-
Kathantar (कथांतर)
कथांतर हा एक प्रवास आहे - काही एक दुरावा दूर करण्याचा. आणि प्रयासही - अशाचा, की या ‘दुराव्या’मध्येही काही भक्कम ‘दुवा’ आहे, हे दाखवून देण्याचा. आजोबा आणि शेजारचा लहानगा मुलगा यांचं जगावेगळं प्रेम, आजीशी पैजा लावणारा छोटासा नातू, साहेबांच्या भीतीनं थरथरणारा कारकून, शाळेतील शिक्षकांना विसरून जाणारे विद्यार्थी, खरेदीसाठी नवर्याचा छळ करणारी ‘अधर्मचारिणी’, पुस्तकवेडी माणसं- मराठी माणसाला नवीन का आहेत? ‘आंधळा पाऊस’ मधील माणसाच्या मृत्यूनंतरचा सावळा गोंधळ पाहिला, की ‘‘मी जाता राहिल कार्य काय?’’ हा आपल्या भा. रा. तांब्यांचा प्रश्न आठवत नाही का? एका ‘बाल’ विद्यार्थ्याकडून ‘‘वर्गातील पाठ कसा असावा?’’ याचा पाठ जेव्हा शिक्षिकेला मिळतो, तेव्हा ‘शिष्यात इच्छेत पराजयम ॥’ या भारतीय ‘आदर्शा’विषयी तिला सांगावंसं वाटतंच वाटतं. तेव्हा हे ‘अंतर’- हे केवळ भौगोलिक सीमांतर आहे. माणसं सारी इथून तिथून सारखीच. हे समजून जर वाचकांनी या कथा ‘आपल्या’ केल्या, तर ‘प्रवास’ आणि ‘प्रयास’ दोहोंचाही शीण गोड होऊन जाईल.
-
Majhi Aai (माझी आई )
मदर्स डे चे औचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे. या पुस्तकात तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच सर्वोत्तम कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांच्या समावेश आहे. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, व्यंगचित्रकार श्री. शि. द. फडणीस, कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर, शिक्षणक्षेत्रातील श्री. रमेश पानसे, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांच्यासारख्या श्रेष्ठीजनांबरोबरच सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. हमीद दाभोलकर विष्णू मनोहर, महेश काळे, वीणा पाटील, सखी गोखले, आर्या आंबेकर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान या विषयावर अतिशय सुंदर असे लेख लिहिले आहेत. डॉ. प्रतापराव पवार यांची वाचनीय प्रस्तावना हा देखील पुस्तकाचा आणखी एक विशेष आहे. पुस्तकातील सर्वच मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रांत लक्षणीय असा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या बालपणापासून आजवरच्या जीवन प्रवासात त्यांच्या आईने त्यांना दिलेली साथ, त्यांच्या घडणीत तिचे असलेले लक्षणीय योगदान, तिचे आणि त्यांचे नाते, यांविषयी सर्वांनी अतिशय मोकळेपणाने लिहिले आहे. काळानुरूप बदललेली आई आणि बदलत्या काळातही न बदललेले आईपण याचे दर्शन माझी आई या पुस्तकातून वाचकांना घडेल.
-
Nathuram Godse Janma Pasun Phashi Paryant (नथुराम गोडसे जन्मापासून फाशीपर्यंत )
नथुराम विनायक गोडसे या व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधींजींची हत्या केली आणि भारतीय इतिहासात गांधी आणि गोडसे दोघेही अमर झाले. एक हिंदू माथेफिरु म्हणून गोडसे यांची शासकीय इतिहासात नोंद झाले. पण खरेच गोडसे माथेफिरु की देशभक्त की आणखी काही यावर बरीच चर्चा आजही राजकीय वर्तुळात रंगताना दिसते. नायक आणि खलनायक होऊन दंतकथा झालेले हिंदुराष्ट्र या वृत्तपत्राचे संपादन नथुराम गोडसे यांच्यावर एक व्यक्ती म्हणून टाकलेला प्रकाश, त्याचबरोबर गांधीहत्येच्या वेळची परिस्थिती, त्याचा भारतीय व निर्वासित यांच्यावरील परिणाम या सगळ्याचा घेतलेला एक तटस्थ आढावा म्हणजे हे पुस्तक आहे. प्रत्येक इतिहासप्रेमींच्या संग्रही असावेच असे पुस्तक.
