे संगीत, परस्परांमधला सद्भाव, सामाजिक सलोखा राखणारे समाजमन, परधर्मीयांच्या श्रद्धांचा आदर करणारी सामान्य माणसे असा या संग्रहातील कथांचा ऐवज आहे. भारतीय समाजातला मुस्लिम हा समाजघटक) आपल्या कथात्म साहित्यात अभावानेच आढळतो. ती उणीव यातील कथांनी भरून काढली आहे. या कथांमध्ये चित्रित झालेल्या समाजजीवनात भिन्न धर्मीयांचे अस्तित्वही ठळकपणे जाणवते. म्हणून या कथा व्यापक अर्थाने समाजजीवन कवेत घेताना दिसतात. कथात्म साहित्यातूनही लेखकाचा विचार डोकावतो. एका प्रागतिक अशा समाजाचे रेखांकन करणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः सहिष्णुतेचा संकोच होत असलेल्या, एकारलेल्या काळात या कथांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होणारे आहे. – आसाराम लोमटे
-
Zangat (झंगाट)
गजबरवाडी या छोट्याशा गावातील बाळूमास्तर आणि भरमूअण्णा या धनदांडग्याच्या वैराची ही कहाणी. मास्तरचा मुलगा श्रीपतीचे रुक्की नावाच्या विवाहित मुलीशी संबंध असतात. रुक्कीच्या लग्नाच्या आधीपासूनच हे संबंध असतात आणि रुक्कीच्या पहिल्या लग्नानंतरही ते चालू राहतात. रुक्कीचा पहिला नवरा त्यामुळे तिला सोडून देतो. तिचं दुसरं लग्न होतं, तरी श्रीपतीचे आणि तिचे संबंध सुरू राहतातच. याचा फायदा घेऊन भरमूअण्णा रुक्कीला मास्तरच्या घरात घुसवण्यासाठी अनेक उपाय योजतो; पण मास्तर श्रीपतीला लपवून ठेवतो आणि भरमूअण्णाला पुरून उरतो; मात्र रुक्कीला माहेरीच राहणं भरमूअण्णाने भाग पाडलेलं असतं. शेवटी भरमूअण्णा एके दिवशी गुंडांकरवी मास्तरला बेशुद्ध होईस्तोवर मारहाण करवतो आणि ते प्रकरण पद्धशीरपणे दाबतो. मास्तरला गाव सोडणं भाग पडतं. या सगळ्या प्रकरणात रुक्कीची मन:स्थिती काय असते? ती सासरी जाते का? श्रीपती समोर येतो का? काय होतं शेवटी या ‘झंगाटा’चं?
-
Vijay (विजय)
विजय हा कादंबरीचा नायक... वैमानिक... परंतु एका विमान अपघातात त्याचं कमरेपासून खालचं शरीर निकामी होणं... या घटनेच्या काही महिन्यांपूर्वीच नीलाशी त्याचा झालेला विवाह... नीलाचं आता काय होणार, या विचाराने त्याने आत्महत्येचा विचार करणं... परंतु त्याच्या आईने त्याला परावृत्त करणं...त्याने आईकडून एक वचन घेणं... अप्पासाहेब हे गिरणीमालक, त्यांची मुलगी निर्मला, विजयचा मावसभाऊ अरविंद, या कादंबरीतील अन्य व्यक्तिरेखा...अरविंदचं अप्पासाहेबांच्या गिरणीत काम करणं...निर्मलेचं मन अरविंदकडे आकृष्ट होणं...अप्पासाहेब अरविंदला मॅनेजर करू पाहत असतानाच त्याने कामगारांचा पक्ष घेऊन, राजीनामा देऊन संपात उतरणं...तुरुंगात जाणं...नंतर त्याचं विजयच्या घरी येणं...त्यावेळी नीलाने आपल्या मनातील गुपित त्याला सांगणं...विजयने त्याच्या आईकडून कोणतं वचन घेतलं होतं? अरविंदने कोणाच्या प्रीतीचा स्वीकार केला? नीलाच्या की निर्मलाच्या? कौटुंबिक, औद्योगिक पार्श्वभूमीवर रंगलेलं भावनाट्य.
