-
Gosht Sangnyacha Anand Arthat Tekdimagche Gaon (गो
परतून कुणीही घराकडे जाऊ शकत नाही हे आधुनिक साहित्यातील एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे. तरीही माणसे आपल्या भूतकाळाकडे जाऊ पाहतात. काय हवे असते त्यांना? त्यांना जे मिळते ते खरेच मौल्यवान असते का? माणसे जे प्रश्न घेऊन मागे जातात त्यांना त्यांची उत्तरे मिळतात का? असे प्रश्न घेऊन आपल्या भूतकाळाकडे वळलेल्या आणि हा प्रवास शब्दबद्ध करू पाहणाऱ्या एका लेखकाला अचानक एक रचनाबंध गवसतो-कलाकृतीचा आणि जीवनाचाही. त्याला जाणवत जाते, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत असा अट्टहास नकोच बाळगायला, कारण या प्रवासात एक आगळा आनंद आहे आणि तसाच तो या प्रवासाची गोष्ट सांगण्यातही आहे. स्वतःला शोधता शोधता स्वतःमधील लेखकाला लागलेला आयुष्याबद्दलचा हा एक शोध आहे- आत्मशोधाच्या दिशेने जाणारी विजय पाडळकर यांची एका आगळ्या प्रवासाची ही नवी कादंबरी. वाचकांना गोष्ट ऐकल्याचा आनंद देत, स्वत:च्या आतही पाहायला भाग पाडत राहते... अंतर्मुखतेचा प्रत्यय देत...
-
Medhavini (मेधाविनी)
अर्थशास्त्र व राज्यशास्त्रात १९७८ साली बी.ए.ची पदवी प्राप्त केलेले आद. यशवंत बैसाणे यांनी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर राजपत्रित पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांच्याकडे यास्तव शासन सेवेचा प्रदीर्घ अनुभव तर होताच. त्या शिवाय खाजगी छापखान्यापासून पंचतारांकित सेंटॉर हॉटेल, तसेच आयकर विभागामधील सेवेचा अनुभव त्यांनी संपादित केला. त्या अनुभवाचा त्या-त्या क्षेत्रातील सहकारी कर्मचारी वर्गाला फायदा मिळवून देण्यासाठी झटत आलेले आहेत. याच दरम्यान कर्मचारी संघटना बांधण्याचा मूलभूत हक्क नाकारणाऱ्या हिटलरशाही वृत्तीच्या विरोधात न्यायालयीन लढा देताना नऊ वर्षे सेवेतून निलंबित झाले. तरीही शोषित, पिडीत कर्मचारी बंधू-भगिनींना न्याय देण्यासाठी सातत्याने पुढे राहिले. 'मोहाडीचे तात्यासाहेब' या स्मरणिकेचे सहसंपादन, त्याचबरोबर वृत्तपत्र व नियतकालिकांतून कथा, लेख व प्रासंगिक लेखनाबरोबरंच मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक संघटनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. आजवरच्या जीवनप्रवासात सान्निध्यात आलेल्या विविध वृत्ती, व्यक्तिमत्त्वांचा उमटलेला सकारात्मक ठसा 'मेधाविनी' या कथासंग्रहाच्या निमित्ताने त्यांनी शब्दबद्ध केला आहे. यातील कथांना सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेची किनार आहे. प्रत्येक कथेतील क्षणाक्षणाची गूढ उत्कंठा हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. समाजाप्रति असणाऱ्या जाणीवांच्या बाबतीत कृतघ्न होणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू लब्धप्रतिष्ठितांना आपल्या सामाजिक बांधिलकीचे उत्तरदायित्व निभावण्याचे स्मरण करून देणे हाच प्रस्तुत लेखकाचा या 'मेधाविनी' च्या निमित्ताने मूळ उद्देश आहे.
-
Jagacha Etihas Ek Drushtikshep (जगाचा इतिहास एक दृ
गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांच्या काळात जगाच्या इतिहासात घडलेल्या महत्वाच्या घटनांचा सदर पुस्तकात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत अमेरिका व युरोपात अमेरिकेची क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियनचा उदय, शीत युद्ध, सोविएत संघाचे विघटन आदी ठळक घटना घडल्या. यातील घटना अठराव्या, एकोणिसाव्या व विसाव्या शतकात घडलेल्या आहेत. या घटनांविषयीची माहिती व त्यांचे जगाच्या इतिहासातील महत्व वाचकांना कळावे या दृष्टीने या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. हे पुस्तक सामान्यवाचक, अभ्यासक, शिक्षक, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. या पुस्तकात नमूद केलेल्या घटनांचा परिणाम जगाच्या इतिहासावर कळत नकळतपणे झालेला आढळतो. त्यामुळे या घटनांचा अभ्यास करणे उपयोगी ठरणार यात वाद नाही.