-
Chitarangi Re (चितरंगी रे)
`चितरंगी ' किंवा `चित्रंगी' ही गोव्यात आणि कोकणात आढळणारी एक वेल. महराष्ट्रात त्या वेलीला `गणेश वेल' म्हणतात. मला ही वेल अतिशय आवडते कारण ती कुठेही रुजते. कशावरही वाढते. ह्या वेलीची हळदी - कुंकवाच्या ठीप्क्यांसारखी वाटणारी इवली फुलं येणाऱ्या - जाणाऱ्या वात्सारुंचे डोळे तृप्त करत जातात. लाल - पिवळा हे दोन्ही रंग भारताचे, इथल्या माणसांचे खास लाडके. म्हणूनच ह्या पुस्तकाचे नाव `चितरंगी रे' असं ठेवलंय. इतक्या वर्षांत जगभर फिरताना मला आवडलेले, लक्षात राहिलेले, काही काही वेळा खटकलेले माणसांचे, स्वभावांचे, जागांचे, देशांचे अनेक रंग ह्या पुस्तकातून तुमच्या भेटीला येत आहेत. माझ्या शब्दांच्या चितरंगीची फुलं तुमच्या मनाचा एखादा जरी कोपरा रंगांनी उजळून टाकू शकली तरी तेवढे मला खूप आहे!
-
Te Pandhara Divas (ते पंधरा दिवस)
ऑगस्ट १९४७ हा काळ भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. एक ते १५ ऑगस्ट या स्थित्यंतराच्या काळातील आणि भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या १५ दिवसांची गाथा प्रशांत पोळ यांनी ‘ते पंधरा दिवस’मधून कथन केली आहे. याची सुरुवात होते ती एक ऑगस्ट १९४७ रोजी महात्मा गांधी यांचा काश्मीर दौरा आणि गिलगीटच्या हस्तांतराच्या घटनांनी. त्यानंतर दोन ऑगस्टला ब्रिटिशांकडून होणाऱ्या हस्तांतराची सुरू झालेली धावपळ, पं. नेहरू, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे काम, पुणे, श्रीनगर, तत्कालीन मद्रास या भागातील घडामोडी, तीन ऑगस्ट रोजी गांधीजींच्या काश्मीर दौऱ्याचे फलित, बाबासाहेब आंबेडकर यांना कायदेमंत्री म्हणून नियुक्त केल्याचे नेहरूंचे पत्र, चार ऑगस्ट रोजी व्हॉइसरॉय माउंटबॅटन यांच्या बैठकी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गुरुजी यांचा सिंध दौरा, अशा दररोजच्या घटनांचे चित्रण यात आहे. १५ ऑगस्टला भारतात स्वातंत्र्याची पाहत उगवली. त्या दिवसाचे वर्णन, विविध ठिकाणची परिस्थिती, नेत्यांची अवस्था याचा मागोवा घेतला आहे.
-
Nitya Nutan Hindave (नित्य नूतन हिंडावे)
लहानपणी कुंकळ्ळीला अनवट वाटांवरून भटकताना मला सतत वाटायचं की, ह्या डोंगरांपलीकडे, ह्या गावापलीकडे, ह्या राज्यापलीकडे काय आहे ते जाऊन बघितलंच पाहिजे. सुदैवाने पुढे मला खूप ठिकाणी फिरायची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी पुरेपूर चीजही केलं. अनेक देश फिरल्यानंतर जाणवलं ते एकच, माणसं वरून जितकी वेगळी वाटतात, तितकीच ती आतून एक सारखीच असतात. 'नित्य नूतन हिंडावे' या पुस्तकातून तुम्हाला कधी मला भेटलेली माणसं भेटतील, तर कधी आलेले आंबट- गोड अनुभव, क्वचित कधी जाणवलेला जीवनाचा एखादा कुरूप अंधारा कोपरा, तर कधी अनुभवलेला तन - मन उजळून टाकणारा एखादा सुंदर दीप्तीमान क्षण. चला तर मग माझ्याबरोबर भटकंतीला!