-
Dnyanai Savitribai Phule (ज्ञानाई सावित्रीबाई फुले
सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्यावर डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. नाईक यांच्या शैक्षणिक प्रवासात सावित्रीबाईंचे फार मोठे योगदान होते, असे त्या मानतात. सावित्रीबाईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शुद्र, बहुजन स्त्रियांना गुलामगिरीतून व दास्यातून मुक्त करण्यासाठी शिक्षणाचीच गरज आहे, हे ओळखून त्यांनी स्त्री-शिक्षणाचा भक्कम पाया घातला. सावित्रीबाई ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली १९ व्या शतकातील क्रांतिकारी स्त्री होती. पुण्यासारख्या कर्मठ ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यात प्रखर विरोधावर मात करत कठीण रूढी, परंपरा, अज्ञान तसेच त्या काळातील धन-दांडग्यांचे समाजावरील वर्चस्व अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराणी ताराबाईंची आठवण होईल असाच लढा सावित्रीबाईंनी दिला. एकोणिसाव्या शतकात अंधश्रद्धेने आणि अज्ञानाने निश्चेष्ट पडलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणार्या सावित्रीबाई समाजाच्या वाटेवरील अपमानाचे काटे दूर करत न डगमगता, न थकता अखेरपर्यंत लढत राहिल्या.
-
Smrutisugandh (स्मृतिसुगंध)
लेखक म्हणून, पत्रकार म्हणून, मित्र म्हणून, शिष्य म्हणून अनेक नामवंतांचा सहवास भा. द. खेर यांना लाभला. या सर्व थोर व्यक्तित्वांच्या सहवासातील आठवणींना त्यांनी या व्यक्तिचित्रसंग्रहातून उजाळा दिला आहे. इंदिरा गांधींच्या पहिल्या भेटीतच नेहरू घराण्यावर कादंबरी लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांच्या सहवासात त्यांना मंत्र-तंत्र शक्ती प्राप्त झाल्याचे ते सांगतात. मनोहर माळगावकरांचा मोठेपणा सांगताना ‘दि प्रिन्सेस’ या कादंबरीचा मराठी अनुवाद करण्याची संधी त्यांनी नाममात्र एक रुपया रॉयल्टी घेऊन दिल्याचं ते नमूद करतात. ना. सी. फडके यांच्या मखमली भाषेच्या पाऊलवाटांचा माग घेत गेल्याचं ते सांगतात. श्री. पु. गोखले, शिवाजीराव भोसले, वि. स. वाळिंबे इत्यादींच्या आठवणीही त्यांनी जागविल्या आहेत. या व्यक्तिचित्रांच्या अनुषंगाने तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीचंही दर्शन घडतं. हा व्यक्तिचित्रणात्मक स्मृतिसुगंध नक्कीच दरवळणार.
-
Aata Mavha Kay! (आता मव्हं काय!)
डॉ देविदास तारू यांचं हे स्वकथन म्हणजे स्वत:ला घडवत घडवत व्यवस्थेच्या विषमतेतून बाहेर पडण्यासाठी केलेली एक गंभीर लढाईच आहे. श्वास कोंडून ठेवणार्या आणि अपंग करणार्या व्यवस्थेतून बाहेर पडून देविदासनं एका मोठ्या हिमतीनं केलेला संघर्ष केवळ अचंबित करणारा आहे. घरची गरिबी, त्यातून लहानपणीच बळावलेली गुन्हेगारी प्रवृत्ती, अशा वातावरणात एक दिवस साक्षात्कार झाल्याप्रमाणे एका मुलाला शिक्षणाचं महत्त्व कळतं आणि नंतर तो मागे वळून पाहत नाही. तारू यांचा हा प्रवास प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत स्वतःला घडवू पाहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी प्रेरणादायी आहे.