-
Talkies Chi Goshta (टॉकीज ची गोष्ट)
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण पूर्वीचे फिल्म दीवाने आपण कोणता पिक्चर कोणत्या थिएटरमध्ये किती पैशाच्या वा रुपयाच्या तिकीटात एन्जॉय केला याही आठवणीत रमत. मी गिरगावात लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सचा हुकमी 'स्टॉलचा पब्लिक ' होतो. मिडियात आल्यावर यातील काही चित्रपटगृहात मिनी थिएटर असल्याचा अनुभव घेतला. थिएटर डेकोरेशनपासून चित्रपटाचे यशापयश यात या 'मेन थिएटर'च्या गोष्टी खूपच रंजक. अशाच कुलाब्यापासून ताडदेवपर्यंतच्या थिएटर्सचा इतिहास जाणून घेतला, अनेक थिएटर्स इंग्रजकालीन आहेत, अनेक आठवणी देत बंदही पडली आणि याच थिएटर्सचे माझे बहुरंगी, बहुढंगी अनुभव म्हणजेच हे 'टॉकीजची गोष्ट' पुस्तक. आपल्यालाही आपल्या आठवणीत नेण्याचा प्रयत्न.
-
Madam Commissiner (मॅडम कमिशनर)
‘प्रामाणिक, सक्षम, निष्पक्ष योद्धा’ ज्युलिओ रिबेरो ‘लक्षवेधक’ ट्रिब्यून ‘सिस्टीम समोर धडाडीने उभी राहिलेली पहिली महिला पोलीस अधिकारी’ शोभा दे ‘एक अद्भुत, निराळी कथा’ सायरस ब्रोचा ‘वाचायलाच हवे, असे महत्त्वाचे पुस्तक’ इंडियन एक्सप्रेस भारतातील सर्वांत प्रामाणिक, निडर पोलीस अधिकाऱ्यांपैकी एकाची अतुलनीय गाथा भारताच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून पदवी प्राप्त करणाऱ्या मीरां चढ्ढा बोरवणकर या १९८१च्या बॅचमधील एकमेव महिला. अकादमीतून बाहेर पडल्यावर आपल्या कारकिर्दीत कित्येक संवेदनशील आणि वादग्रस्त प्रकरणांची एक लांबलचक मालिका त्यांनी अनुभवली. भ्रष्टाचार आणि भेदभाव यांना तोंड देत, विविध गुन्ह्यांसाठी एकत्रितपणे लढा देत असताना त्यांनी आपल्या आंतरिक सचोटीशी कधीही तडजोड केली नाही. अंगभूत कौशल्यांबरोबरच सातत्यपूर्वक प्रयत्नांमुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला जिल्हा पोलीस प्रमुख, तसेच पहिल्या महिला पोलीस आयुक्त बनल्या. त्यांनी ‘सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ आणि मुंबईच्या क्राईम ब्रँचमध्ये वरिष्ठ भूमिकाही सांभाळल्या. अखेरीस ‘ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’, ‘नॅशनल क्राईम अँड रेकॉर्ड ब्युरो’च्या महासंचालक म्हणून त्या निवृत्त झाल्या. कायद्याचे राज्य स्थापन करण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेल्या मीरां, या देशाच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेवर टीका करण्यास कधीही डगमगल्या नाहीत; प्रसंगी देशातील वरिष्ठ पदांवरील व्यक्तींनाही त्यांनी थेट आव्हान दिले. भारतीय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आपल्या छत्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मीरां यांनी कित्येक खळबळजनक प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. जळगाव सेक्स स्कँडल, दागिन्यांच्या पेढीवरील लूट, महामार्गावरील दरोडे, जातीय दंगली, क्रूर हत्या, सामूहिक बलात्कार, बंदरातील चोरी, आर्थिक फसवणूक, इथपासून ते छोटा राजन, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर यांसारख्या कुख्यात गुन्हेगारांशी त्यांची चकमक झडली. राज्य कारागृह प्रमुख या नात्याने, संजय दत्तचा तुरुंगवास, तसेच अजमल कसाब आणि याकुब मेमन यांच्या फाशीची देखरेख करताना त्यांनी आक्रमक प्रसारमाध्यमे आणि सरकारी दबाव यांचा अविचलपणे सामना केला आणि त्याद्वारे खाकी परिधान करण्याचे महत्त्व आणि त्यातील आव्हाने, दोन्ही अधोरेखित केले. चित्तथरारक अनुभूती देणाऱ्या, अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या आणि अखंड प्रेरणा देणाऱ्या या प्रामाणिक ‘मॅडम कमिशनर’चा हा जीवनपट म्हणजे भारतीय पोलीस सेवेतील एका महिला अधिकाऱ्याची संस्मरणीय यात्रा आहे. युनिफॉर्ममध्ये स्वारस्य असलेल्या सर्वांनी, तसेच कायदा-सुव्यवस्थेबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकाने हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.