-
Ya Vishwakathatun Prem Boltey (या विश्वकथांतून प्रेम बोलतेय)
रवींद्रनाथ टागोरांचं एक वक्तव्य असं आहे 'तुमच्याजवळ जर दोन भाकरी असतील तर त्यातली एक विकून गुलाबाचं फूल विकत आणा.' प्रेमाच्या अशा बहुरंगी छटा, बहुविध आयाम, बहुविध अनुभूती, बहुविध प्रकटीकरण, बहुविध संवेदना या ग्रंथात रेखाटलेल्या जागतिक साहित्यिकांच्या प्रेमजीवनातील प्रसंगातून वाचकांच्या वाचनभेटीस आल्या आहेत. या छोटेखानी ग्रंथात जागतिक साहित्यातील अभिजात साहित्यनिर्मात्यांच्या जीवनातील प्रेमप्रसंग रेखाटण्याचा प्रयत्न मी केला आहे. 'या विश्वकथांतून प्रेम बोलतेय' या शीर्षकाद्वारा या ग्रंथात डांटे-बिएट्रिस, अलेक्झांडर पुश्किन- नतालिया गोंचारोवा, फ्रांज काफ्का व त्याच्या तीन प्रेयसी मिशलिन, मिलेना जेसिंस्का, डोरा डायमाँट आणि खलिल जिब्रान व त्याच्या दोन प्रेयसी फेलिस बॉयर, मेरी हेस्कल यांच्यातील प्रेमजीवन शब्दबद्ध केले आहे. डांटे, पुश्किन यांच्या कविता व काफ्का, मिलेना, जिब्रान यांच्या प्रेमपत्रांचे अनुवाद केले आहेत. वाचकांना वाचनासाठी हे सर्व अनुवाद रुचावेत, सोपे जावेत यासाठी सोप्या शब्दांचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे.
-
Dashakriya (दशक्रिया)
""दशक्रिया' ही भानुदास नावाच्या एका शाळकरी मुलाच्या आयुष्याची कहाणी आहे. बुद्धी, चातुर्य व साहस पणाला लावून पोटाची खळगी भरू पाहणाऱ्या, दारिद्र्याने ढासळून गेलेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भानुदासची ही कहाणी हळूहळू विस्तारत जाते आणि रोगट रूढींमुळे धर्माला आलेली अवकळा, विदारक जातिव्यवस्था, अर्थार्जनाचे एकाच वेळी संतापजनक व करुणाजनक वाटणारे पर्याय, पार कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, उच्च-नीच अशा अनेक वर्णांना व वर्गांना पोटासाठी एकाच पातळीवर आणणारी विचित्र समाजस्थिती, आधुनिकीकरणाकडे पाठ फिरवणारे समूह, मानवी नात्यांचे पैशांमुळे पटापट बदलत जाणारे रंग, मृत्यू आणि धर्माबाबतचे चिंतन, सोनेरी इतिहासाचे सडलेले कातडे अंगावर ओढून सुस्त पडलेली नगरी इत्यादी असंख्य गोष्टींना कवेत घेऊन सद्य:स्थितीचा क्लेशदायक दस्तऐवज बनते. तटस्थ-वास्तवदर्शी शैलीमुळे. खोट्या काव्यात्मलेला, जाणीवपूर्वक दूर ठेवण्यामुळे, सहज ओघवत्या अचूक बोलभाषेमुळे अस्सल मराठी व मितव्ययी शब्दकळेमुळे, चित्रसदृश वर्णनांमुळे, आशयाशी अंगभूत झालेल्या चिंतनामुळे आणि जगण्यातून आलेल्या निश्चित वैचारिक भूमिकेमुळे बाबा भांड यांची ही कादंबरी आपल्या समकालीनांच्या साहित्यापेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. शिवाय कुमारांपासून प्रौढांपर्यंतच्या सर्वच वाचकांना प्रभावित करण्याची अद्भुत क्षमता तिच्यात आलेली आहे. वास्तवाला हल्ली जी भयंकर अवकळा प्राप्त झाली आहे. ती लक्षात घेता, 'दशक्रिया' ही कादंबरी, हा एक मौलिक अपवादच म्हणावा लागेल. या अपवादाचे नाते साने गुरुजींच्या विशाल मानवी करुणेने निर्माण केलेल्या व प्रवाहाशी आहे." - चंद्रकांत पाटील.
-
Ghar Kaularu (घर कौलारू)
कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे. वासनांचे, सुखदु:खांचे दशावतार त्यांच्या कथांत दिसतात. आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते. कामभावनेच्या माणसाच्या मनावर वेगवेगळा झालेला परिणाम ते अतिशय सूक्ष्मपणे रेखाटतात. गहरी प्रेम भावना हा त्यांच्या कथेचा मुख्य विषय आहे. त्यांच्या कथेत काही वेळेस वेडी, अर्धवट पात्रे येतात. जीवनातील विविध क्षेत्रातील विसंगतीचे अचूक व मार्मिक दर्शन घडवायचे व ते घडवताना वाचताना हसवीत अंतमर्र्ुख करावयाचे ही फारच अवघड कसरत आहे व ती फार थोड्यांना साधली. त्यात दळवींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. गंभीर कथालेखनासोबत दळवींनी विनोदी लेख व कथा लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणार्या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे त्यांनी लेखनातून सिद्ध केले.