-
Tingad (तिंगाड)
‘तिंगाड’ कथेत गावातली पूरस्थिती बघायला येतात पालकमंत्री...अन् तेच पडतात पाण्यात...तर ‘वैकुंठ’ कथेतील निगवणी गावात होते नवीन स्मशानभूमी आणि वाहून जाते पाण्यात...नगरपालिकेत तेव्हा रंगलेली असते हाणामारी... ‘जाळं’ या कथेत ब्ल्यू फिल्म चाललेली असताना पोलीस छापा टाकतात आणि स्वत:च ब्ल्यू फिल्म बघत बसतात...‘हुमान’ कथेत आहे काळ्या बाप्या आणि लंबू तुक्या या इरसाल जोडीचा ‘खास’ भाषेतील हंगामा... ‘गस्त’मध्ये गावात सुरू होतं चोर्यांचं सत्र, रामा थोरवतसह गावकरी घालायला लागतात गस्त...गस्तीदरम्यान दारू पितात...चोरांना मिळतं मोकळं रान...‘इलेक्शन’मधील तथाकथित वार्ताहर हणमंत देशमुख आणि गुंडू न्हाव्याची निवडणुकीच्या प्रचारादरम्यानची ‘मज्जा’ आणि त्यांच्या पारवाळांची झालेली चांदी...‘शिकार’मधील धोंडबा ड्रायव्हरचा मालक जातो शिकारीला अन् घाबरतो वाघाला, धोंडबाच मग वाघाला अर्धमेला करतो, मग मालक वाघावर गोळी चालवतो...अन् नंतर कळतं की तो वाघ सर्कशीतला असतो... अस्सल गावरान पार्श्वभूमी आणि इरसाल बेनी...विनोदाची अनोखी मेजवानी
-
Blotting Paper (ब्लॉटिंग पेपर)
जेव्हा मनरूपी शेतात रुजतं तेव्हा मग उगवतात अंकुर...त्या अंकुरांना मग कुठलाही आकृतिबंध चालतो...लेख, कविता, पत्र, व्यक्तिचित्र...याच आकृतिबंधांतून स्वाती चांदोरकर व्यक्त झाल्यात मुक्तपणे...नातीला बडबडगीतं ऐकवताना त्यांना बडबडगीतांबाबत सुचतो एक वेगळाच विचार...मृत्यूबाबतही त्या करतात चिंतन... माणसाचं जीवन आणि मन...भावनांनी-विचारांनी व्यापलेलं...व्यक्तींनी गजबजलेलं...नात्यांनी बांधलेलं...साहित्यादी कलांनी रसरसलेलं...हे व्यापणं, गजबजणं, बांधणं, रसरसणं कधी रमतात शान्ताबाईंच्या कवितांमध्ये...तर कधी रमतात अरुण दातेंच्या आठवणींमध्ये...पतीबरोबरच्या आत्मीयतेने पत्र लिहितात त्या... स्वातीताईंच्या या सगळ्याच लेखनाला चिंतनाची डूब आहे आणि भावनेचा ओलावाही सहजीवनात काय कमावलं-गमावलं हे सांगताना पतीच्या आणि स्वत:च्याही व्यक्तिमत्त्वाबाबत बोलून जातात सहजपणे...कृष्णाच्याही अंतरंगात डोकवावंसं वाटतं त्यांना...चंद्रमोहन यांच्या पुस्तकाबद्दलही भरभरून बोलावंसं वाटतं...सुनील मेहतांना...एक लय साधली आहे त्यांनी या लेखनातून...ती लय वाचकांना गुंतवून ठेवेल, अंतर्मुख करेल आणि परमानंद देईल हे नक्की
-
Pravah (प्रवाह)
मधुकर कदम हा नवलेखक तरुण कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडतो आणि त्याचं गाव सोडून मोठ्या भावाकडे राहायला जातो. तिथे एका पेढीवर नोकरी करत असताना त्या पेढीच्या शेटजीच्या मुलीच्या, सविताच्या वासनेच्या जाळ्यात मधुकर सापडतो आणि त्याला स्त्री-देहाची चटक लागते. नंतर सविता आत्महत्या करते आणि मधुकर गावी परततो. काही दिवसांनी मेहता नावाचा माणूस त्याला शब्दकोडे स्पर्धेसंबंधित नोकरी देतो. मेहतांच्या ऑफिसमधील जोशी, मधुकरला वेश्यागमनाची दीक्षा देतो. त्याच ऑफिसमधील सुलोचनाशी मधुकरचा शरीरसंबंध येतो. मेहतांची नोकरी सोडून मधुकर, अक्कोळकरांच्या ‘जनता’ नावाच्या साप्ताहिकात नोकरीला लागतो. तिथे अक्कोळकरांची बायको मधुकरशी लगट करायचा प्रयत्न करते; पण गुप्तरोग झाल्याचं सांगून तो तिला टाळतो. त्यानंतर एका दुर्गम गावात त्याला मास्तरची नोकरी मिळते. तिथे शिरमव्वा नावाची एक बेरड मुलगी मधुकरमध्ये मनाने गुंतते; पण तिच्या पवित्रतेमुळे मधुकर तिच्यापासून दूर राहतो. तो गाव सोडायचं ठरवतो आणि शिरमव्वा त्याला भरल्या डोळ्यांनी-मनानी निरोप देते.
