-
A-Joon Tendulkar (अ जून तेंडुलकर)
समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान ‘लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा – संवाद अशा सर्व लिखित व दृक् – श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे ‘तें’ तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.
-
Ashihi Ek Jhunj (अशीही एक झुंज)
ही कहाणी आहे औषधकंपन्यांच्या नफेखोरीची! माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची! वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची! पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे- जगातला कुणीही रुग्ण औषधाविना तडफडू नये, ‘परवडत नाही’ म्हणून त्याला उपचारापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी धडपडणाऱ्या एका भारतीय औषधकंपनीची अन् त्या कंपनीच्या ध्येयवेड्या प्रवर्तकाचीही ही कहाणी आहे. संपूर्ण आफ्रिका खंडात वणव्यासारख्या पसरलेल्या एड्सच्या विळख्यातून रुग्णांना सोडवण्यासाठी ‘सिप्ला’ या भारतीय औषधकंपनीनं दिलेली अशीही एक झुंज
-
Chaukat Udhalale Moti (चौकात उधळले मोती)
उर्दू. हिरव्या पानांवरचं लोभस नक्षीकाम. वासंतिक वाऱ्याचा सुगंधी श्वास. भारतमातेच्या गळ्यातला मौल्यवान चंद्रहार. एका ऐतिहासिक युगाचा आर्त विलाप. उर्दू. जीवनाचं समग्र, उग्र-मधुर भान. अनेक भाषा-भगिनींच्या मायसावलीत वाढली अन् पाहता पाहता उर्दू शक्तिमान, सुस्वरूप झाली. आणि समजूतदारही. तिचा विचारव्यूह व्यापक आणि बहुआयामी होता. एकाच वेळी ती फारसी भाषेशी गुफ्तगू, भारतीय तत्त्वज्ञानाशी विचारविनिमय आणि टोपीकर ब्रिटिशांशी फिरंगी खलबतं करत होती. काय ते पदलालित्य…काय ते समेवर येणं ! मोगल सल्तनतीच्या उदास सांध्य-उन्हात उर्दू उजळून निघाली, भारताच्या लोकगंगेत मिसळून गेली. भले सरंजामी काळात जन्माला आली असेल; पण माणुसकी, बंधुता आणि स्वातंत्र्य ही आधुनिक मूल्यं तिने अम्लान निष्ठेने जोपासली. काव्य हा उर्दूचा प्राणदिवा. अनेक श्रेष्ठ कवी तिच्या निळ्या ज्योतीवर पुन्हा पुन्हा झेप घेत होते नि लिहीत होते. त्यांची कहाणी म्हणजे हे पुस्तक. शायर आणि शायरीची मनभावन मैफल. मीर तक़ी ‘मीर’, ‘सौदा’, ‘ज़ौक़’, मिर्झा ग़ालिब, ‘मोमिन’, दाग़ देहलवी, नज़ीर अकबराबादी, अकबर इलाहाबादी, जिगर मुरादाबादी आणि मजाज़ अशा निवडक कवींच्या काव्यप्रवासाची ही सुरस आणि संवेदनशील सनद. सौम्य रंगांतली ही शब्दचित्रं लेखणीच्या पाच-सहा फटकाऱ्यांनी सिद्ध झालीयेत. ती वाचून वाचकांना उर्दू काव्याचा अंदाज येईल आणि मूळ लिखाणाची ओढ लागेल.