-
Na Sangnyajogi Goshta (न सांगण्याजोगी गोष्ट)
१९६२. साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युद्धात आपला दारूण पराभव झाला. जगभर त्यामुळे आपली मानहानी झाली. म्हणून ती ठरली 'न सांगण्याजोगी गोष्ट'! तथापि आपली राष्ट्रीय संरक्षणसिद्धता वाढवायची असेल,तर 'त्या' पराभवाची परखड कारणीमिमांसा करायलाच हवी. 'त्या' शोकांतिकेला कोणकोण जबाबदार होते? चीनवर नको तेव्हडा विश्वास टाकणारे भोळेभाबडे राज्यकर्ते? कि राणा भीमदेवी थाटात 'फॉरवर्ड पॉलिसी' आखणारे सेनाधिकारी? या युद्धात नेमके काय घडले? त्या पराभवाल एखाद दुसरी तरी रुपेरी कडा होती का?या आणि अशा इतरही असंख्य प्रश्नांची साधार,तपशीलवार उत्तरे देणारा ग्रंथ म्हणजे युद्धाशास्त्राविषयक मराठी साहित्यात मोलाची भर आहे. प्रत्यक्ष राणक्षेत्राची व व्युहरचनांची कल्पना देणारे २५ नकाशे हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एक रणझुंजार सेनानीने इतिहासकाराच्या भूमिकेतून लिहिलेला हा ग्रंथ देश्हीताबद्दल कळकळ असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवा.
-
Shrutividnyan Va Ragsaundarya (श्रुतीविज्ञान व राग
डॉ.विद्याधर ओक हे ज्येष्ठ हार्मोनियमवादक,तसेच रागसंगीताचे व्यासंगी अभ्यासक. संगीताच्या ध्यासापोटी औषधविज्ञानक्षेत्रातील करियर सोडून संगीतसंशोधनात रमलेले संशोधक कलावंत. आपल्या कल्पक संशोधनातून श्रुतींची संख्या आणि स्थाने त्यांनी निश्चित केली. जगभरात मान्यताप्राप्त या संशोधनाचे फलित म्हणजेच २२ श्रुती हार्मोनियम. जिद्द,चिकाटी अन अथक परिश्रमाने भरलेली त्यांची हि शोधगाथा सांगत आहेत प्रख्यात संगीतसमीक्षक आणि पत्रकार सदाशिव बाक्रे.
-
Sandhivatache Dhukhane (संधिवाताचे दुखणे)
संधिवात म्हणजे काय, याची सविस्तर माहिती देत डॉ. श्रीकांत वाघ येथे या आजारावर काय उपचार करता येतील याची माहिती देतात. संधिवाताच्या आजाराचे स्वरूप, त्याची व्याप्ती याबद्दल शास्त्रीय माहिती देत 21 प्रकरणांमध्ये वाघ या महत्त्वाच्या आजारांकडे लक्ष वेधण्यात यशस्वी होतात. केवळ वाचकांनाच नाही, तर या क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिकांनाही ही माहिती खूप मोलाची ठरेल. या आजारावरील औषधे व त्यासंबंधी घ्यावयाची दक्षता याबद्दल वाघ यांनी स्वतंत्र प्रकरण दिले आहे.
-
Laxmanresha (लक्ष्मणरेषा)
व्यंगचित्रात भारतीय माणसं दाखवायची म्हणजे आर. के. लक्ष्मण यांना मोठा जमावच काढावा लागे. गुजराती, मराठी, केरळी, बंगाली, मद्रासी, पंजाबी अशी वेगवेगळ्या चेहरेपट्ट्यांची, पोशाखांची माणसं काढायला वेळ लागे. व्यंगचित्र सादर करण्याची वेळ गाठण्यासाठी हळूहळू या जमावातील एकेका मंडळींना लक्ष्मण चाट देऊ लागले. अखेर एकच जण उरला. टक्कल असलेला, फुगीर नाकाचा, आखूड मिश्यांचा, धोतर व चौकडीचा कोट घातलेला आणि सदोदित चेहर्यावर भांबावून गेल्याचे भाव असलेला ’सामान्य माणूस’ (कॉमन मॅन). या देशातील कोट्यवधी मूक जनतेचं प्रतिनिधित्व तो करू लागला. लक्ष्मण यांच्या या आत्मकथेत त्यांचीही अवस्था कधी कधी या ’सामान्य माणसा’सारखी होते. कधी त्यांच्या व्यंगचित्रात आकडे लपले आहेत, असं समजून सट्टा खेळणारा व्यापारी त्यांना येऊन भेटतो, कधी न्यूयॉर्कमधील पार्क अॅव्हेन्यू भागात ते रेनकोट घेऊन गेल्यानं त्यांना चुकून मेक्सिकन समजलं जातं, तर एकदा मद्य पार्टीनंतर एवढी गाढ झोप त्यांना लागते की, आयुष्यातला एक दिवस ’कोरा दिवस’ ठरतो! जीवनाच्या कॅनव्हासवर लक्ष्मण यांनी रेखाटलेली शब्दचित्रं, टिपलेल्या घटना त्यांच्या व्यंगचित्रांइतक्याच मिश्कील, खट्याळ, खुसखुशीत आहेत.
-
Gokulgatha (गोकुळगाथा)
पाच लाख म्हशी. दोन लाख गायी. अठराशे कर्मचारी. असंख्य उत्पादक. चाळीस लाख ग्राहक. या साऱ्याचं नांदत कुटुंब म्हणजे कोल्हापूरचा दुधसंघ- 'गोकुळ'. आणि या 'गोकुळ'ला प्रगतीपथावर नेणारा नंदागोप म्हणजे अरुण नरके. सलग दहा वर्ष या संघाचं अध्यक्षपद भूषवणारे अरुण नरके म्हणजेच गोकुळ अन गोकुळ म्हणजेच अरुण नरके असं समीकरण सिद्ध झालेलं. म्हणूनच अरुण नरके यांनी सांगितलेलं आत्मकथन बनलंय, 'गोकुळगाथा'.
-
Lokmanya Te Mahatma (लोकमान्य ते महात्मा)
मान्यवरांचे काही अभिप्राय या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे. - य. दि. फडके राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय पध्दतीच्या मांडणीत! - दिलीप पुरुषोत्तम चित्रे भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम' देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. - कुमार केतकर मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणाऱ्या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणाऱ्या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. - प्रा. जे. व्ही. नाईक 'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे. - रा. ग. जाधव महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली, असा निष्कर्ष काढला आहे. - सदा डुम्बरे