-
Radhikasantwanam (राधिकासांत्वनम)
मुद्दुपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. ती देवदासी होती. तिने ‘राधिका सांत्वनमु’ हे तेलुगू भाषेतील काव्य रचलं. त्या काव्याचा मराठी भावानुवाद डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी केला आहे, ‘राधिकासांत्वनम्.’ राधा-कृष्ण आणि राधा-इला यांचा शृंगार, श्रीकृष्ण इलेमध्ये रममाण झाल्यामुळे रुसलेली राधा आणि तिचा रुसवा काढण्यासाठी कृष्णाने केलेली मनधरणी, असं या काव्याचं ढोबळ स्वरूप आहे. राधा-कृष्ण आणि कृष्ण-इला यांच्या शृंगाराचं मुक्तपणे केलेलं वर्णन हे या काव्याचं प्रमुख वैशिष्ट्य आणि अठराव्या शतकात एखाद्या स्त्रीने असं वर्णन करावं, ही विशेष बाब, या काव्यातून जाणवते. इला आणि कृष्णाचा विवाह होतो, त्यांच्या पहिल्या रात्रीचंही वर्णन यात येतं. त्यानंतरही कृष्ण आणि इलेच्या रंगलेल्या शृंगाराची वर्णनं येतात. इकडे राधा मात्र झुरत असते. तिच्याही शरीरात कामाग्नी भडकलेला असतो; पण नंतर कृष्ण तिच्याकडे आल्यावर राधा-कृष्णाची कामक्रीडाही रंगते. इला ही नवयौवना आणि राधा ही कामानुभवी स्त्री. श्रीकृष्णाच्या त्या दोघींबरोबरीच्या कामक्रीडेतून नवोढेच्या आणि अनुभवी स्त्रीच्या कामक्रीडेतील फरक मुद्दुपलनी दर्शवते. राधा-कृष्ण आणि राधा-इला यांच्या कामक्रीडेचं रसाळ वर्णन असलेलं काव्य.
-
Yashvantrao Chavan: Aathavani-Akhyayika (यशवंतराव
यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देणारे लेखन. लक्ष्मण माने यांनी या पुस्तकातून-पत्ररूपात सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला आहे. लोकनेते यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी उलगडून दाखवले आहे. यात लक्ष्मण मानेंना बालपणापासूनच यशवंतरावांबद्दल कसे कुतूहल होते, इथपासून ते यशवंतरावांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास या कालखंडाचा सजगतेने, संवेदनशीलपणे केलेला अभ्यास व मोठा कालपट माने वाचकांसमोर मांडतात. यशवंतरावांचा जनसंपर्क, लोकांबद्दलचे प्रेम, पक्षनिष्ठा नवनवीन योजना राबवण्याची त्यांच्या मनात असलेली उर्मी, साहित्य,कला, संगीतप्रेम या सर्वांचा ऊहापोह या पुस्तकात माने यांनी घेतला आहे. खरं तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास. हे सर्व असूनही खऱ्या अर्थाने लोकांशी असलेली आपुलकीची नाळ व कवीमन अखेरपर्यंत ठेवून सतत जमिनीवर पाय असलेला हा अवलिया. रूढार्थाने यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या हयातीतच आख्यायिका बनून राहिले होते, यात तीळमात्रही शंका नाही. त्या सगळ्या गोष्टीचा घेतलेला सामाजिक, राजकीय व मानवतेच्या दृष्टीने घेतला वेध म्हणजेच हे पुस्तक होय !
-
The Racketeer (द रॅकेटीअर)
माल्कम हा कादंबरीचा ४३वर्षीय, कृष्णवर्णीय वकील असलेला नायक. ‘माजी मरीन्स’अशीही त्याची ओळख असते. या सरळमार्गी व हुशार वकिलावर तुरुंगात जाण्याची वेळ येते. त्याचं कौटुंबिक, व्यावसायिक जीवन धोक्यात येतं. पाच वर्षांनंतर माल्कमला सुटकेचा मार्ग दिसतो. ‘जज फॉसेट’ व त्याची सेक्रेटरी ‘मिस क्लेअर्स’ यांचा खून होतो. याचा फायदा माल्कमला तुरुंगातून सुटण्यासाठी होतो. तो खुन्याचं नाव सांगतो आणि कायद्यातील तरतुदीनुसार त्याची तुरुंगातून सुटका होते. प्लॅस्टिक सर्जरीने चेहरा बदललेल्या आणि नावही बदललेल्या माल्कमच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू होतो. चित्रपट निर्माता म्हणून वावरत असताना तो नाथन कूले या व्यक्तीवर माहितीपट बनवतोय, हे दाखवून नाथनकडून लपवलेलं सोनं कुठं आहे, हे जाणून घेऊन ते मिळवतो. ते सुरक्षित बँकेत ठेवतो. एकूण कसा रंगतो माल्कमच्या जीवनाचा हा नवीन अध्याय? थरारक वळणांनी पुढे सरकत राहणारी एका वकिलाच्या बुद्धिचातुर्याची उत्कंठावर्धक कथा.
-
Vimuktayan (विमुक्तायन)
‘विमुक्तायन’ हे लक्ष्मण माने लिखित संशोधनात्मक पुस्तक असून, महाराष्ट्रातील भटक्या व विमुवत जमातींचा चिकित्सक पध्दतीने केलेला हा अभ्यास. लेखकाने पहिल्या प्रकरणातून विमुक्त जमातींचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मांडला आहे. दुसर्या प्रकरणातून भटक्या गुन्हेगार जमातींचा जीवन संघर्ष, तंटे-बखेडे, सामाजिक जीवनाचा धांडोळा घेतला आहे. तिसर्या प्रकरणांतून महाराष्ट्रातील विमुक्त जमातींची सामाजिक व आर्थिक स्थिती,जात परंपरा,विवाह,विधवांचे पुनर्विवाह,जातपंचायत इ.चा ऊहापोह केला आहे, शेवटच्या व चौथ्या प्रकरणातून-भटक्या-विमुक्तांसाठी शासनाने केलेल्या उपाययोजना,त्यांचे मनाचा थरकाप उडविणारे,परिघाबाहेरचे जीवन, जातपंचायतींचे वाढते प्रस्थ, परिशिष्टे, नकाशे, प्रत्येक जात व पोटजातींच्या माहितीचे टेबल इ.माहिती सखोल अभ्यास करून सुस्पष्टपणे दिली आहे. त्यांचे हे कार्य म्हणजे,‘काटेरी कुंपणा’तील रक्तबंबाळ झालेल्या जीवांची मुक्तता म्हणावी असेच. म्हणूनच मानवतेच्या कार्याचा सजगतेने,संवेदनशीलपणे केलेला हा अभ्यास म्हणजे श्रेष्ठ पुरस्कार ठरणारे, ‘विमुक्तायन’ हे पुस्तक होय